जुन्या पेन्शनचा वाद

सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना जुन्या पेन्शन योजनेनुसार पेन्शन सुरू ठेवल्यास राज्याच्या तिजोरीवर 1.10 लाख कोटी रुपयांचा बोजा पडेल आणि राज्य सरकारचे दिवाळे निघेल, अशी कारणे देत जुनी पेन्शन योजना सुरू न करण्याचे जाहीर केले आहे. एकीकडे निवृत्त सरकारी कर्मचारी आणि शिक्षक वर्ग यांची घोर निराशा झाली, तर दुसरीकडे सरकारने पैशांची बचत झाल्याचे समाधान व्यक्त केले आहे. त्याचवेळी विनाअनुदानित शाळांना दिले जाणारे अनुदान वाढवून 40 टक्के केले, शाळांच्या वाढत्या संख्येमुळे अनुदानाची रक्कम 5 हजार कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली. त्यामुळे आता अनुदानित शाळांना परवानगी दिली जाणार नाही हा निर्णय खटकणारा आहे. राज्याच्या तिजोरीवर पडणार्‍या बोज्याची सध्याच्या सरकारला एवढी काळजी वाटत असेल, तर आमदार, खासदार यांचे वेतन आणि त्यांना मिळणारी पेन्शन यांत देखील घट करण्याचे धाडस करावे. सरकारी कर्मचारी व शिक्षकवर्ग आपले आयुष्य सरकारच्या सेवेत घालवितात आणि एखादी टर्म लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले संसद, विधानसभा सदस्य मात्र तहहयात पेन्शनचा लाभ घेतात. जनतेकडून कर आकारणी करून जमा झालेले उत्पन्न सरकारची प्रामाणिकपणे सेवा करणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांना त्यांच्या निवृत्तीपश्‍चात आयुष्य किमान गरजा भागविण्यापुरती रक्कम पेन्शनच्या रूपात देताना तिजोरी रिकामी होईल याची जाणीव होते. मात्र, आपले निवृत्ती वेतन घेताना त्याच तिजोरीवर किती ताण पडत असतो याचा विचार करावासा का नाही वाटत ? लोकप्रतिनिधी या जबाबदारीने घेतलेले काही निर्णय चुकीचे ठरतात तेव्हा जनतेच्या पैशांचा विनियोग योग्य प्रकारे केला जात नाही, त्याची जबाबदारी कोणाची?

स्नेहा राज, गोरेगांव

महामार्गांच्या कथा नि व्यथा

मुंबई-पुणे या दोन महानगरांना जोडणारा 95 किमीचा द्रुतगती महामार्ग सुरू झाल्या पासून म्हणजे 2002 पासून पाच हजारांपेक्षा अधिक अपघात झाले असून, त्यात 1 हजार 400 प्रवाशांचा बळी गेल्याचे नुकतेच विधानसभेत सांगण्यात आले. दुसरीकडे 577 किमीच्या व गेली 12 वर्षे रखडलेल्या आणि जागोजागी जीवघेण्या खड्ड्यांनी भरलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर 2012 ते 2022 या 10 वर्षांच्या कालावधीत एकूण 6 हजार 692 अपघात झाले असून, त्यात 1 हजार 512 लोकांना आपला जीव नाहक गमवावा लागला आहे आणि नुकत्याच सुरू झालेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे म्हणजे 520 किमीच्या नागपूर ते शिर्डी महामार्गाचे उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या 10 दिवसांत 30 अपघात झाले आणि त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. म्हणजे एकीकडे सुसज्ज असलेल्या महामार्गांवर नियमांचे उल्लंघन करून सुसाट वेगाने धावणार्‍या वाहनांमुळे होणारे जीवघेणे अपघात, तर दुसरीकडे कोकणातल्या राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने अपघातात होणारी जीवितहानी. एकूणच काय तर या तीन महामार्गांच्या रस्त्यांची परिस्थिती कशीही असो, अपघातांचे आणि त्यात शेकडो निष्पाप नागरिक मृत्यू पावण्याचे सत्र काही थांबत नाही.

प्रदीप शंकर मोरे, मुंबई

सतर्कता हवी, हेळसांड नको !

करोनाचा कठोर, कटू, कधीही विसरता न येणारा असा जीवघेणा पाहिलेल्या, अनुभवलेल्या आठवणीने आजही जीवाचा थरकाप होतो आणि या जखमा आजही बर्‍या झालेल्या नसताना कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला, त्याचा विळखा वाढू लागलाय ही बातमी धडकी भरवणारी आहे आणि म्हणूनच हीच वेळ आहे त्याला सुरुवातीपासूनच आपल्यापर्यंत आणून न देण्याची त्या साठी काटेकोरपणे प्रत्येकाने सर्तक राहणे निकडीचे आहे, वैद्यकीय पेशातील तज्ज्ञांचे, शासनाचे आदेश नियम आणि प्रतिबंधक मार्ग, साधने आदींचे काटेकोरपणे पालन करणे महत्त्वपूर्ण आहे स्वतःसाठी कुटुंबासाठी, समाजासाठी. मला काय त्याचे ही वृत्ती अजिबात नको ती घातक ठरवू शकते.

विश्वनाथ पंडित, चिपळूण

कर्करोगाचे प्रमाण वाढले…धोक्याची घंटा !

भारतीय आयुर्विज्ञान संस्था व नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मटिक्स अँड रिसर्च सेंटर यांनी संयुक्तपणे अहवाल प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये कर्करोगाविषयी भारतात होणार्‍या आगामी काळातील धोक्याबाबत इशारा दिला आहे. या अभ्यासामध्ये भारतातील दर दहा व्यक्तीमागे एका व्यक्‍तीला कर्करोग होण्याची किंवा त्याच्या जीवनप्रवासात कर्करोगाची बाधा होण्याची भीती व्यक्त होत आहे. या हिशोबाने 2022 च्या अखेरीस वर्षभरात 14 लाख 60 हजार नागरिकांना कर्करोगाने ग्रासले जाण्याची भीती व्यक्त होत आहे. असे का व्हावे ? प्रदूषणाची वाढती पातळी, बदलती जीवनशैली या मुळे भारतीयांचे आरोग्य धोक्यात जात आहे. अनेक भाज्या दूषित आहेत. तसेच, अनेक वाहनांमुळे हवेत प्रदूषण वाढत आहे. जवळ जवळ सर्वच नद्या गटारगंगा झाल्या आहेत. वाढते नागरीकरण व औद्योगिकीकरण यामुळे सांडपाणी नदीत मिसळत आहे. ही सर्व कारणे आरोग्याला धोकादायक आहेत. यामुळे यापुढील जीवन आरोग्यमय असावे, ही केवळ इच्छा असून उपयोगी होणार नाही. त्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतील. त्या दृष्टीने आगामी काळ अत्यंत महत्त्वाचा असेल.

शांताराम वाघ, पुणे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा