वास्तव सुधारण्यासाठी सर्वांचेच योगदान हवे

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी एका कार्यक्रमात बोलताना घाणेरडे रस्ते, भ्रष्टाचार व प्रदूषण हे भारतातील वास्तव आहे अशी खंत व्यक्त केली. तरुणांनी समाजात बदल घडवून आणताना वैयक्तिक स्वार्थापेक्षा सार्वजनिक, सामाजिक आणि राष्ट्रहिताला प्राधान्य दिले पाहिजे. निःस्वार्थी आणि प्रेरणादायी उद्योजकांकडून प्रेरित होऊन प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःतील नेतृत्व जागृत करताना समोर येणार्‍या उणिवा दूर करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असा सल्ला त्यांनी दिला. भारतातील गरिबी दूर करण्यासाठी आणि कमी सुविधा असलेल्यांना मदत करण्यासाठी नोकर्‍या निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तरुणांनी वास्तव सुधारण्यासाठी सिंगापूरच्या स्वच्छ रस्त्यांचे उदाहरण दिले. स्वच्छ रस्त्यांमुळे तेथे प्रदूषण होत नाही, तर ऊर्जा निर्माण होते असे त्यांनी पुढे म्हटले आहे. भारतातील वास्तवावर रोख ठेवून खरा विकास साधण्यासाठी प्रत्यक्ष काय करण्याची गरज आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थांना संबोधित करताना त्यांनी उल्लेखिलेल्या गोष्टींचा अन्वयार्थ फक्त विद्यार्थ्यांनी नव्हे, तर तरुणांनी आणि राज्यकर्त्यांनी समजून घेणे अपेक्षित आहे.

स्नेहा राज, गोरेगाव

व्यावहारिक ज्ञानाचे महत्त्व

ज्या काळात आम्हाला (आपल्याला) शिक्षण मिळाले (साधारणपणे 1970-2000) तेव्हाची आणि आजची शिक्षणपद्धती पूर्णपणे बदललेली आहे. जिथे आम्ही (आपण) शिक्षण आनंदाने अंगीकारले, तिथे आजचे विद्यार्थी शिक्षणाला स्वतःचे ओझे बनवतात, याची अनेक कारणे असू शकतात. काही विद्यार्थ्यांच्या पातळीवर तर काही शैक्षणिक संस्थांच्या (धोरणांच्या) पातळीवर. माझ्या मते आजच्या शिक्षणपद्धतीत सर्वप्रथम व्यावहारिक ज्ञानाला अधिक महत्त्व द्यायला हवे. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे मुलांना नैतिक आणि मूलभूत ज्ञान देणे आवश्यक आहे. दुसरी बाब म्हणजे विद्यार्थ्यांना हसतखेळत शिकवले पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या अभ्यासक्रमात किंवा त्यांना शिकवण्याच्या पद्धतीत दृक-श्राव्य माध्यमाचा अधिक वापर व्हायला हवा. अनेक वेळा विद्यार्थ्यांना लेखन-वाचनाच्या प्रक्रियेचा कंटाळा येतो. अशा स्थितीत ऑडिओ-व्हिडिओ तंत्रज्ञानाची मदत घेतल्यास त्यांच्या शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण होईल.

प्रा. विजय कोष्टी, कवठे महांकाळ

हा तर राजकीय डाव

राज्य सरकारने कथित ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी कायदा करण्याचा मानस व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत योगी सरकारने ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करण्याचे सूतोवाच केले होते जे प्रत्यक्षात अवतरले आहे. उत्तर प्रदेश सरकार पाठोपाठ आता महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकारने लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याचा जो मानस व्यक्त केला आहे, त्यातून गुजरात, उत्तर प्रदेश पाठोपाठ पुरोगामी महाराष्ट्राला ‘हिंदुत्वाची प्रयोगशाळा’ करण्याचा राजकीय डाव आहे का, अशी शंका येते. एखाद्या व्यक्तीच्या मानसिकतेचा ‘लव्ह जिहाद’शी संबंध जोडून कायदा बनवायचा झाला तर ‘व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’ या न्यायाने कायदे बनवावे लागतील. बहुसंख्य भारतीय लोक धार्मिक कडवे नव्हते आणि आजही नाहीत; पण धर्माचा वापर करून एकगठ्ठा मते मिळवणे राजकारण्यांना सोपे जाते. बहुसंख्याकांत भय, असुरक्षितता वाढवणे हे राजकीय फायद्याचे असते.

बाळकृष्ण शिंदे, पुणे

शाईफेक दुर्देवी

अलीकडेच एका मंत्री महोदयांवर आणि एका आमदार महाशयांवर शाईफेक झाल्यानंतर सुरक्षिततेचा उपाय म्हणून विधानभवन परिसरात शाईपेनांवर बंदी घालण्यात आली आहे. खरे तर कोणतेही राजकीय आंदोलन करताना, आंदोलनाचे अनेक मार्ग उपलब्ध असताना, कोणावरही शाई फेकणे हे पूर्णतः चुकीचेच आहे. त्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येऊ शकत नाही; परंतु सध्याच्या उन्मादाच्या घसरलेल्या राजकारणात सर्वत्र परस्पर सामंजस्य, सहिष्णुता, तादात्म्य, सर्वसमावेशक भावना नष्ट झाल्या असून, समोरच्याला नामोहरणम करण्यासाठी ‘शाईफेक’सारख्या अस्त्राचा वापर होत आहे, हे दुर्दैवी म्हणावे लागेल.

प्रदीप शंकर मोरे, मुंबई

समाजमाध्यमांचे अतिक्रमण

सोशल मीडिया सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर दिवसेंदिवस वेगाने अतिक्रमण करू पाहत आहे. व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक, यांशिवाय सकलजनाचे जगणे मुश्किल झाले असल्याचे दिसत आहे. पूर्वी बाहेर पडल्यावर किती जणांचे हात आपल्याला पाहून नमस्कार करण्यासाठी वर होतात यावर आपला मान-सन्मान अवलंबून. असे आता फेसबुक व व्हाट्सअ‍ॅपवर किती अधिक लाईक्स किंवा कमेंट येतात यावर आपली ‘पत’ मोजली जाते काय, अशी शंका येते. या ‘लाईक्स’ अन् ‘कमेंट’ अधिकाधिक मिळवण्याचा अट्टहास एवढा, की ‘मानापमान’ नाटके रंगत आहेत. त्यामुळे माणसे माणसापासून दुरावत चाललीत. या प्रवृतीचा अभ्यास अमेरिकेच्या कारनेल विद्यापीठातील संशोधकाने केला. त्यातून माणसे माणसाला दुरावतात, पश्चात्तापाला सामोरे जातात, असे वास्तव समोर आले आहे. या माध्यमाचा वापर मर्यादित व खेळीमेलीचा असावा, हे सत्य पुढे आले असल्याचे वाचले आहे. वेळीच सावध होणे, सोशल माध्यमाचा अतिरेक टाळणे काळाची गरज आहे.

शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा