ज्येष्ठ नागरिकांकडे रेल्वेचे दुर्लक्ष !

कोरोनाच्या अगोदर ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेमध्ये प्रवासी भाड्यात 50 टक्के सूट होती. अनेक ज्येष्ठ नागरिक ही सवलत आता मिळेल म्हणून वाट पाहत होते. पण, त्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंबंधीचे संकेत नुकतेच लोकसभेत दिले. याचे कारण रेल्वेवर वाढता खर्च होत आहे हे कारण दिले. रेल्वेतील प्रवासी सेवेसाठी गेल्या वर्षी 59 हजार कोटींचे अनुदान देण्यात आले असून, याशिवाय निवृत्तीवेतन व पगारावर मोठी रक्कम खर्च होत असल्याचे सांगितले आहे. जगातील अनेक देशांत ज्येष्ठांना अनेक सवलती व सुविधा दिल्या जातात. दिवसें दिवस ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. आज अनेक ज्येष्ठांना पेन्शन सुविधा नाही. सध्याच्या महागाईच्या काळात जीवन जगणे अतिशय अवघड होत आहे. महाराष्ट्र सरकारने एसटी भाड्यात 75 वर्षांनंतर पूर्ण सवलत दिली आहे. त्याचा लाभ अनेक ज्येष्ठ घेत आहे. सध्या जपानमध्ये ज्येेष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. युरोप व अमेरिकेतसुद्धा ज्येष्ठांना अनेक सुविधा दिल्या जातात. ज्येष्ठ हे ज्ञानाने व अनुभवाने परिपूर्ण असतात. अनेक ज्येष्ठांनी शिक्षणविषयक, आरोग्यविषयक कामात नोकरीत काम केलेले असते. अशा व्यक्तींचा उपयोग सरकारने करून घ्यावयास हवा. तसेच, त्यांना आरोग्य, मनोरंजन व प्रवासविषयक सुविधा द्याव्यात अशी मागणी अनेक ज्येष्ठांची आहे.

शांताराम वाघ, पुणे

सकारात्मक बदल

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बांशी गावातील ग्रामपंचायतीने 18 वर्षाखालील मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे गावातील सर्व नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. बांशी ग्रामपंचातीचा हा निर्णय स्वागतार्ह असून, सर्वत्र त्याचे स्वागतच होत आहे. बांशी ग्रामपंचायतीप्रमाणे इतरही ग्रामपंचायतींनी 18 वर्षाखालील मुलांच्या मोबाईल बंदीचा निर्णय घेतला, तर ते मुलांच्या हिताचे ठरेल. बांशी ग्रामपंचायतीप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यातील जेकुकरवाडी या गावानेदेखील संध्याकाळी 6 ते 8 टीव्ही, मोबाईलसह सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरण्यावर बंदी घातली आहे. संध्याकाळी 6 ते 8 हा वेळ फक्त मुलांच्या अभ्यासासाठी राखून ठेवण्यात आला आहे. या दोन तासांत मुलांचे पालकही मुलांसोबत बसून मुलांचा अभ्यास घेतात. हे निर्णय सकारात्मक आहेत.

श्याम ठाणेदार, दौंड, जि. पुणे

ऋतुराजचा विक्रम

उच्चांक नेहमी मोडण्यासाठीच केले जातात. क्रिकेट या खेळापुरते बोलावयाचे झाल्यास, एकाच षटकात 6 षट्कार मारण्याचा पराक्रम भारताचे क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि युवराज सिंह यांनी गतकाळात स्पर्धात्मक सामन्यांमध्ये केलेला आहे; पण पुण्याच्या ऋतुराज गायकवाड या युवा खेळाडूने सगळे देशांतर्गत उच्चांक मोडले आहेत. विजय हजारे करंडकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्रातर्फे उत्तर प्रदेश संघाविरुद्ध खेळताना आघाडीला येऊन त्याने शिवा सिंहच्या एका षट्कात ‘नो बॉल’वरही षट्कार मारून, एकाच षटकात 7 षट्कार मारण्याचा विक्रम केला. एका षट्कात सर्वाधिक षट्कार मारण्याचा न्यूझीलंडच्या ली जर्मनच्या नावावर असलेला विक्रम अद्याप अबाधितच आहे. जर्मनने शेल करंडक सामन्यात एकाच षट्कात 8 षट्कार मारले होते.

अनिल रा. तोरणे, तळेगाव दाभाडे

बेरोजगारी कमी कशी होणार?

पंतप्रधानांनी मध्यंतरी मोठा गाजावाजा करीत तरुणांना नोकरीची नेमणूक पत्र वाटली. त्यापाठोपाठ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही काही हजारात नेमणूक पत्र वाटली. लगेचच मेटाच्या सीईओ मार्क झुबेर यांनी तब्बल 11 हजार कर्मचार्‍यांना कामावरून काढल्याची नोटीसपत्रे दिल्याची बातमी वाचनात आली. कामगारांना कामावरून काढण्याची विविध उद्योगांत लाट आली. एका बाजूला देशाच्या पंतप्रधानांनी नेमणूक पत्र वाटत बेरोजगारीवर उपाय शोधत असल्याचे दाखवायचे, तर दुसर्‍या बाजूला त्याचं देशातील उद्योगपतींनी त्याच्या विसंगत वागायचे. कामावरून काढल्याच्या नोटिसा द्यायच्या. हे म्हणजे, एका हाताने द्यायचे तर, दुसर्‍या हाताने काढून घ्यायचे, असे गोंधळात पाडणारे धोरण आहे.

शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर

शिक्षेची व्याप्ती वाढवावी

एकतर्फी प्रेमातून नैराश्य येऊन मुलांनी मुलींवर अ‍ॅसिड फेकून मुलींचे पूर्ण आयुष्यच बरबाद करण्याच्या घटना नवीन नाहीत. अशीच घटना देशाच्या राजधानीत घडली आहे. दिल्लीतील द्वारका परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोन मुलांनी एका 17 वर्षीय शाळकरी मुलीवर अ‍ॅसिड फेकले. 17 वर्षीय मुलीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यामुळे देशात अ‍ॅसिड हल्ल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कडक कायदे असूनही देशात दरवर्षी 300 हून अधिक महिलांवर अ‍ॅसिड हल्ले होतात. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2018 ते 2020 या काळात देशात 386 महिलांवर अ‍ॅसिड हल्ले झाले आहेत. ज्यामध्ये फक्त 62 आरोपी दोषी असल्याचे सिद्ध झाले. महिला आयोग, अनेक सामाजिक संस्था, पोलीस यंत्रणा अशा घटना घडल्यावर सक्रिय होतात. परंतु, अनेक प्रकरणात गुन्हेगार कायद्याच्या पळवाटा शोधून सहीसलामत सुटतात आणि अशा प्रकारच्या घटना ठराविक अंतरानंतर घडत राहतात. अशा परिस्थितीत प्रचलित कायद्यात सुधारणा करून असिड हल्लेखोरांच्या शिक्षेची व्याप्ती वाढवावी.

प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा