वळणावरचे पंख

प्रिय शालामाऊलीस,
निवृत्तीचं हळवेपण वाटून घेऊ कशाला?
सांजवलेलं ऊन आहेच की सोबतीला
तुला प्रथम भेटताना
मूठ होती स्वप्नकळ्यांची
क्षणाक्षणानी उमलत गेली
ओंजळ भरली आज फुलांची
माझी मुलं, माझा वर्ग,
माझं पुस्तक, खडू फळा
नकळत जडला जीव तयांवर
दाटून येई आज गळा
शिकत गेले, शिकवत गेले
जगण्याचे ही भान आले
बालपणीच्या मलाच मीही
रोज नव्याने शोधत गेले
इथेच स्फुरल्या कविता कितीदा
प्रतिभेला ही पंख नवे
सहकार्‍यांचे प्रेम लाभले
मैत्र जुळूनी तुझ्यासवे
माझी चित्रं, माझी गाणी
फुलली इथल्या मुलांसवे
आठव त्यांचे कधी न पुसतील
येतच राहो नवे थवे
घडा भरुनी आनंदाचा
जरी थबकले माझे पाऊल
मनास वाटे फिरुनी घ्यावी
शाळेच्या घंटेची चाहूल!

  • शिल्पा शिरीष चिटणीस
    लोकमंगल हायस्कूल, गेंडामाळ, सातारा.
    मो. 7588865053.

संधिकाल..

संधिकाली अस्वस्थ अशा,
कुठली हुरहूर, कोणती आशा?
उचलू पाऊल विश्वासाने,
उमलतील तळहात रेषा!
फेर धरती रंग कालचे
आभा उजळे आकाशा
अस्तित्व क्षण, मेळविते
मन अंतरीची, भाषा….!
संकल्प नवे, अधरांवरती
वळणावर या निर्णयशा
दिवस, वर्ष गणती कसली?
हास्य खुलवी नव-रूपरेषा….!

  • कविता मेहेंदळे, मो. 9326657027

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा