मुस्लिमांचा अनुनय करण्याचा काँग्रेसवर भाजप सतत आरोप करत असे. आता मुस्लिम व ख्रिश्‍चन धर्मीयांशी संपर्क साधण्याचे उघड आवाहन करणे हा अनुनय नाही, तर काय आहे?

आगामी विविध विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करण्याचा ‘आदेश’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाला दिला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोपाच्या सत्रात त्यांनी केलेले भाषण संपूर्णपणे माध्यमांतून प्रसिद्ध झाले नसले, तरी जो भाग समोर आला आहे त्यावरून ते स्पष्टपणे जाणवते. या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षपदी जे.पी.नड्डा यांची फेरनिवड झाली. ती एकमताने झाली. त्यांना कोण विरोध करणार होते? फेर नियुक्तीपूर्वी नड्डा यांनीही सर्व नऊ राज्यांत होणार्‍या निवडणुकीत पक्षाला विजय मिळालाच पाहिजे यावर जोर दिला. मोदी यांनी समाजाच्या सर्व घटकांतील, सर्व धर्मातील उपेक्षित गटांपर्यंत पोहोचण्यास पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. ख्रिश्‍चन व मुस्लिम धर्मावर त्यांनी विशेष भर दिला आहे. मुस्लिमांमधील पसमंदा व बोहरी समुदायाशी संपर्क साधण्यास त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. रविवारी चर्चसमोर आपण असले पाहिजे, असे ते म्हणाले. हा संपर्क साधताना मतांचा विचार करू नका, असेही मोदी म्हणाले. हे अधिक आश्‍चर्याचे आहे. कोणताही पक्ष विनाकारण कोणत्याही समुदायाशी संपर्क का साधेल? नड्डा व मोदी यांची भाषणे विरोधी पक्षांच्या छातीत धडकी भरवणारी आहेत. किंबहुना त्यांचा उद्देश तोच आहे.

संपर्काचा ‘दर्जा’ महत्त्वाचा

कोणत्याही पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेतला जातो. काही चुका झाल्या असल्यास त्यावर आत्मपरीक्षण केले जाते. सध्या भाजपच्या बाबतीत आत्मपरीक्षण हा मुद्दाच उद्भवत नाही. पक्ष आणि पर्यायाने सरकार जे काही करत आहे ते बरोबरच आहे, असा पक्षाचा ठाम समज आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीचे हे राष्ट्रीय अधिवेशन असल्याने ते विशेष महत्त्वाचे होते. त्यात निवडणुकीच्या तयारीचा संदेश दिला जाणार हे अपेक्षितही होते. तसाही भाजप कायम निवडणुकीच्या दृष्टीने विचार करत असतो. पक्ष आणि मोदी यांचा प्रचार करण्यासाठी सरकारी योजना व इलेक्ट्रॉनिक माध्यमे वापरण्याचे तंत्र भाजपने उत्तमरीत्या अवगत केले आहे. काँग्रेसच्या सरकारच्या काळातील काही योजना आता पूर्ण होत आहेत, अनेक जुन्याच योजना सरकार राबवत आहे; पण त्या मोदी सरकारने आणल्या असा प्रचार सुरू आहे. मोदी-शहा यांची कार्यपद्धती बघता मिझोराम, त्रिपुरा व नाग प्रदेश या राज्यांमधील निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर करण्याआधी दोन दिवस हे अधिवेशन झाले हा निव्वळ योगायोग मानणे अवघड आहे. ईशान्येकडील या राज्यांमध्ये ख्रिश्‍चन धर्मीयांची संख्या जास्त आहे. त्यामुळे चर्चसमोर आपल्या कार्यकर्त्यांनी असले पाहिजे, असे मोदी म्हणाले आहेत. कर्नाटकात काँग्रेसच्या तोंडचा सत्तेचा घास भाजपने हिरावला होता. तेथे पुन्हा सत्ता मिळवणे अशक्य नसले, तरी अवघड आहे याची जाणीव मोदी-शहा-नड्डा यांना आहे. दक्षिणेत पक्षाचा विस्तार करण्याचे आव्हान नड्डा यांच्या पुढे आहे. तेलंगण हे राज्य पक्षापुढचे प्रश्‍नचिन्ह आहे. मध्य प्रदेश व राजस्तान ही मोठी राज्ये त्यांना जिंकायची आहेतच. त्यामुळे मुस्लिम धर्मीयांना चुचकारण्याची त्यांची योजना दिसते. पसमंदा हा समुदाय तेलंगण व विशेषत: हैदराबाद परिसरात जास्त आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. अल्पसंख्याक, दलित हा वर्ग काँग्रेसला वर्षानुवर्षे पाठिंबा देत होता. विविध राज्यांत निर्माण झालेल्या प्रादेशिक पक्षांमुळे काँग्रेसचा हा पाठीराखा वर्ग फुटला. आता काँग्रेसबरोबरच प्रादेशिक पक्षही संपवण्याचा भाजपचा निर्धार आहे. त्यामुळेच सर्व गटांशी जवळीक साधण्याचा सल्लावजा आदेश मोदी यांनी दिला आहे. आपला पक्ष सर्वसमावेशक असल्याचे वरिष्ठ नेते दाखवत आहेत. कधी हिजाब, तर कधी धर्मांतर असे मुद्दे उकरून मुस्लिम व ख्रिश्‍चन धर्मीयांना घाबरवण्याची जबाबदारी रा.स्व. संघ व परिवारावर सोपवलेली दिसते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या समुदायांशी संपर्क साधायचा आणि जर विरोधात गेले, तर काय होईल याचा ‘इशारा’ परिवाराने द्यायचा, अशी ही व्यूहनीती दिसते. मते व सत्ता यासाठी भाजपला अल्पसंख्याकांचा उमाळा आलेला दिसत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा