आसामची संस्कृती आणि अस्मितेचे प्रतीक असलेल्या ’गामोचा’ किंवा ‘गमछा’ला केंद्र सरकारकडून भौगोलिक संकेत म्हणजेच जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग मिळाला आहे. आसाम सरकारने पाच वर्षांपूर्वी यासाठी अर्ज केला होता. जीआय टॅग मुख्यतः कृषी, नैसर्गिक किंवा उत्पादित उत्पादने, हस्तकला आणि विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातून उद्भवलेल्या औद्योगिक वस्तूंना टॅग केले जाते.

आसामी गमछा म्हणजे काय?

गमछा हा सांस्कृतिक, प्रादेशिक अस्मितेसह आसाममधील लोकांच्या उपयोगाची एक महत्त्वाची वस्तू आहे. आसामी गमछा म्हणजे, एक पांढरा आयताकृती कापडाचा तुकडा असतो जो सामान्यतः सुती कापडाचा बनलेला असतो.

पारंपरिकपणे, त्याच्या तीन बाजूंना लाल कडा असतात, तर चौथ्या बाजूला ते खुले असते. गमछाच्या समोरच्या बाजूला मिश्रित रंगांच्या विविध स्थानिक आणि नैसर्गिक कलाकृती असतात. या कलाकृती बनवताना लाल रंगाचा प्रामुख्याने वापर केला जातो, पण त्यात इतर अनेक रंग मिसळूनही ते बनवता येते. आसामी गमछा बनवण्यासाठी कच्चा माल म्हणून बहुतेक कापसाचा धागा वापरला जातो. तरीही खास प्रसंगी ते ’पॅट सिल्क’पासून बनवले जाते.

सांस्कृतिक आणि राजकीय महत्त्व

अनेक शतकांपासून आसाममध्ये गमछाचा वापर होत आला आहे. आसामच्या सांस्कृतिक इतिहासकारांच्या मते, आसामी राष्ट्रवादाचे प्रतीक म्हणून गमछाला 1916 मध्ये मान्यता मिळाली. जेव्हा ’असोम छात्र संमेलन’ आणि ’आसामी साहित्य सभा’ यांसारख्या संघटनांची स्थापना झाली. गळ्यात फुलम, गमछा बांधणे किंवा गुंडाळणे ही त्याकाळी सांस्कृतिक ओळख बनली होती. नंतर ते सांस्कृतिक तसेच राजकीय चिन्ह म्हणून वापरले जाऊ लागले. 1979 ते 1985 च्या आसाम आंदोलनादरम्यान, गमछा राजकीय निषेधाचे प्रतीक बनले. हे आंदोलन परकीयांच्या विरोधाशी संबंधित होते. याशिवाय विविध सामाजिक संदेशही या गमछाद्वारे दिले जातात. उदाहरणार्थ, सध्या विविध नामशेष वन्यजीवांचे ठसे किंवा चिन्ह असलेले मुखवटे बनवले जात आहेत. यातून वन्यजीव संवर्धनाचा संदेश मिळत आहे. त्यात हरगिला, हत्ती आणि गेंडा हे प्रमुख प्राणी आहेत.

गमछा बनाला आंदोलनाचे प्रतीक

1916 मध्ये या गमछाला ’आसामी राष्ट्रवाद’ म्हणून मान्यता मिळाली. 1979 ते 1985 या आसाम आंदोलनात हा गमछा राजकीय निषेधाचे प्रतीक बनला. 2019 मध्ये, जेव्हा संपूर्ण देशात सीएए विरोधी चळवळ शिगेला पोहोचली होती, तेव्हाही आसामचा गमछा निषेधाचे प्रतीक म्हणून उदयास आला होता.

आसामच्या राजकारणात गमछाचे महत्त्व

गमछाला आसाममध्ये गामोचा असे म्हणतात. आसाममधील जनतेला आसामी गमछा बद्दल खूप आदर आहे, त्यामुळे राजकारणीदेखील त्याचा आदर करतात, निवडणुका आल्या की प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या गळ्यात पारंपरिक आसामी गमछा लटकवून जनतेसमोर जातो, त्यामुळे जनता भावनिक होते. याद्वारे त्यांना आसाममधील लोकांना संदेश द्यायचा असतो की ते त्यांच्या परंपरा आणि संस्कृतीचा किती आदर करतात.

आसामी गमछाचे प्रकार

आसाममध्ये पारंपरिकपणे दोन प्रकारचे गमछे विणले जातात. त्यांना ’उका’ आणि ’फुलम’ म्हणतात. उका हे सहसा साध्या रंगाचे तुकडे असतात, जे बहुतेक उन्हाळ्यात आणि आंघोळीनंतर वापरले जातात. फुलम गमछाचा वापर विशेष प्रसंगी केला जातो. बिहू (रांगोळी बिहू) सारख्या सणांमध्ये फुलम गमछा भेटवस्तू म्हणून दिला जातो. फुलम गमछावर स्थानिक फुले व पिके बनवली जात असल्याने याला फुलम असे म्हणतात, परंतु सध्या त्यात इतर प्रकारच्या कलाकृतीही बनवल्या जात आहेत. फुलम पेक्षा उका जास्त वापरला जातो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा