पुणे : चक्रीवादळाचा परिणामामुळे राज्यात ठिकठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. आज (मंगळवारी) पावसाच्या प्रमाणात घट होणार आहे. पाऊस थांबल्यानंतर कमाल आणि किमान तपमानात वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत काही काळासाठी थंडी गायब होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने सोमवारी वर्तविला.

मॅनदौंस चक्रीवादळ काल विरले आहे. केरळ व कर्नाटक सीमेवरील किनारपट्टीवर आज पुन्हा अरबी समुद्रात उतरून कमी दाब क्षेत्रात रूपांतरित होऊन अरबी समुद्रातच पश्चिमेकडे सरकेल. येमेन व ओमान देशांच्या आग्नेय किनारपट्टीकडे निघून जाईल. चक्रीवादळाच्या वातावरणातून आज महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता आहे. वातावरणाची विशेष तीव्रता कदाचित आजच्या पुरतीही मर्यादित राहणार असल्याचा अंदाज आहे. कदाचित मध्यम पावसाचा जोर काहीसाच कमीही जाणवू शकतो. आज खान्देश, नाशिक, नगर, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणीच पावसाबरोबर व्यापक क्षेत्रावर केवळ आकाश झाकळलेलेच जाणवेल.

उद्या (बुधवार) ते येत्या सोमवारपर्यंत किमान तपमानात काहीशी वाढ होऊन महाराष्ट्रात थंडी गायब होण्याची शक्यता आहे. त्यानंतरही आज दक्षिण अंदमानात शक्यतेत असलेले चक्रीय वारे व त्यातून तयार होणार्‍या कमी दाबाच्या क्षेत्राचें स्वरूप व त्याची मार्गस्थ वळणदिशा यावरच नाताळातील थंडीचे स्वरूप अवलंबून असेल. मात्र नव्या कमी दाब क्षेत्राचे महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही. 21 डिसेंबर नंतर महाराष्ट्रात थंडी वाढणार असल्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा