पुणे : तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत असताना मुद्रित माध्यमांनीदेखील काळानुरुप बदल केले आहेत. वृत्तवाहिन्या, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटरच्या माध्यमातून क्षणात बातमी दिली जाते. त्यामुळे मुद्रित माध्यमे बंद पडतील का?, त्यांना पुढे भवितव्य आहे का? असा प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र आजही वृत्तपत्राचे महत्व कमी झालेले नसून या माध्यमाची विश्वासार्हता टिकून आहे, असे प्रतिपादन जेष्ठ संपादक माधव गोखले यांनी केले.

मराठी पत्रकार दिनानिमित्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाच्या वतीने ‘मुद्रित माध्यमे ः आज आणि उद्या’ या विषयावर साप्ताहिक सकाळचे कार्यकारी संपादक माधव गोखले यांचे शुक्रवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरु डॉ. गीताली टिळक, मास कॉम विभागाचे प्रमुख डॉ. केशव साठये यावेळी उपस्थित होते.

गोखले म्हणाले, तंत्रज्ञान, बाजारपेठा व ज्ञानशाखेत वेगाने बदल होत असून दिवसेंदिवस विकसित होत आहे. त्याबरोबर माध्यमांनादेखील आपल्यात बदल करावा लागत आहे. वृत्तवाहिन्या, डिजिटल माध्यमांनी वेगाने बदल केला असल्याने क्षणात बातमी लोकांपर्यंत पोहचते. त्यामुळे मुद्रित माध्यमे बंद पडणार का? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. मात्र आजही लोकांची मुद्रित माध्यमांवर विश्वासार्हता कायम आहे. अनेकजण ही बातमी छापून आलेली असून ती तपासून पाहा, असा खुलासा देतात. वास्तव, वस्तुनिष्ठता व समतोल सांभाळून मुद्रित माध्यमांना काम करावे लागते. तसेच व्यावसायिक व सामाजिक बांधिलकी सांभाळून माध्यमांना काम करावे लागणार असल्याचे यावेळी गोखले यांनी सांगितले. पत्रकारांनी येत्या काळात विविध कौशल्ये, भाषाशैली व प्रारुपे आत्मसात करण्याची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा आपली बुद्धिमत्ता वापरावी असा सल्‍ला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. समर्पक माहिती, मांडण्याचे तंत्र, विश्‍लेषण, कमी भाषेत व्यक्‍त होण्याचे तंत्र पत्रकारांनी समजून घेतले पाहिजे. समाजाच्या भल्यासाठी शोध पत्रकारिता, विश्वसनीय बातमी तसेच विरोधाची भूमिका आपल्याला घेता आली पाहिजे. तंत्रज्ञानाबरोबर आपल्याला जळवून घेण्याची कला अवगत करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असेही यावेळी त्यांनी नमू केले.

डॉ. गीताली टिळक म्हणाल्या, लोकमान्यांनी काळानुरुप ‘केसरी’त बदल केला होता. त्याच विचारावर आजही केसरीने बदलत्या तंत्रज्ञानानुसार बदल केले आहेत. भाषाशैली, नैतिकता, शब्दांचा वापर, प्रत्येक विषयांतील ज्ञान आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी खोलवर अभ्यास केला पाहिजे, असा सल्‍ला यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. केशव साठये यांनी केले. अनुजा पालकर यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. नूतन काणेगावकर यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा