तुर्कस्तानने पुराच्या वेळी दिलेली मदत पाकिस्तानने पूरग्रस्तांना दिलीच नाही. भूकंपानंतर हेच मदत साहित्य आपले असल्याचे भासवत तुर्कस्तानला देण्यात आले. अशा बौद्धिक दिवाळखोरीमुळेच पाकिस्तानच्या हातात भिकेचा कटोरा आला आहे.

महागाई आणि दहशतवाद यांचा फास पाकिस्तानभोवती पडला आहे. अन्न-धान्याचे गगनाला भिडलेले भाव नागरिकांचे जीणे असह्य करीत आहेत. नुकताच कराचीतील पोलिस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला. पाकिस्तानातील एकही शहर सुरक्षित राहिलेले नाही. पाकिस्तान दिवाळखोर होणार, असे म्हटले जात आहे. ती अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, त्यांचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी देश दिवाळखोरीत निघाल्याचे सांगून टाकले! म्हणजे या महत्त्वाच्या मुद्द्यावरही गोंधळ! पाकिस्तान मुस्लीम लिग नून, हा तेथील सत्तारूढ पक्ष. पंतप्रधान शरिफ हे माजी पंतप्रधान नवाज शरिफ यांचे बंधु. पण, या सरकारशी देणेघेणे नसल्याचे विधान नवाज यांच्या कन्या मरियम यांनी नुकतेच केले. दोन भावांमध्ये अंतर पडल्याची ही चाहूल असेल, तर पाकिस्तानपुढील संकट आणखी वाढणार आहे. दुसरीकडे इम्रान खान यांनी ‘जेल भरो’ आंदोलनाची हाक दिली आहे. सध्याच्या अराजकात त्यामुळे आणखी भर पडेल. पेट्रोल 272 रुपये लीटर, कांदा 250 रुपये किलो, डाळी 260 रुपये किलो, केळी 220 रुपये डझन हे किंमतीचे आकडे चक्रावून टाकतात. हे चक्र सुरूच राहिले, तर पाकिस्तानातील मध्यमवर्ग दारिद्र्यरेषेखाली जाण्याचा धोका आहे. वास्तविक पाकिस्तानच्या अव्याहत अधोगतीला तेथील लष्कर कारणीभूत. आज आणीबाणीच्या वेळी तेथे अधिकृत लष्करशाही नसल्याने शरिफ सरकार पाकिस्तानी नागरिकांच्या शिव्याशापांचे धनी झाले. अर्थात, या आव्हानात्मक काळातही ‘भारताविरुद्धची युद्धे आजच्या स्थितीला कारण ठरली’ हे त्यांनी सुनावले. याचा अर्थ शरिफ स्वतंत्र आहेत, असा नव्हे. इम्रान नको असल्याने शरिफ आहेत एवढेच! नाणेनिधीकडून मदतीसाठी घालण्यात आलेल्या अटी कठोर आहेत. अनुदान रद्द करणे, लष्करावरील खर्च कमी करणे, पेट्रोल, डिझेल, गॅस यावरील कर वाढविणे याचा त्यात समावेश आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करून पाकिस्तान सरकारने अटी पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले टाकलेली दिसतात.

विश्‍वासाला सुरुंग

भाववाढ आणि दहशतवादाचे थैमान यामुळे पाकिस्तानात विचारवंतांसह सामान्य जनांमध्ये मंथनाला सुरुवात झाल्याचे चित्र समाजमाध्यमातून पुढे येणार्‍या माहितीतून दिसते. एखाद्या सरकारवरील नागरिकांचा विश्‍वास उडणे, यात आश्‍चर्य नाही, मात्र पाकिस्तानातील नागरिकांचा ‘पाकिस्तान’ या संकल्पनेवरील विश्‍वास उडत चालला आहे. अलीकडच्या तेथील घडामोडींचे ते मोठे फलित. भारताशी असलेला व्यापार, काश्मीरमधील 370 वे कलम हटविल्यानंतर पाकिस्तानने थांबवला. अन्यथा कांदा, टोमॅटो यासाठी तेथील नागरिकांना एवढी किंमत मोजावी लागली नसती. अस्तित्वासाठीच्या या जीवघेण्या संघर्षाला पाकिस्तानी लष्कर, तेथील कथित राजकारणी जसे कारणीभूत आहेत, तसेच नागरिकांनाही जबाबदारी टाळता येणार नाही. ‘गवत खाऊ, पण अणुबाँब बनवू’ अशा डरकाळया फोडणार्‍यांना त्यांनीच वेळोवेळी डोक्यावर घेतले. ‘आम्ही जो अणुबाँब बनवला आहे तोच आमच्यावर टाका’ असा खासदार सायरा बानो यांनी केलेला त्रागा आजच्या पाकिस्तानी नागरिकांची प्रातिनिधिक भावना म्हणायला हवी. ‘तेहरिक ए तालिबान पाकिस्तान’ या विषारी संघटनेला आतापर्यंत तेथील सर्व राज्यकर्त्यांनी कमी-अधिक प्रमाणात ताकद पुरवली. या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांना पाकिस्तानच्या हद्दीत अफगाणिस्तान सीमेवर कायमची निवास व्यवस्था उभारून देण्याची इम्रान यांची इच्छा होती. आधी इस्लामसाठी पाकिस्तानची निर्मिती झाली, आता इस्लामचे खरे अनुयायी कोण? यावरून देश कडेलोटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. ‘भाडोत्री फौज’ असे तेहरिक ए तालिबान पाकिस्तानकडून पाकिस्तानी लष्कराचे वर्णन केले जाते. लष्करी तळ हे तेहरिक ए तालिबान पाकिस्तानचे लक्ष्य राहणार आहे. रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था, इस्लामच्या नावावरील दहशतवाद, कायम भिनविण्यात येत असलेला भारत द्वेष या आव्हानांवर मात करण्यावर पाकिस्तानचे भवितव्य अवलंबून राहील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा