फेरफटका : प्रा. विकास देशपांडे
देशाच्या राजकारणाचे रागरंग किती बदलते असतात, याचा नमुना 2022 ची अखेर होत असताना अनुभवण्यास मिळत आहे. राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहे. याचा स्वाभाविक परिणाम केंद्र सरकारवर होत असून, सत्ताधार्यांमध्ये चलबिचल जाणवत असल्याचे दिसते.
कोविड 19 ची ‘नवी साथ’ येईल अशी मांडणी केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांच्याकडून करण्यात आली आहे, त्यासाठी चीनमध्ये अशी लक्षणे जनतेत मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत, असा इशारा देण्यात आला. मात्र चीनमध्ये साथीची लक्षणे जवळपास नियंत्रणात असून, रोजचे व्यवहारसुद्धा सामान्यपणे चालू आहेत, असे तेथील भारतीय विद्यार्थ्यांच्या हवाल्याने सांगितले जाते यामुळे सरकारने एकदम ताक फुंकून पिण्याची भूमिका का घेतली, याबाबतचे तर्क-वितर्क सुरु झाले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तर म्हणाले, की राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो अभियानास’ जे व्यापक जनसमर्थन मिळत आहे, तिकडून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठीच केंद्र सरकारकडून कोविडच्या ‘नव्या अवतारा’बाबत बोभाटा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारकडून रास्त माहिती जनतेला मिळावी अशी अपेक्षा असते; मात्र वृथा भय निर्माण करणे योग्य ठरणार नाही.
राहुल यांची यात्राही ठरल्यानुसार सुरू आहे. राजधानी दिल्लीत यात्रा दाखल झाल्यानंतर अभिनेते हासन, प्रकाश राज, खा. खरगे, काँग्रेस नेते वेणुगोपाल आणि राहुल यांची लाल किल्ल्यावर सभा झाली. या पार्श्वभूमीवर कमल हासन व त्यांचा ‘मक्कल निधी मायम’ पक्ष तामिळ राजकारणात काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या ‘द्रमुक’च्या निकट जाईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दिल्लीतील ‘भारत जोडो’ यात्रेच्या कार्यक्रमांतर्गत राहुल गांधींनी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, शास्त्रीजी, इंदिराजी आणि राजीव गांधी यांच्यासह अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृती-स्थलांवर जाऊन आदरांजली अर्पण केली. या माध्यमातून त्यांनी आपली शालीनता आणि प्रतिष्ठा यांचे दर्शन घडविले. आता यामध्येही काही महाशयांना राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न दिसत असेल, तर त्यांच्या समजुतीच्या खुजेपणाची कीव करावी लागेल.
उत्तर सीमेवरील भारत-चीन तणाव कायम आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यानी नुकतेच निवेदन केले, की आमचा देश भारताशी स्थिरताधारित संबंध विकसित व्हावेत म्हणून काम करण्यास तयार आहे. दोन्ही देशांच्या सहमतीने तयार झालेली ही यंत्रणा अधिक दृढ व कार्यरत होणे गरजेचे आहे. चीन-पाकिस्तान यांची सैनिकी व कूटनीतिक जवळीक वाढू देणे भारताच्या हिताचे नाही हे ध्यानात ठेवून पुढील वाटचाल होणे आवश्यक आहे. नेपाळमध्ये आता कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळच्या सांसदीय गटाचे नेते पुष्प कमल दहल ऊर्फ प्रचंड हे पंतप्रधान झाले आहेत. भारताला नेपाळबरोबरचे संबंधही सामान्य स्थिर व मैत्रीपूर्ण असावेत, याकडे लक्ष द्यावे लागेल !
भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीकडेही लक्ष ठेवावे लागत असून, या पक्षाने 144 ते 160 ‘संवेदनशील’ मतदारसंघांची यादी तयार केली आहे. यावरून भाजप सावध असून शिवसेना व संयुक्त जनता दल हे मित्र पक्ष यापुढे सोबतीस असणार नाहीत, हे गृहीत धरून पक्षाने रणनीती तयार करण्यास सुरुवातही केली आहे.
काँग्रेसही निवडणूक आघाडी व आपली प्रतिमा यांबाबत सक्रिय व अधिक जागरूक दिसत आहे. पक्षाच्या अध्यक्षीय निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांना आरूढ करून पक्षाने ‘गांधी परिवाराची पक्षावर पकड आहे,’ या भाजपच्या आक्षेपास उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटकातील आगामी निवडणुकीत नूतन अध्यक्ष खरगे आपल्या गृह-राज्यात कशी कामगिरी करतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष राहील.