सर्वकाळातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेले ब्राझीलचे दिग्गज खेळाडू पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांच्या मुलीने गुरुवारी रात्री उशिरा इन्स्टाग्रामवर दुजोरा दिला. कर्करोगाशी झुंज देत असलेल्या ब्राझीलच्या माजी फुटबॉलपटूने उपचारांना प्रतिसाद देणे बंद केले होते. या महिन्याच्या सुरुवातीला त्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि नंतर त्यांना श्वसन संक्रमण झाल्याचे निदान झाले. पेले यांच्या निधनामुळे संपूर्ण जगात शोककळा पसरली आहे.

तीन फिफा विश्वकरंडक जिंकणारे जगातील एकमेव खेळाडू पेले

१९४० मध्ये जन्मलेल्या पेले यांनी वयाच्या १५ व्या वर्षी सॅंटोस क्लबसाठी आणि नंतर वयाच्या १६ व्या वर्षी ब्राझीलसाठी पदार्पण केले. त्यानंतर पेलेंनी संपूर्ण जगाला फुटबॉलचे धडे दिले. आपल्या कारकिर्दीत एकूण १२७९ गोल करणारा महान फुटबॉलपटू पेले जगाला फुटबॉल शिकवत गेला. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

१९९९ मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (International Olympic Committee) त्यांना शतकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडले. पेलेसारखे खेळाडू शतकात एकदाच घडतात, पण इथवरचा प्रवास त्यांचाही काही सोपा नव्हता. कदाचित, चहाच्या दुकानात काम करत असताना त्यानिही आपण शतकातील महान फुटबॉलपटू होईल याची कल्पना देखील केली नसेल. पेले होणं अजिबात सोपं नाही. त्यान्हची संपूर्ण माहिती कारकीर्द आणि आज पर्यंतचा प्रवास जाणून घेऊ.

चहाच्या दुकानात काम करायचे पेले

२३ ऑक्टोबर १९४० रोजी ब्राझीलमध्ये जन्मलेले पेले कमाईसाठी चहाच्या दुकानात काम करायचे. त्यांना लहानपणापासूनच फुटबॉलची आवड होती. सुरुवातीच्या काळात ते अनेक संघांसोबत खेळले. त्यांनी २ यूथ स्टेट चॅम्पियनशिपमध्ये बौरू ऍथलेटिक क्लब ज्युनियर्सचे नेतृत्व केले.

इनडोअर फुटबॉलने सुरू झाला प्रवास

पेलेंच्या महानतेचा प्रवास इनडोअर फुटबॉलने सुरू झाला. ते एका संघात सामील झाले आणि त्यानंतर इनडोअर फुटबॉल देखील खूप लोकप्रिय झाले. आपल्या भागातील पहिली फुटसल स्पर्धा जिंकणाऱ्या संघाचाही ते एक भाग होते. पेले आणि त्यांच्या संघाने पहिले विजेतेपद जिंकले आणि येथूनच शतकातील महान खेळाडू होण्याच्या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात झाली.

विश्वचषक जिंकणारा सर्वात तरुण फुटबॉलपटू

वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत पेले फुटसल खेळत राहिले. यानंतर वयाच्या १५ व्या वर्षी सॅंटोस क्लबच्या वतीने पदार्पण केले आणि फुटबॉलच्या जगात पाऊल ठेवलं. एका वर्षानंतर, पेले यांनी ब्राझीलच्या राष्ट्रीय संघात प्रवेश केला आणि त्यांच्या प्रवेशाच्या एका वर्षानंतर, पेले विश्वचषक जिंकणारा जगातील सर्वात तरुण फुटबॉलपटू बनला. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

तीन फिफा विश्वकरंडक जिंकणारे जगातील एकमेव पेले

फुटबॉलमधील ग्रेट या शब्दाचा उगम पेले यांच्यापासून झाला. ब्राझीलच्या एका छोट्याशा भागातून आलेल्या पेलेने जगामध्ये फुटबॉलची व्याख्याच बदलून टाकली. पेलेने ब्राझीलला तीन वेळा जगज्जेते बनवले. त्यांच्या नेतृत्वाखाली ब्राझीलने १९५८, १९६२ आणि १९७० मध्ये विश्वचषक जिंकला होता. आतापर्यंत कोणीही त्याच्यापेक्षा जास्त वेळा विश्वचषक जिंकलेला नाही. पेले यांनी एकूण चार विश्वचषक खेळले.

१९५८ च्या फिफा विश्वचषकात सुदानविरुद्ध विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने दोन गोल केले. पेलेने आपल्या कारकिर्दीत एकूण १३६३ सामने खेळले आणि १२८१ गोल केले. त्याने ब्राझीलसाठी ९२ सामन्यात ७७ गोल केले. पेले १९७१ मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त झाले.

१९५८ च्या विश्वचषकात वयाच्या १७ वर्षे वेल्सविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने पहिला विश्वचषक गोल केला. अशाप्रकारे या स्पर्धेत सर्वात तरुण गोल करणारे फुटबॉलपटू पेले ठरले. १९५८ च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त्यांनी १७ व्या वर्षी वयाच्या फ्रान्सविरुद्ध हॅट्ट्रिक केली होती. यासह पेले हॅटट्रिक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. पेलेने अंतिम फेरीतही गोल करून आपल्या संघाला विश्वविजेता बनवले. वयाच्या १८ व्या वर्षापूर्वी फिफा विश्वचषकात गोल करणारा पेले हा जगातील एकमेव खेळाडू आहे.

दोन वर्षांत १०० हून अधिक गोल करण्याचा विक्रमही पेलेच्या नावावर आहे. त्याने १९५९ मध्ये १२७ आणि १९६१ मध्ये ११० गोल केले होते. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला आणि एकमेव खेळाडू आहे. झांबियाचा फुटबॉलपटू गॉडफ्रे चितलू याने १९७२ मध्ये क्लब आणि देशासाठी १०७ गोल निश्चितच केले, परंतु पेलेप्रमाणे दोन वर्षे १००+ गोलचा टप्पा गाठू शकला नाही.

पेले यांची भारत भेट

महान फुटबॉलपटू यांच्या भारतातील काही आठवणी आहेत. २५ सप्टेंबर १९७७ हा दिवस होता प्रसिद्ध पेले भारतीय संघ मोहन बागानसोबत मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी आले होते. त्याच्या चाहत्यांनी कोलकाताचे रस्ते अडवले. त्यावेळी दूरदर्शन, वर्तमानपत्रे, मासिके त्यांच्या बातम्यांनी भरलेली होती.

ब्राझीलला तीन विश्वचषक जिंकून देणारे फुटबॉलपटू पेले निवृत्तीपूर्वी भारताला भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळस लोकांची खुप गर्दी झाली होती. त्यानंतर त्यांचा सामना पीके बॅनर्जी आणि कर्णधार सुब्रतो भट्टाचार्य यांच्यासमवेत तत्कालीन प्रसिद्ध फुटबॉल संघ मोहन बागान संघाशी झाला. ऐतिहासिक त्या मैत्रीपूर्ण सामन्यात मोहन बागानने पेलेच्या कॉसमॉस क्लबच्या विजय रथला 2-2 अशा बरोबरीत रोखले.

२५ सप्टेंबर १९७७ रोजी पेले मैदानात असताना त्यांचे चाहते स्टेडियमच्या आत पेले-पेले असा जयघोष करत होते. मैदानाबाहेरही लोकांची गर्दी होती. फुटबॉल इतिहासकार नोवी कपाडिया यांनी त्यांच्या ‘बेअरफूट टू बूट्स’ या पुस्तकातील काही क्षण आठवले. दिग्गज ब्राझीलचा फुटबॉलपटू पेले विमानतळाबाहेर पडताच त्यांचे स्वागत करण्यासाठी लाखो लोक जमले होते, असे त्यांनी पुस्तकात नमूद केले आहे. त्यांनी पुस्तकात पुढे नमूद केले आहे की कोलकाता येथील त्यांच्या हॉटेलबाहेर प्रचंड गर्दी होती. लोक पेलेची एक झलक पाहण्यासाठी थांबले होते. लोक ज्या माणसाला त्यांनी बहुतेक टेलिव्हिजनवर पाहिले होते त्याची झलक पाहण्यासाठी लोक आतुर होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा