श्रीशा वागळे

पेले… फुटबॉलविश्‍वातल्या सार्वकालिक महान फुटबॉलपटूंपैकी एक. पेले यांनी फुटबॉलला वेगळ्या उंचीवर नेलं. त्यांनी ब्राझीलला तीन विश्‍वचषक जिंकून दिले. पेले म्हणजे फुटबॉलचा जादूगार. अत्यंत गरीबीतून वर आलेल्या या खेळाडूने फुटबॉलच्या मैदानातल्या कामगिरीने संपूर्ण जगाला वेड लावलं. असा हा महान फुटबॉलपटू हे जग सोडून गेला आहे. पेले यांच्या निधनाने फुटबॉलच्या एका युगाचा अंत झाला आहे.

पेले यांची गणना फुटबॉल जगतातल्या सार्वकालिक महान खेळाडूंमध्ये केली जाते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले. पेले चार फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धा खेळले. त्यापैकी तीन स्पर्धांमध्ये त्यांनी ब्राझीलला विश्‍वविजेतेपद मिळवून दिले. फुटबॉल म्हणजे पेले आणि पेले म्हणजे फुटबॉल असं समीकरणच बनून गेलं होतं. पेले यांनी फुटबॉलला वेगळ्या उंचीवर नेलं. पेले युग सुरू होण्याआधी फुटबॉल हा फक्‍त एक खेळ होता. पण त्यांनी या खेळात कलात्मकता आणली. त्यांचा मैदानातला वावर प्रतिस्पर्ध्यांच्या मनात धडकी भरवण्यासाठी पुरेसा होता. पेले यांचा जन्मच फुटबॉल खेळण्यासाठी झाला होता. एक महान फुटबॉलपटू होणं त्यांच्या लल्‍लाटी लिहिलं होतं. खुद्द पेले यांनीही आपण फुटबॉल खेळण्यासाठीच जन्मल्याचं म्हटलं होतं. पेले हे फुटबॉलमधलं अद्वितीय असं व्यक्‍तिमत्त्व. एडसन एरंटेस डो नासिमेंटो हे पेले यांचं मूळ नाव. थोर शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांच्या नावावरून पेले यांचं नाव ठेवण्यात आलं. एडिसन यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात मोठं नाव कमावलं तर पेले थोर फुटबॉलपटू झाले.

23 ऑक्टोबर 1940 रोजी ब्राझीलमधल्या मिनास गेराइसमध्ये पेले यांचा जन्म झाला. हा लहानगा फुटबॉलच्या गुणवत्तेच्या बळावर अवघं जग कवेत घेईल, याचा तेव्हा कोणी विचारही केला नसेल. पेले यांचं बालपण गरीबीत गेलं. त्यांचे वडील सफाई कामगार होते. वडिलांनाही फुटबॉलची आवड होती. ते ब्राझीलमधल्या फ्लुमिनीज क्लबकडून फुटबॉल खेळले होते. पण आर्थिक तंगीमुळे त्यांना फुटबॉल सोडून सफाईचं काम करावं लागलं. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत पेले यांनीही लहानपणापासूनच फुटबॉल खेळायला सुरूवात केली. अनेक लहान मुलांप्रमाणे तेही ब्राझीलच्या साओ पावलोच्या गल्ल्यांमध्ये फुटबॉल खेळायचे. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना चहाच्या टपरीवरही काम करावं लागलं. त्यांनी तेही केलं. गरीबीमुळे त्यांच्याकडे फुटबॉल घेण्याइतकेही पैसे नव्हते. त्यांच्याकडे बूटही नव्हते. म्हणून मग ते मोज्यांमध्ये कागदाचे तुकडे घालून दोरी बांधून खेळत असत. लहानपणापासूनच त्यांनी संघर्ष पाहिला. पण कधीही हार मानली नाही. याच संघर्षाने त्यांच्या महानतेचा पाया रचला. फुटबॉल हाच त्यांचा श्‍वास होता, ध्यास होता. फुटबॉल त्यांचं सर्वस्व होतं. डिको हे पेले यांचं टोपणनाव. घरातले त्यांना याच नावाने हाक मारायचे.

अगदी लहान वयातच पेले फुटबॉलमध्ये चमकू लागले. वयाच्या पंधराव्या वर्षीच ते घरापासून लांब सँटॉसला गेले. तिथल्या सँटॉस एफसी या क्लबसोबत त्यांनी करार केला. त्यांच्या कौशल्याने सँटॉस एफसी क्लबचे तत्कालिन प्रशिक्षक लुला खूपच प्रभावित झाले. तेव्हापासूनच माध्यमांनी त्यांना डोक्यावर घ्यायला सुरूवात केली. त्यांना भविष्यातला सुपरस्टार म्हटलं जाऊ लागलं. पेले महान फुटबॉलपटू होणार याची जाणीव लोकांना होऊ लागली होती. पेले यांची मैदानातली कामगिरीच याची ग्वाही देत होती. पेले थांबायला तयार नव्हते. ते गोल करत होते. या मुलाची गुणवत्ता हेरून ब्राझीलच्या राष्ट्रीय संघात स्थान देण्यात आलं. त्यावेळी पेले अवघ्या 17 वर्षांचे होते. पेले यांनी 1958 च्या आपल्या विश्‍वचषकात धमाल उडवून दिली. त्यांनी उपउपांत्य फेरीतल्या वेल्सविरुद्धच्या सामन्यात विश्‍वचषकातला पहिला गोल केला होता. एवढ्या कमी वयात फुटबॉल विश्‍वचषकात गोल करणारे ते पहिलेच खेळाडू होते. यानंतर फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांनी गोल्सची हॅटट्रिक नोंदवली. त्यावेळी त्यांचं वय फक्‍त 17 वर्षं आणि 244 दिवस होतं. 1958 मध्ये ब्राझीलला विश्‍वविजेता बनवण्यात पेले यांचा महत्त्वाचा वाटा राहिला.

खेळाच्या मैदानात पेले यांच्या महानतेची प्रचिती वारंवार येत राहिली. त्यांनी आपल्या देशाला 1962 मध्ये पुन्हा विश्‍वविजेतेपद मिळवून दिलं. गोल्सची हॅटट्रिक करणार्‍या पेले यांना ब्राझीलच्या विश्‍वविजयाची हॅटट्रिक करता आली नाही. 1966 चा विश्‍वचषक जिंकण्यात त्यांना अपयश आलं. पण 1970 मध्ये पेले यांनी पुन्हा कमाल केली आणि ब्राझीलला विश्‍वविजेतेपद मिळवून दिलं. आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत पेले एकूण 1363 फुटबॉल सामने खेळले आणि 1281 गोल केले. या काळात ते ब्राझीलकडून 92 सामने खेळले आणि 77 गोल केले. 19 नोव्हेंबर 1969 या दिवशी पेले यांनी एक हजारावा गोल केला. त्यावेळी त्यांच्या चाहत्यांनी एकच जल्‍लोष केला. पन्‍नाशीच्या दशकापासून सत्तरीच्या दशकापर्यंत पेले यांनी फुटबॉल विश्‍वावर अधिराज्य गाजवलं. या काळात ते जागतिक फुटबॉलचे अनभिषिक्‍त सम्राट बनले. या काळात ते फुटबॉल विश्‍वातले सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारे खेळाडू होते. पेले यांनी विश्‍वचषक स्पर्धेतल्या चौदा सामन्यांमध्ये एकूण बारा गोल केले. त्यांच्यासारख्या गुणवान खेळाडूला युरोपियन क्लब्जनी हेरले नसते तरच नवल. त्यांना युरोपमधल्या प्रतिष्ठित आणि लोकप्रिय क्लब्जकडून खेळण्याचे अनेक प्रस्ताव आले. मात्र पेले यांनी ते स्वीकारले नाहीत.

पेले यांच्या खेळाची अनेक वैशिष्ट्ये होती. त्यांना इतर खेळाडूंच्या चालीचा अचूक अंदाज यायचा. त्यांचं चेंडूवर अचूक नियंत्रण होतं. त्यांची किक सहसा चुकत नसे. याच अचूकतेने त्यांना महान फुटबॉलपटू बनवलं. पेले चेंडू पायात खेळवायचे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना त्यांच्या चालीचा अंदाज यायचा नाही. ते प्रतिस्पर्ध्याच्या गोलकक्षात धडकून गोल करायचे. पेले यांनी ‘बायसिकल किक’ हा प्रकार लोकप्रिय केला. फुटबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धांपेक्षा क्लब तसंच लीग स्पर्धांना अधिक महत्त्व असतं. पेले यांनी आपल्या सँटॉस या क्लबसाठी नऊ साओ पावलो लीग स्पर्धा जिंकल्या. पाच फूट आठ इंच उंच असणारे पेले फक्‍त 11 सेकंदात 100 मीटर धावू शकायचे. दोन्ही पायांनी शूट करण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. पेले यांनी 1971 मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा केलं. पण त्यानंतरही ते क्लब फुटबॉल खेळत राहिले. त्यांनी 1977 मध्ये म्हणजेच वयाच्या 36 व्या वर्षी सर्व प्रकारच्या फुटबॉलमधून निवृत्ती पत्करली. त्यांनी अखेरचा काही काळ अमेरिकेत घालवला. सँटॉस क्लबनंतर ते न्यूयॉर्कमधल्या न्यूयॉर्क कॉसमॉस संघाकडून खेळले. हा त्यांचा पहिलाच आंतरराष्ट्रीय क्लब. पेले यांनी अमेरिकेत राहून 64 सामने खेळले आणि 37 गोल केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा