पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि स्किल्लेट्स फाऊंडेशनतर्फे 11 ते 12 जानेवारी या कालावधीमध्ये दोन दिवसीय ’शाश्वत विकासाची 17 ध्येये’ या विषयावर जागरूकता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवाद कार्यक्रमात शाश्वत विकासाशी संबंधित जनजागरूकता निर्माण करण्याबरोबरच या संबंधी काम करणार्या संस्थांना योग्य ते मार्गदर्शन केले जाणार आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, प्रभारी कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांचे या कार्यक्रमासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले आहे, अशी माहिती स्किल्लेट्स फाऊंडेशनच्या संस्थापक संचालिका वकील गौरी चंद्रायन यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्किल्लेट्स फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक सोनाली सरीपल्ली, डॉ. मिताली मोरे, वकील वृषाली प्रधान, श्रुती पाटोळे यावेळी उपस्थित होत्या.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे यंदा १०१ वे वर्ष असून त्यांचे शाश्वत विकासासंबंधी कार्य खूप मोठे आहे. त्या अनुषंगाने या दोन संस्थातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुकुंदनगर येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे हा कार्यक्रम पार पडणार असून, या कार्यक्रमासाठी कांचन नितीन गडकरी, महाराजा महेंद्रसिंह राव आणि महाराणी वसुंधराराजे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात दारिद्र्य निर्मूलन, भूक निर्मूलन, लैंगिक समानता, शाश्वत शहरे आणि विकास, नवीन उपक्रम आणि मूलभूत सुविधा या आणि यांसारख्या अनेक विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. १२ जानेवारी रोजी होणार्या कार्यक्रमात शाश्वत विकासासाठी कार्य करणार्या निवडक व्यक्तींना ’निर्मिती 2023’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. 2023 या वर्षी भारताला जी 20 साठी नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यात वाय 20 साठी भारताकडून सत्राचे प्रमुख नेतृत्व करणाऱे कुणाल टिळक हे याप्रसंगी युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना स्किल्लेट्स फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक सोनाली सरीपल्ली, डॉ. मिताली मोरे, वकील वृषाली प्रधान, श्रुती पाटोळे यांची आहे.