असा ’चविष्ट’ शेअर ब्रिटानिया

भाग्यश्री पटवर्धन

ब्रिटानियाचा विचार केल्यास त्यांच्या उत्पादनांचे वैविध्य मोठे आहे. बिस्कीट, ब्रेड केकपासून दुग्धजन्य पदार्थांचा त्यात समावेश आहे. सध्या कंपनीच्या उत्पादनांची 60 देशांत निर्यात होते. वाढते अनिवासी भारतीय हा कंपनीचा विस्तारणारा ग्राहक वर्ग आहे.

सध्या जगभरात मंदीची चर्चा चालू आहे. ती कधी येईल आणि किती प्रभावी ठरेल हे सांगणे अवघड! गेल्याच आठवड्यात जी-20 परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांनीही मंदीची शक्यता व्यक्त केली. आता तिचा भारतात प्रभाव किती राहणार याबाबत मतमतांतरे आहेत. एक मात्र नक्की ज्या देशात मंदीची भीती अधिक आहे, त्यात अमेरिका, चीन युरोपचा समावेश आहे; मात्र भारतात शक्यता कमी. कारण अर्थातच वेगाने खपणारी ग्राहकोपयोगी उत्पादने (फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स-एफएमसीजी). आजच्या स्तंभात एफएमसीजीमधील एका दिग्गज कंपनीचा लेखाजोखा मांडणार आहे. ती आहे ब्रिटानिया. तुमच्या आमच्या आवडीची मारी बिस्किटे तयार करणारी!

एफएमसीजी क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चवथ्या क्रमांकाचे आहे. या क्षेत्राचे तीन मुख्य घटक आहेत. अन्नपदार्थ – पेये (19 टक्के योगदान), आरोग्य रक्षक (31 टक्के), गृहोपयोगी आणि व्यक्तिगत वापराच्या वस्तू (50 टक्के). या क्षेत्राला मिळणार्‍या महसुली उत्पन्नात शहरी भागाचे योगदान सर्वाधिक म्हणजे 55 टक्के आहे. आज शहरे वेगाने विस्तारत आहेत. ग्रामीण भागाचे योगदान 45 टक्के आहे. देशातील प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांची बाजारपेठ येत्या 2025 पर्यंत 470 अब्ज अमेरिकन डॉलर होईल, असा अंदाज आहे. 2019-20 मध्ये ती 270 अब्ज डॉलर होती. यावरून या क्षेत्रातच आणि ब्रिटानियासारख्या कंपन्यांना असलेली संधी लक्षात येते. कोरोना काळात सगळे व्यवहार बंद असताना हे क्षेत्र 16 टक्के वाढले यावरून त्याची अनिवार्यता कळते. (आठवा तुम्ही घरी बसून किती आणि कोणते तयार पदार्थ मागवले!) क्रिसिल या पत मानांकन कंपनीच्या अंदाजानुसार या क्षेत्राचे उत्पन्न दुप्पट होईल असा अंदाज आहे. कच्च्या मालाच्या भावात वाढ झाल्याने नफा क्षमतेत काहीशी घट झालेली असली तरी गरजेपेक्षा अधिक खरेदीचा जोर टिकून राहणार आहे. त्यातही हाताशी पैसे असलेला वाढता मध्यमवर्ग आणि आकांक्षा बाळगणारा निम्न वर्ग, बदलती जीवनशैली यामुळे एफएमसीजीला मंदी आली तरी मागणीचा रेटा तारून नेईल, यात शंका नाही. याशिवाय केंद्र सरकारने उत्पादनाशी निगडित सवलत योजनेत या क्षेत्राला स्थान दिले आहे आणि आगामी अर्थसंकल्पात त्याचा अधिक विस्तार अपेक्षित आहे. ब्रिटानियाचा विचार केल्यास त्यांच्या उत्पादनांचे वैविध्य मोठे आहे. बिस्कीट, ब्रेड केकपासून दुग्धजन्य पदार्थांचा त्यात समावेश आहे. सध्या कंपनीच्या उत्पादनांची 60 देशात निर्यात होते. वाढते अनिवासी भारतीय हा कंपनीचा विस्तारता ग्राहक वर्ग आहे. कोलकता, दिल्ली, चेन्नई, मुंबई आणि उत्तराखंडात कंपनीचे प्रकल्प आहेत. उत्पादनांचा दर्जा आणि त्यात सातत्य राखणे हे व्यवस्थापनाचे वैशिष्ट्य मानले जाते. 2021 पासून वितरक, विक्री, व्यवस्थापन अशा सर्व पातळ्यांत आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. कंपनीने दिलेले बक्षीस रोखे (डिबेंचर) दोन्ही बाजारावर नुकतेच नोंदले गेले आहेत. त्याची किंमत 32 रुपयांच्या आसपास आहे. शेअरचा ५२ wk high 4,537.00 52-wk low 3,050.00 पाहिल्यास आगामी तीन ते पाच वर्षासाठी हा शेअर बाजारात घसरण होताच एक-एक घेतल्यास भविष्यात चांगला परतावा देईल यात शंका नाही. सध्या या शेअरचा भाव 4,365 रुपयाच्या आसपास आहे. घसघशीत लाभांश देणारी कंपनी म्हणूनही ब्रिटानिया परिचित आहे. या पार्श्वभूमीवर एफएमसीजी क्षेत्रातील हा ’चविष्ट’ शेअर तुमच्या गुंतवणूक परडीत असायलाच हवा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा