पुणे : घाऊक बाजारात दिवसेंदिवस नव्या कांद्याची आवक वाढत आहे. परिणामी त्या तुलनेत दरात घट होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत घाऊक बाजारात प्रतिकिलोच्या दरात 2 ते 3 रूपयांनी घट झाली आहे. आवक वाढल्यास दरात आणखी घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. किरकोळ बाजारात 18 ते 20 रूपये किलोने कांद्याची विक्री केली जात आहे.
जुन्या कांद्याची आवक घटल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढले होते. मात्र आता जुना कांदा संपत आला आहे. नव्या कांद्याची आवक सुरू झाली आहे. येत्या पंधरा दिवसांत नव्या कांद्याची आवक आणखी वाढणार आहे. मागणीच्या तुलनेत आवक अधिक होत असल्याने दरात आणखी घट होणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. घाऊक बाजारातील दरात घट झाल्यास किरकोळ बाजारातील दरातही घट होईल. त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे.
सद्य:स्थितीत मार्केटयार्डातील कांदा-बटाटा विभागात 70 ते 80 ट्रकची आवक होत आहे. ही आवक पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या भागातून, तर नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि संगमनेर भागातून होत आहे. कांद्याच्या पिकासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे पीक चांगले आहे. बाजारात दाखल होणार्या नव्या कांद्याचा दर्जाही चांगला आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलोला 11 ते 13 रूपये दर मिळत आहे. मागील आठवड्यात 13 ते 16 रूपये दर मिळत होता.
राज्यातील कांद्याला दक्षिण भारतातून मोठी मागणी असते. मात्र दक्षिण भारतातील काही राज्यात कांदा उपलब्ध आहे. त्यामुळे दक्षिण भारतातून कांद्याला होणारी मागणी नेहमीच्या तुलनेत कमीच आहे. तसेच मध्य भारतातील काही राज्यातून अद्यापही कांद्याला मागणी वाढलेली नाही. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी आलेला कांदा शहरासह परिसरातील व्यापारी खरेदी करत आहेत. आवकेच्या तुलनेत खरेदी कमीच होत आहे. त्यामुळे कांद्याचे दर घटत असल्याचेही व्यापार्यांनी सांगितले.
आवक वाढल्याने दर घसरले
बाजारात मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक अधिक होत आहे. दिवसेंदिवस नव्या कांद्याची आवक वाढत आहे. त्यामुळे दर कमी होत आहेत. आवक अशीच वाढत राहिल्यास दरात आणखी घट होणार आहे. बाजारात रोज 70 ते 80 गाड्यांची आवक होत आहे. येत्या पंधरा दिवसांत आणखी 5 ते 10 गाड्यांनी आवक वाढेल. त्यामुळे दरात आखणी घट होण्याची शक्यता आहे.
- राजेंद्र कोरपे, व्यापारी