रेल्वे मार्गावरील प्राण्यांचे अपघात रोखा
वंदे भारत रेल्वेच्या मार्गात गायी, बैल धडकणे सुरू आहे. वेगात धावणार्या गाड्यांना धडकून मुके प्राणी आपले जीव गमावतातच आणि धडकेत रेल्वेच्या समोरील भागाचे नुकसान होते. वेगात धावणार्या रेल्वे गाडीला जवळच्या स्थानकावर थांबविणे भाग पडल्यामुळे प्रवासकाळ वाढतो आणि मागाहून येणार्या गाड्यांना विलंब होऊ शकतो. अन्य रेल्वे मार्गांवर, तसेच जंगलपट्ट्यामधून धावणार्या गाड्यांना काही जनावरे धडकून अपघात होत असतात. रेल्वे मार्गांवर अनिर्बंधपणे प्रवेश करणार्या प्राण्यांना अटकाव करणे हा त्यावर उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यासाठी रेल्वेमार्गांलगत कुंपण घालण्याचा पर्याय अवलंबणे अशक्य नसले, तरीही त्यास प्रत्यक्षात आणणे त्रासदायक तसाच खर्चिक आहे. म्हणूनच प्राणी सहजतेने जेथून रेल्वेमार्गावर प्रवेश करू शकतात अशा ठिकाणी अडथळे निर्माण करणे किंवा रेल्वेमार्गांलगत कुंपण घालणे यासारखे पर्याय उपयुक्त ठरू शकतात. रेल्वे मार्गांभोवती राहणार्या लोकांनी पाळलेले गायी, बैल, म्हशी किंवा इतर पाळीव प्राणी जे खाद्यान्नाच्या शोधात रेल्वे मार्गांवर पोहोचून अपघातास कारणीभूत होऊ शकतात, अशा प्राण्यांना मोकाट सोडण्यास मज्जाव करावा, अपघात तातडीने रोखता येणे शक्य नाही. परंतु प्राण्यांचे अपघात रोखण्याच्या अन्य उपाययोजना समोर येऊ शकतील.
स्नेहा राज, गोरेगांव.
समाधान देणारा निर्णय !
ग्रामीण दुर्गम भागात राहाणार्या तळागाळातील बालकांपर्यंत शिक्षणाची गंगोत्री पोहचणे त्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे व अशा गरीब विद्यार्थ्यांसाठी सरकारी जिल्हा परिषद शाळा एकमेव आधार असतात हेही तितकेच सत्य होय. शिक्षण हक्क हा महत्त्वपूर्ण समजला जातो आणि म्हणूनच शिक्षणक्षेत्राच्या बाबतीत व्यावहारिक नफा तोटा याचा विचारच असता कामा नये, असे मनापासून वाटते. परंतु, सर्वसामान्य गरिबांना सरकारी शाळांशिवाय पर्याय नसतो. कारण दिवसेंदिवस महाग होणारे खाजगी शिक्षण घेणं परवडत नाही. याच पार्श्वभूमीवर एक आनंदाची बातमी वाचण्यात आली की, राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा सरसकट बंद न करण्याचा, त्याचप्रमाणे कमी उपस्थितीच्या एकाच गावात कमी अंतरावर दोन सरकारी शाळा असल्यास त्यांचे समायोजन करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी शिक्षण आयुक्तांनी दिलेली स्पष्टोक्ती स्वागतार्ह, दिलासा देणारी असून गरीब, गरजू दुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालक यांना समाधान तर देणाऱी आहे.
विश्वनाथ पंडित, चिपळूण
ऋतुराजला संधी द्या
पुण्याचा वंडर बॉय ऋतुराज गायकवाड सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये एका षटकात सात षटकार खेचून त्याने अनोखा विश्वविक्रम केला आहे. सहा चेंडूंत 42 धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज बनला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने एका एक द्विशतकासह सलग तीन शतके लागवून सर्वाधिक धावा काढल्या. विजय हजारे ट्रॉफीत महाराष्ट्र संघ अंतिम फेरीत पराभूत झाला असला, तरी त्याने या स्पर्धेत आपल्या नेतृत्व गुणांचीही चुणूक दाखवली आहे. त्याच्या या जबरदस्त फॉर्मची दखल घेऊन निवड समितीने त्याला भारताच्या मुख्य संघात संधी द्यावी. ऋतुराज गायकवाडला जर संधी मिळाली, तर तोही या संधीचे सोने करेल यात शंका नाही.
श्याम ठाणेदार, दौंड, जि. पुणे
मोबाईल बंदीचा निर्णय
मोबाईलच्या अतिवापरामुळे यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील बांशी ग्रामपंचायतीने मोठा निर्णय घेतला आहे ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत किशोरवयीन मुलांना मोबाईल बंदी करण्यात आल्याचे वृत्त वाचनात आले. अशा प्रकारचा निर्णय घेणारी बांशी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. 11 नोव्हेंबर रोजी ग्रामसभा पार पडली. त्यामध्ये 18 वर्षांखालील मुलांना मोबाईल बंदी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला. याशिवाय 100 टक्के कर भरणार्या नागरिकांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करणे, तसेच निराधार लोकांसाठी वृद्धाश्रम ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. हे तीनही ऐतिहासिक निर्णय ग्रामसभेने घेऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी किशोरवयीन मुलांच्या हाती मोबाईल आले खरे, मात्र त्याचा फायदा होण्याऐवजी बरेचदा वाईट परिणाम दिसून आले. अनेक मुलांना गेम्स, वाईट साइट पाहण्याचे व्यसन लागलेले असून हे दुष्परिणाम बांशी गावातील नागरिकांना अनुभवास आले. त्यामुळे या ठरावाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे ग्रामस्थांनी ठरवले आहे. गावातील मुलांना मोबाईलचे व्यसन जडले आहे. काहीजण पब्जीसारखे गेम खेळतात, तर काही वाईट साइट बघतात. ऑनलाइन शिक्षणापेक्षा हा धिंगाणा विद्यार्थ्यांसाठी नुकसानकारक आहे.