पुणे : सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील कलाकारांच्या सादरीकरणाने तरुणाई भारावून जात आहे. या महोत्सवाला आल्यापासून विविध प्रकारच्या संगीतात गोडी निर्माण होत आहे. कलाकार आणि त्यांनी सादर केलेली गायन, वादनाची कला मनाला भावत आहे. पं. भीमसेन जोशी यांनी सुरू केलेल्या या महोत्सवाबद्दल ऐकून होतो. यंदा महोत्सव अनुभवत असल्याची प्रतिक्रिया प्रथम सवाई महोत्सवाला आलेली तरुणाई देत आहे.
६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या पहिल्या दिवसांपासून उत्सव मांडवात ज्येष्ठांप्रमाणे तरुणांची संख्याही अधिक आहे. यांतील अनेक जण प्रथमच सवाई महोत्सवात संगीत-गायनाची अनुभूती घेत आहेत. या महोत्सवाबद्दल खूप ऐकले होते. मात्र प्रत्यक्ष महोत्सवात सहभागी होण्याचा योग आला नव्हता. या वेळी आम्ही सहभागी झालो आहोत. येथील वातावरण आणि सादर होणारी कला पाहून भारावलो आहोत. अशी प्रतिक्रिया अर्चना आणि चंद्रशेखर कुलकर्णी यांनी दिली.
वैदेही घाटे म्हणाली, ‘महोत्सवाला पूर्वीही आले आहे आणि आताही येतच आहे. नेहमीच वेगळे काहीतरी पाहायला आणि ऐकायला मिळाले आहे. मी मुळात भरतनाट्यम नृत्य शिकत आहे. माझा संगीताशी त्याद्वारे सबंध आला आहे; पण बाबा लहानपणापसूनच महोत्सवात घेऊन येत असल्याने महोत्सवाशी वेगळा बंध जुळला असून, संगीताच्या विश्वाने नेहमीच आनंद दिला आहे.’
भार्गवी सरडे म्हणाली, की मी सतार शिकतेय. तर माझे बाबा तबला शिकतात. त्यांनीच मला सतार शिकण्यास प्रेरित केले. मुलीने सतार शिकावी अशी त्यांची इच्छा होती. आम्हाला दोघांनाही संगीताची आवड आहे. त्यामुळे महोत्सवात आल्यावर संगीतातील दिग्गजांचे सादरीकरण पाहून खूप काही शिकायला मिळते.
वीणा देशपांडे म्हणाल्या, की घरी सांगीतिक वातावरण आहे. त्यामुळे घरातील प्रत्येकजण संगीत एकतो. त्यातून आम्हाला आनंद व ऊर्जा मिळते. सवाई महोत्सव आमच्यासाठी आनंदाची पर्वणी असतो.