नवी दिल्ली : देशात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई वाढीचा दर डिसेंबर महिन्यात 4.95 टक्के नोंदविला गेला. नोव्हेंबर महिन्यात हा दर 5.85 टक्के होता. यात 0.90 टक्क्यांची घसरण झाली. अन्न पदार्थ आणि खनिज तेलाच्या किमती कमी झाल्याने महागाई दरात घसरण झाली.

मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये हा दर 14.27 टक्के होता. त्यातुलनेत, हा दर 8.42 टक्क्यांनी कमी झाला. ऑक्टोबर महिन्यात तब्बल 19 महिन्यांनंतर हा दर दुहेरी अंकाखाली आला होता. त्यानंतर, यात मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे, केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

डिसेंबरमध्ये खाद्य पदार्थांची महागाई उणे 1.25 नोंदवली गेली. तर, इंधन आणि ऊर्जेचा महागाई दर 18.09 टक्के नोंदविला गेला. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ) आकडेवारीनुसार, डिसेंबर महिन्यात महागाई दरातील घसरण प्रामुख्याने अन्नपदार्थ, खनिज तेल, कच्चे पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, अन्न उत्पादने, वस्त्रे आणि रसायने तसेच रासायनिक उत्पादने यांच्या घसरलेल्या किमतीमुळे पाहायला मिळाली. मागच्या आठवड्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ दर जाहीर करण्यात आला. डिसेंबरमध्ये हा दर 5.72 टक्के नोंदविला गेला. वर्षभरातील हा सर्वांत नीचांकी दर होता. महागाई दर 2 ते 6 टक्क्यांदरम्यान राहावा, यासाठी रिझर्व बँकेकडून विविध उपाययोजना केल्या जात होत्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा