बेळगावहून सातारा-पुण्याकडे रवाना
बेळगाव : महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद चिघळल्यानंतर दोन्ही राज्यांकडून बससेवा बंद करण्यात आली होती. मात्र आजपासून ही बस सेवा पुन्हा दोन्ही राज्यांकडून सुरु करण्यात आली आहे. बेळगावहून कर्नाटक सरकारची बस पुण्याला रवाना झाली आहे.
कर्नाटक सरकारची बेळगाव-पुणे ही बस सेवा आणि गेल्या काही दिवसापासून जी बस सेवा बंद करण्यात आली होती ती सेवा आता पुन्हा सुरु करण्यात आली आहे. मात्र ही बस बेळगावहून निघाल्यांनंतर खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर शहरात जाणार नाही. तर कोल्हापूर बायपास मार्गे पुढे सातारा आणि पुण्याकडे रवाना होणार आहे.
हा प्रवास सुरक्षित होईल विश्वास चालक आणि प्रवाशांकडूनही व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे. सगळे काही शांत झाल्याचा विश्वास चालकांना आहे. विशेषतः कानडी आणि मराठी असा कोणताही वाद नाही. मात्र हे सगळे राजकीय दृष्टिकोनातून घडवून आणले जात असल्याच्या प्रतिक्रिया येथील प्रवाशांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
पुणे-बेळगाव बससेवा सुरू
पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाचे पडसात दोन्ही राज्यात उद्भवला होता. नागरिकांकडून वाहनांची तोडफोड केली जात होती. त्यामुळे खबरदारी म्हणून पुणे बेळगाव बससेवा रद्द करण्यात आली होती. मात्र शुक्रवारी ही बससेवा सुरू झाली आहे. स्वारगेट बस स्थानकातून बेळगाव साठी बस धावत असते. पुणे-बेळगाव दरम्यान बसच्या रोज चार फेर्या होतात. मात्र मागील तीन ते चार दिवसांपासून या मार्गावरील बससेवा बंद होती. मात्र दोन्ही बाजूने वातावरण काही प्रमाणात निवळले असल्याने या मार्गावरील बससेवा सुरू करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. बेळगाव मार्गावर नागरिकांकडून हिंसक आंदोलन सुरू होते. त्यामुळे बसची प्रवासी वाहतूक थांबविण्यात आली होती. मात्र पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर येथून कर्नाटकातील बिदर, विजापूर, गानगापूर, गुलबर्गा आदी ठिकाणी बससेवा सुरूच होती.