संमेलन बारा दिवसांवर; आयोजकांचे मौन कायम
संजय ऐलवाड
पुणे : साहित्य संमेलन म्हटले की, माजी संमेलनाध्यक्षांना सन्मानाने संमेलनात निमंत्रित करण्याचा प्रघात आहे. मात्र यावेळी साहित्य संमेलन अवघ्या बारा दिवसांवर आले, तरी आयोजकांचे माजी संमेलनाध्यक्षांना निमंत्रित करण्याबाबत मौन कायम आहे. त्यामुळे माजी संमेलनाध्यक्षांना निमंत्रित केले जाणार किंवा नाही याबाबत साहित्य वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
वर्धा येथे होणारे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 3, 4 व 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या संमेलनासाठी अद्यापही माजी संमेलनाध्यक्षांना निमंत्रित करण्यात आले नाही. विशेष म्हणजे मावळते अध्यक्ष भारत सासणे यांच्याशी सुमारे एक ते दीड महिन्यांपूर्वी संवाद झाला होता. त्यानंतर संवाद झालेले नाहीत. इतर माजी संमेलनाध्यक्षांना पत्र किंवा पत्रिका मिळालेली नसल्याने संमेलनातील कार्यक्रम आणि नियोजनाबाबत माजी संमेलनाध्यक्ष एका अर्थाने अनभिज्ञ आहेत.
संमेलनाध्यक्ष हा बहुमान असतो. त्यामुळे माजी संमेलनाध्यक्षांना सन्मानाने साहित्य संमेलनात निमंत्रित केले जाते. आयोजकांकडून त्यांच्याशी संवाद साधला जातो. त्यामुळे माजी संमेलनाध्यक्षही साहित्य संमेलनरूपी शब्दोत्सवात आनंदाने सहभागी होत असतात. मात्र यंदा वर्धा येथील आयोजकांनी अद्यापही माजी संमेलनाध्यक्षांशी संवादाची प्रक्रिया सुरू केलेली नाही. त्यामुळे संमेलनात सहभागी होण्यावरून माजी संमेलनाध्यक्षांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असल्याचे चित्र आहे.
नुकताच विदर्भ साहित्य संघाचा 100 वा वर्धापनदिन साजरा झाला आहे. 100 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधूनच विदर्भ साहित्य संघाने संमेलनाच्या आयोजनाचे विदर्भात नियोजन केले होते. त्यामुळे विदर्भ साहित्य संघ संमेलनाच्या केंद्रस्थानी आहे. एकीकडे संमेलनाची जय्यत तयारी करण्यात येत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. तर, दुसरीकडे मावळत्या संमेलनाध्यक्षासह माजी संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ प्रतिष्ठित साहित्यिकांना अद्यापही आयोजकांकडून संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आले नसल्याचे वास्तव आहे. आयोजकांच्या निमंत्रित न करण्याच्या दिरंगाईवर साहित्य क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
नियोजनाबाबत संवाद नाही
मावळता संमेलनाध्यक्ष म्हणून अद्याप तरी मला पत्र किंवा पत्रिका मिळाली नाही. कार्यक्रम पत्रिका ठरत असताना एकदा आयोजकांशी बोलणे झाले होते. मात्र त्यानंतर कधी यायचे आहे, मावळता अध्यक्ष म्हणून जबाबदारी काय आहे, याबाबत अलीकडच्या काळात आयोजकांपैकी कोणीही संवाद साधलेला नाही. त्याबाबत पत्र किंवा पत्रिकाही पाठविली नाही. मात्र, मी एक तारखेलाच वर्धा येथे जाणार आहे.
- भारत सासणे, मावळते संमेलनाध्यक्ष.
निमंत्रितांना पत्र पाठविली आहेत
14 जानेवारी रोजी विदर्भ साहित्य संघाचा 100 वा वर्धापनदिन होता. त्यामुळे आम्ही त्या कार्यात व्यस्त होतो. मात्र आता तो कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आहे. त्यामुळे आम्ही संमेलनाच्या कार्यात व्यस्त झालो आहोत. सर्वांनाच संमेलनाच्या तारखा माहीत आहेत. स्थळ माहिती आहे. संमेलनाची व्याप्ती मोठी असते. त्यामुळे प्रत्येकांना रोजच्या रोज माहिती देणे शक्य होत नाही.
- प्रदिप दाते, अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ.
अद्याप निमंत्रण नाही
वर्धा येथील आयोजकांकडून संमेलनात सहभागी होण्याबाबत अद्यापही कोणी संवाद साधला गेला नाही. संमेलनाबाबत पत्र किंवा संमेलनाची पत्रिकाही मिळालेली नाही.
- डॉ. सदानंद मोरे, माजी संमेलनाध्यक्ष
संमेलनाविषयी काहीच माहिती नाही
माजी संमेलनाध्यक्ष म्हणून वर्धा येथील संमेलन आयोजकांनी अद्याप तरी संमेलनात सहभागी होण्यासाठी माझ्याशी संवाद साधला नाही. संमेलनाचे पत्र किंवा कार्यक्रम पत्रिकाही पाठविली नाही.
- लक्ष्मीकांत देशमुख, माजी संमेलनाध्यक्ष.