पुणे : एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे बस, मोटार आणि मालमोटार एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला. पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या थेऊर फाटा येथे मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे बसमधील सर्व 40 प्रवाशांचे प्राण वाचले आहे. मात्र, रस्त्याच्या दुभाजकाला रंग देण्याचे काम करणारा कर्मचारी या अपघातात गंभीर जखमी झाला.
अक्कलकोट ते ठाणे या मार्गावर ठाणे आगाराची एसटी बस नेहमीप्रमाणे मंगळवारी प्रवाशांना घेऊन सोलापूरहून पुण्याच्या दिशेने येत होती. ही एसटी बस काल सायंकाळी थेऊर फाट्याजवळ आली असता, तिचे ब्रेक निकामी झाले आणि या बसने पुढील मोटार व मालमोटारीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात मोटार आणि मालमोटारीचे मोठे नुकसान झाले. मात्र, कोणताही प्रवासी गंभीर जखमी झाला नाही. ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच, चालकाने प्रसंगावधान राखून काही अंतरावर जाऊन बस थांबवण्यास यश मिळवले.
दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गावरील रस्त्याच्या दुभाजकाला रंग देणारा कर्मचारी या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या हातावरून आणि पायावरून वाहन गेल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन काही वेळातच सर्व वाहतूक सुरळीत केली.