नागपूर : येत्या 9 फेब्रुवारीपासून सुरू होणारी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी यावेळी आणखी खास असेल, जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान चौथा आणि अंतिम कसोटी सामना पाहण्यासाठी अहमदाबादला पोहोचतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये होणार्‍या या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना खास निमंत्रण देण्यात आले आहे. 4 कसोटी मालिकेतील हा चौथा आणि शेवटचा सामना 9 मार्च 2023 पासून सुरू होईल, जो अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या स्टेडियमच्या पुनर्बांधणीनंतर क्रिकेट सामना पाहण्याची ही पहिलीच वेळ असेल. या स्टेडियमची पुनर्बांधणी केल्यानंतर त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले. 2017 नंतर ऑस्ट्रेलियन संघ कसोटी मालिकेसाठी भारत दौर्‍यावर आला आहे. 9 फेब्रुवारीपासून नागपुरात पहिला कसोटी सामना खेळणार आहे. यावेळी कांगारूंना मायदेशात हरवण्याची सुवर्णसंधी भारतीय संघाला असणार आहे, कारण 2018-19 आणि 2020-21 या वर्षात भारताने त्यांना त्यांच्याच घरामध्ये दोनदा पराभूत केले आहे.

भारत हा आशिया खंडातील एकमेव संघ ठरला आहे, ज्याने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत केले आहे आणि हा पराक्रम एकदा नव्हे तर दोनदा केला आहे. आता कांगारू संघाला याचा बदला घ्यायचा आहे.

4 कसोटी सामन्यांची ही मालिका नागपूर, दिल्ली, धर्मशाला आणि अहमदाबाद येथे खेळवली जाईल. भारताने येथे जिंकल्यास, या वर्षी इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत खेळण्याचाही तो हक्कदार असेल, ज्यासाठी ऑस्ट्रेलिया आधीच पात्र ठरले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघांसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. विशेषत: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या दृष्टीने. ऑस्ट्रेलियन संघ डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल असे मानले जात असले तरी टीम इंडियाबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील किमान तीन सामने जिंकावे लागतील आणि एक सामना अनिर्णित राहिला तरी भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहचेल. त्यामुळे पहिल्या कसोटीपासून शेवटच्या कसोटीपर्यंत हा संपूर्ण थरार रंगणार हे स्पष्ट आहे.

दरम्यान, हा सामना आयसीसी क्रमवारीतील दोन अव्वल संघांमध्ये आहे. ऑस्ट्रेलिया सध्या नंबर वनच्या खुर्चीवर ठाण मांडून बसला आहे, तर टीम इंडिया दोन नंबरवर आहे. टीम इंडिया एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित. मालिका मोठ्या फरकाने काबीज केल्यास जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळेल, तसेच आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर जाण्याची संधी मिळेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा