समृद्धी धायगुडे

प्रत्येकाच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये एक ट्रिप असते तशी माझ्याही बकेट लिस्ट मध्ये एक होती, ती म्हणजे अंदमान. आतापर्यंत कोणत्याही पर्यटनस्थळांची मी एवढी माहिती शोधली नाही जेवढी या पर्यटन स्थळाची शोधली. साधरणपणे एक वर्ष यात गेले. यात पहिलाच प्रश्न पडेल की, कोणत्या टूर कंपनी बरोबर गेलात. पण वर्षभराच्या संशोधनात बरेच जणांचे अनुभव, आमच्या प्रायरोटीज यांची सांगड घालून कोल्हापूरमधील एका विद्यमान डॉक्टर अश्विनी राजगोळकर यांच्या बरोबर जाण्याचे निश्चित केले. यांच्या बरोबर जाण्याची प्रमुख कारणे एक म्हणजे त्या डॉक्टर आहेत, दुसरे म्हणजे त्यांच्या बरोबर जाऊन आलेल्यांचा अनुभव अतिशय चांगला होता. तिसरे आणि महत्वाचे कारण म्हणजे तुलनेने पॉकेट फ्रेंडली. मोठ्या ट्रीपला जाताना शक्यतो बजेट ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते.
अखेर चार फेब्रुवारीला अंदमानसाठी आम्ही उड्डाण घेतले.

कसे जाल : अंदमानला जाण्यासाठी तसा कम्फर्टझोन असलेला मार्ग म्हणजे विमान प्रवास. एक म्हणजे इतर साधनांपेक्षा वेळ कमी जातो. फिरायला जास्त वेळ मिळतो. तेथे गेल्यावर बऱ्यापैकी बोट प्रवास.

नियोजन कसे कराल : कोणत्याही टूर कंपनीबरोबर गेलात तरी स्वतःचे नियोजन देखील महत्वाचे ठरते. पॅकिंग पासून वेळेचे, वैद्यकीय अडचणी असतील तर त्याचे असे करावे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीने अंदमानसारख्या ठिकाणी जाताना भौगोलिक परिस्थितीचा अंदाज आणि मानसिक तयारी करून जावे. विशेषतः सूर्योदय आणि सुर्यास्ताचा आपल्या डेली रुटीनवर प्रभाव पडतो. अंदमानमध्ये सकाळी ५-५.१५ ला सूर्योदय होतो आणि संध्याकाळी ५.३० पर्यंत सूर्यास्त होतो. दुसरी गोष्ट म्हणजे छोट्या बोटीपासून क्रूझ पर्यंत सगळ्या प्रकारचे जलप्रवासाची हौस फिटते. त्यामुळे पाण्याचे वावडे असलेल्यांनी एक मानसिक तयारी करावी.

पॅकिंग : आता पहिला टप्पा जाताना विशेषतः महिला मंडळाने आवश्यक तेवढेच आणि जमल्यास गुडघ्या पर्यंतचे कपडे घेतल्यास सोयीचे जाते. संपूर्ण किनारी आणि बेट असा भौगोलिक भाग असल्याने उकडण्याचे प्रमाण थोडे जास्त आहे. मुंबईकरांना किंवा समुद्र किनारी राहणाऱ्याना तसे हे नवीन नाही, पण इतरांना असू शकते. इथे उकाड्यासोबत वारा आणि समुद्राच्या खारटपाण्याचाही सामना करावा लागतो.

एखाद्या स्त्रीच्या अलंकारात कर्णफुले जशी सौंदर्य खुलवातात तशी भारतातच्या एका बाजूला लक्षद्वीप आणि एका बाजूला अंदमान आणि निकोबार ही दोन्ही बेट आहेत. भारतापासून जरी लांब असली तरी ती आपल्या कर्णफुलांसारखी आहेत. ती जपणे प्रत्येक स्थानिकांबरोबर भारताच्या प्रमुख भूभागावर राहणाऱ्यांचे कर्तव्य आहे असे मला वाटते आणि म्हणूनच भारताने जपलेले सुंदर गुपित म्हणायला हरकत नाही.

बंगालच्या उपसागरात निळ्याशार पाण्याने वेढलेला हा द्वीपसमूह ! एकीकडे निळ्याशार पाण्याने वेढलेली पाचूची बेट आणि कुठे शहरातील त्रासलेल्या, प्रदूषित जीवनशैलीतून तेथे गेलेलो आपण. निसर्ग सौंदर्यामुळे देश-विदेशातून पर्यटक येथे निसर्ग सौंदर्य आणि निरव शांतता अनुभवायला येतात. नकाशावर इवलीशी दिसणाऱ्या या बेटांची संख्या एकूण ५७२ असून त्यापैकी ३६ बेटांवर वस्ती आहे. त्यापैकी महत्वाची हॅवलॉक, व्हायपर, रॉस, जॉली बॉय, बारतांग अशी आहेत. त्यामुळे ५७२ पैकी जेमतेम पाच ते सहा बेटांवर पर्यटनाला परवानगी आहे.

अंदमानातील प्रमुख म्हणजे राजधानीचे शहर म्हणजे पोर्ट ब्लेअर. इथल्या विमानतळावर उतरल्यानंतर आपल्याला या छोट्या भूभागाची कल्पना येतेच. पण या छोट्याशा विमानतळाला जेव्हा सावरकरांचे नाव दिसते ते बघून आणखी भरून येते. खरंतर स्वातंत्र्यलढ्यातील बरेच सेनानी जास्ती करून पंजाबी आणि बंगाली प्रांतातील असूनही नाव एका मराठी माणसाचे हे बघितल्यावर प्रत्येकाचे उर भरून येणारच. या पोर्ट ब्लेअरविषयी बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण काही प्रमुख सांगायच्या झाल्या तर इथली शिस्त, स्वच्छता, पाहुणचाराची पद्धत, संस्कृती, सुरक्षेच्या बाबतीत ‘नो खाबू गिरी’ सर्व स्थानिक ‘स्वान्त सुखाय’ आयुष्य जगणारे लोकं. त्यांचे आयुष्य बघून मला फारच हेवा वाटतो. अवास्तव जीवनशैली नाही. याचे प्रमुख करण म्हणजे सूर्योदय आणि दुसरे म्हणजे केंद्रशासित असल्याने दोन्ही वन विभाग व तटरक्षक दलाची शिस्त अत्यंत काटेकोरपणे पाळली जाते. वनविभाग आणि तटरक्षक दलाचे महत्व इथे जास्त जाणवते आणि प्रभाव देखील तुलनेने जास्त आहे. अर्थात ही चांगली गोष्ट आहेच पण पर्यटक म्हणून जाताना आपणही यांत अडचणी येणार नाहीत याची काळजी घ्यावी म्हणजे ट्रिपचा पुरेपूर आनंद लुटता येतो.

चार तारखेला रात्रीच्या विमानाने हैदराबाद आणि त्यानंतर पोर्टब्लेअरला ५ फेब्रुवारीला सकाळी ८ पर्यंत पोहोचलो. त्यानंतर साधारण साडेआठ पर्यंत हॉटेलमध्ये चेक इन केले.

जल प्रवासास सुरू : अंदमानच्या आमच्या ट्रिपची सुरवात एका सबमरीन संग्रहालयापासून झाली, त्यानंतर समस्त महाराष्ट्र ज्या भावनिक धाग्याने जोडला गेलाय त्या स्थळी जाण्याचा योग आला. ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ज्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागली ते सेल्युलर जेल. खरंतर अंदमानचे त्या दिवसाचे ओझरते सौंदर्य बघून कशी काय त्या ब्रिटिशांना इथे तुरुंग बांधण्याची दुर्बुद्धी झाली असा विचार मनात येतो. पण आता ते वाटूनही उपयोग नाही. महाराष्ट्रासह बऱ्याच बंगाली आणि पंजाबी स्वातंत्र्यसेनानींना इथे मरण यातना भोगाव्या लागल्याची प्रचिती तेथे गेल्यावर येते. सेल्युलर जेलचे बांधकाम आणि ब्रिटिशांच्या अघोरी अत्याचारांची कल्पना येऊन नकळत डोळ्यांच्या कडा ओलावतात. स्थानिक प्रशासनाच्या कृपेने येथे ‘लाईट अँड साउंड शो’ असतो. यातून एक जुने झाड त्याच्या तोंडून अंदमानातील तो काळा इतिहास कथन करतो. पहिल्याच दिवशी हे ठिकाण बघून निश्चित भावूक होयला होते.

पहिला दिवशी सुरू झालेला हा निळाशार प्रवास साधारण सलग सहा दिवस कायम होता. या दरम्यान अस्सल कोल्हापुरी वल्लींशी ओळख झाली. सगळे अर्थातच माझ्यापेक्षा अनुभवी होते. समवयस्क नसतानाही ग्रुप ट्रीपला खूप मजा आली. पहिल्याच दिवशी ‘समुद्रिका व एन्थ्रोपोलॉजी’ संग्रहालय पाहून अंदमानमधील संस्कृती आणि समुद्री जीवांची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक भोजनाचा आनंद लुटता आला. यानंतर लाकडाची ब्रिटिश कालीन वखार पहिली. या वखारी जवळ एका मार्गदर्शकाने पूर्ण इतिहास आणि आतापर्यंतचे तेथील कामाची उत्तम माहिती पुरवली. येथे अंदमानमधील अत्यंत टिकाऊ पेडॉक नावाच्या वृक्षाची माहिती दिली. या वखारीत एक संग्रहालय आहे ज्यात त्या वृक्षापासून केलेल्या विविध वस्तू अगदी अंदमानचा नकाशा सुद्धा केलेला दिसतो.

यानंतर बऱ्याच दिवसांपासून मी ज्या वास्तूच्या प्रतीक्षेत होते ते पाहण्याचा क्षण आला. पोर्टब्लेअरमध्ये उतरल्यावर सेल्युलर कारागृहच आपले स्वागत करते. प्रवेशद्वाराजवळच नेताजी आर्ट गॅलरी, संग्रहालय आहे. कारागृहातील सर्व क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ दोन स्वातंत्र्य ज्योती अखंड तेवत असतात. तेथे बंदी म्हणून ठेवलेल्या प्रत्येकाचा इतिहास महत्वाच्या घडामोडींची सचित्र माहिती मिळते. याच संग्रहालयात ठेवलेली सेल्युलर कारागृहाची छोटी प्रतिकृती नजरेस पडते. अर्थातच त्याचे छायाचित्र काढल्याशिवाय राहवत नाही. स्वातंत्र्य संग्रामात उतरलेले बटुकेश्वर दत्त, बिभूतिभूषण सरकार, बरिंदर कुमार घोष, उपेंद्रनाथ बॅनर्जी, ऋषिकेश कांजीलाल, सुदीन कुमार सरकार, वामनराव जोशी, सावरकरांचे ज्येष्ठ बंधू गणेश सावरकर देखील येथे बंदिस्त होते.

सेल्युलर जेल ११ फेब्रुवारी १९७९ रोजी भारताचे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित झाले. या तुरुंगाच्या काही भागात सध्या सरकारी रुग्णालय सुरू आहे. एक भाग पर्यटकांना पाहण्यासाठी खुला आहे. या कारागृहाची रचना बघून ब्रिटिशांच्या बुद्धीचे कौतुक वाटते. पण ती बुद्धी आपल्या विरोधात कृत्य करण्यासाठी वापरल्याने जरा चीड ही येतेच. यातील एक गोष्ट म्हणजे तुरुंगातील कोठडीच्या कड्या. जवळपास हात भर लांब असलेल्या कड्या कैद्यांनी सहजा सहजी उघडू नये यासाठी तीन अडथळे यात केले होते. या अनन्वित अत्याचारातही तेथील राजकीय कैद्यांनी बरेच ऐतिहासिक संप केले. याची माहिती लाईट ऍण्ड साउंड शो मधून मिळतेच. सेल्युलर जेलमध्ये फाशीची जागा त्यानंतर जेथे कोलूचे काम होत असे ती जागा ‘शहीद ज्योत’ या गोष्टी दिसतात. यासाठी तेथे गाईड देखील उपलब्ध आहेत.

जॉली बॉय बेट : दुसऱ्या दिवशी जोली बॉय आयलंड आणि समुद्री अभयारण्यात मनसोक्त फिरता आले. मनसोक्त म्हणजे अक्षरशः एखादे बेट किती सुंदर असावे आपल्या कल्पनेच्याही पलीकडे त्याची प्रचिती हे बेट पाहून येते. अंदमानातील प्रत्येक बेटाची मजा साधारणपणे दीड ते दोन फारतर तीन वाजे पर्यंत घेता येते. यात एका बेटावर एका दिवशी किती पर्यटक सोडायचे हे देखील निश्चित केलेले असते. हे नियोजन अर्थातच तेथील वनविभाग आणि तट रक्षक दल करते. यात आपला नंबर आधी लागावा यासाठी थोडे कष्ट आपल्यालाही घ्यावे लागतात. या बेटावर जाताना आपल्याला कोणत्याही स्वरूपातील प्लास्टिक सोबत नेता येत नाही, तुमच्याकडे जर का वेफर्स किंवा बिस्किट्स असतील तर ती देखील तुमच्या डब्यात वगैरे काढून घेऊन जायला लागते. पण एकदा या बेटावर आल्यानंतर ग्लासबोटीतून संपूर्ण समुद्री जीवन जवळून पाहता येते. हा अनुभव अतिशय अविस्मरणीय आणि सुरेख होता. आपल्या कामाविषयी जसा एखाद्याला आत्मविश्वास असतो तसे येथील गाईड पर्यटकाला आव्हान देतात, या ग्लासबोट राईडचे तिकीटामध्ये कोणीही खरंतर बार्गेन करू नये असे हे देखणे विश्व आपल्याला खचितच अनुभवता येते यात कॉम्प्रोमाइज करू नये. समुद्राखालील जीव आणि विश्व तेथील स्थानिक आपल्या जिवाप्रमाणे जपताना दिसतात. हे बेट वर्षातून ६ महिने खुले असते व उरलेले ६ महिने रेड स्किन हे बेट खुले असते. या मागे कारण म्हणजे एका बेटाचे सौंदर्य थोडे का होईना मानवी स्पर्शाने खराब होते, त्यामुळे तेथील जीव पुन्हा वृद्धिंगत व्हावेत यासाठी केलेला प्रयत्न. आमच्या नशिबाने यावेळी जॉली बॉय हे बेट खुले होते. पहिल्या दिवशी संग्रहालयात पाहिलेल्या प्रवाळाचे प्रत्येक प्रकार, सी कुकुम्बर, कासव, ऑक्टोपस, स्टार फिश, कलरफुल सतार फिश, गोल्ड फिश, सी हॉर्स, असे विविध जीव जे केवळ आपण ट्रॅव्हल एक्सपी सारख्या वाहिनीवर बघतो ते आज जवळून अनुभवत होते. ग्लास बोटीचा अनुभव प्रत्येक वयोगटातील व्यक्ती घेऊ शकते.

तिसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी आठच्या मॅक्रुझ नावाच्या क्रूझने ‘स्वराज द्विप’ म्हणजे हॅवलॉक येथे आलो. अंदमान बेट समूहातील सर्वांत मोठे बेट म्हणजे हॅवलॉक. पोर्ट ब्लेअर पासून जलमार्ग ५० किमी अंतरावर असलेल्या या बेटावर राधानगरी, काला पत्थर आणि एलिफंट बीच हे सुंदर किनारे आहेत. राधानगर हा आशियातील सुंदर किनाऱ्यांपैकी एक आहे.

आपल्याकडे म्हण आहे खूप उन्हा तान्हाची खरेदी करून आले की, ‘जीवाची मुंबई केली का?’ असे वाक्य कानी पडते, तसेच आम्ही पोर्टब्लेअरला उतरल्यापासून जीवाचे पाणी, सर्व प्रकारचा बोट प्रवास करत होतो. तिथे पोहीचल्यावर इतर टूर कंपन्यांपेक्षा आम्ही भाग्यवान आहोत असे समजले कारण हॅवलॉकला राहणे प्रेस्टीजस समजले जाते. माझ्यासाठी अर्थातच हे महत्वाचे नव्हते, कारण फिरणे हेच प्राधान्य होते. माझ्या आनंदात भर पडलीच ज्या ‘एल डोरा डू’ नावाच्या हॉटेल मध्ये राहिलो त्यांचा खासगी बीच होता. मग काय क्रूझ प्रवासाचा थकवा एका क्षणात गेला. दुपारी तेथील लोकप्रिय राधानगर बीचवर जाण्याचा प्लॅन होता, तो थोडा स्कीप करून आम्ही काला पत्थर नावाच्या बीचवर जाण्याचे निश्चित केले. हा बदललेल्या प्लॅनचा सर्वांना सुखद धक्का होता. आता तुम्ही म्हणाल प्रत्येक बेट म्हणल्यावर बीच आलाच त्यात काय सारखे कौतुक, पण जेव्हा तुम्ही हा विचार बाजूला ठेवून बीच पाहता तेव्हा त्याचे सौंदर्य आणि वेगळेपण लक्षात येते. काला पत्थर सारखा बीच भारतात शोधून सापडणार नाही. प्रत्येक पर्यटकाला इकडे किती फोटो काढू आणि किती नको असे होतेच. तीन शेड्स मधला समुद्र नजर टाकावी तितका लांब. त्सुनामीमध्ये वाहून आलेली काही प्रचंड खोड असलेली झाडे मराठी चित्रपट सैराटमधील त्या झाडाची आठवण करून देतात.

एकाच दिवशी दोन सरप्राइज मिळाल्यावर कसा आनंद होतो तसा मला त्या दिवशी दुसरा सुंदर बीच राधानागर पाहिल्यावर झाला होता. एक म्हणजे या किनाऱ्यावर सर्वांना सुरक्षितपणे मनसोक्त पाण्यात खेळता येणार होते, दोन दिवस डोळ्यांचे पारणे फेडणारे समुद्राच्या पाण्याचे रंग आज आणखी जवळून अनुभवण्याची संधी होती. येथे नाममात्र पैसे देऊन कपडे बदलण्याची सोय होते, त्यामुळे बहुतेक पर्यटकांची इकडे झुंबड उडालेली असते. या बीचचे खरे सौंदर्य पाच ते साडेपाच दरम्यान सुरू होते. कारण सुर्यास्ताला सुरवात होते. अतिशय सुरेख सनसेट डोळ्यात आणि कॅमेरात साठवून परतताना एक दिवसाने येथील मुक्काम वाढवण्याचा आगंतुक विचार येतोच.

या बीचवर आणखी एक अनुभव आला म्हणजे तटरक्षक दलाचा सराव. चार-पाच नौसेनेची लढाऊ जहाजे किनारीवर सराव करत होती. यात सतत डोक्यावर घिरट्या घालणारे नौसेनेचे हेलिकॉप्टर बघून आपण किती सुरक्षित आहोत याची जाणीव झाली. संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत साधारण हे तीन ते चार तास सुरू होते. हवाई दलाच्या कसरती तुलनेने बऱ्याचदा बघतो, पण तटरक्षक दलाशी एवढ्या जवळून पाहण्याचा योग आला.

स्वराज दीप म्हणजेच हॅवलॉकला स्कुबा डायव्हिंग करता येते, पण जॉली बॉय बेटावरच्या ग्लासबोट राईडची सर त्याला येत नाही. ज्यांना फक्त अडव्हेंचर म्हणून जायचे ते खुशाल जाऊ शकतात पण तेवढेच सौंदर्य स्कुबा करताना दिसेल याची शाश्वती नाही.

सहाव्या दिवशी आम्ही अदल्या दिवशी बदललेल्या प्लॅन प्रमाणे सकाळी एलिफंट बीचला जायचे ठरवले. इथे बऱ्यापैकी वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी होत्या. ज्यांना स्कुबा करणे शक्य नाही ते स्नॉर्केलिंग करू शकतात. आम्ही ज्या बोटीचे तिकीट काढले त्यांचे कॉम्प्लिमेंट्री स्नॉर्केलिंग होते. ज्यांना त्याचे व्हिडीओ आणि अर्ध्या पाऊण तासाचे स्नॉर्केलिंग करायचे त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाते. पण हा अनुभव देखील फार कमाल होता. किनाऱ्याच्या इतक्या जवळ जाऊन पुन्हा ते जीव स्पर्श करण्याइतके जवळ येत होते. आमच्या उत्साही ग्रुपमधील प्रत्येकाने हा अनुभव घेतला काही काळ पाण्यात खेळलो. संध्याकाळी चारच्या मॅक्रुझने परत पोर्ट ब्लेअरला आलो. पण अजूनही ते दृश्य डोळ्यासमोरून जात नाही.

बारतांग बेट : अंदमान आणि निकोबार ‘नेकेड बेट’ म्हणून ओळखले जायचे. अगदी गेल्यावर्षी पर्यंत एका अमेरिकी पर्यटकाला आदिवासींनी ठार मारल्याची घटना घडली. त्यामुळे येथील आदिवासी अजूनही निसर्गाच्या अगदी जवळ आणि आपल्या कलयुगापासून अतिशय दूर असल्याचे जाणवते. अशा काही आदिवासींच्या अधिवासातून पुढे बारतांग बेटावरील चुनखडीच्या गुहा पाहण्यासाठी निघालो. या प्रवासाला रात्री अडीचला सुरवात केल्यानंतर आम्ही चार वाजता त्या जंगलाच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन थांबलो, दगडूशेठ गणपतीला किंवा सिद्धिविनायकला एवढी मोठी रांग नसेल जेवढी पहाटे चार पासून पर्यटकांची रांग होती. येथे सहा वाजल्या नंतर सोडण्याचे करण म्हणजे हा संपूर्ण प्रवास पट्टा जारवा नावाच्या आदिवासींचा आहे. त्यांच्या जीवनशैलीला धक्का पोहोचेल असे कोणतेही कृत्य करण्यास बंदी आहे. अगदी फोटो काढणे, भूतदया म्हणून पाणी देण्यासही बंदी आहे. हे नियम मोडून भूतदया केलीच तर वनखात्याच्या नियमानुसार पाच वर्षांचा कारावास नक्कीच. पहाटेच्या प्रवासात हे आदिवासी फारसे दिसत नाहीत पण येताना दुपारी तुरळक प्रमाणात दिसतात.

जंगल प्रवास संपवून एका जेट्टीवर बस थांबते. तिथपासून पुन्हा मोठ्या प्रवासी भव्य दिव्य बोटीतून दुसऱ्या किनाऱ्यावर जायचे, तिथून लहान स्पीड बोटीने चुनखडीच्या गुहांपर्यंत जाता येते. गुहे जवळचा थोडासा प्रवास खारफुटीच्या गर्दीतून आहे. निरव शांतता, किर्र झाडीतून एका छोट्याश्या लाकडी पुलावर उतरता येते. याला बारतांगचा ‘लकडी पूल’ म्हणायला हरकत नसावी. तिथून साधारण एक ते सव्वा किलोमीटर चालत गेल्यावर चुनखडीच्या गुहा दिसतात. या गुहा म्हणजे खरोखरी एक नैसर्गिक अविष्कारच म्हणावा लागेल. मानवी हस्तक्षेप किती वाईट असतो याची देखील जाणीव होते. या गुहेत जाणाऱ्या पर्यटकांच्या स्पर्शाने काही ठिकाणची चमकण्याची प्रक्रिया पूर्ण थांबली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने अजून थोडे लक्ष घालून मर्यादित पर्यटक सोडण्याविषयी काही नियम करावेत असे वाटते. या गुहांच्या आसपास थोडी चारपाच घरे आहेत, त्यामुळे थोडीफार शेती दिसते.

रॉस बेट : सोमवारी आज मात्र ट्रिपमधील शेवटचा दिवस. पण ‘चेरी ऑन द टॉप’ तसा हा दिवस ठरला. इतर दिवसांच्या तुलनेने आज थोडा सकाळी मोकळा वेळ होता. त्यामुळे पोर्टब्लेअरच्या अगदी जवळचे नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजेच ‘रॉस’ बेट आहे. ते पाहण्यासाठी निघालो वाटेत एक समुद्रजीवांचे अवशेष जपलेले एक संग्रहालय पाहिले. प्रत्येक दिवशी नवीन अनुभव तसा आजही आला, सुरवात बोट प्रवासापासूनच. रोज बोटीतून चढताना उतरताना फार काही वारे वाहत नव्हते मात्र आज मौसम का नूर कुछ और था! असे होते. बोटीत बसल्यापासून ऍडव्हेंचरला सुरवात झाली. जीव मुठीत धरून सगळे एकदाचे दहा मिनिटांत बेटावर पोहोचलो. वरवर झाडांनी गच्च भरलेले बेट इतके काय काय दडवून ठेवत असेल असे अजिबात वाटले नव्हते.

हे बेट ब्रिटिशांच्या राजधानीचे शहर होते. सर डॅनियल रॉस नावाच्या एका सागरी सर्वेक्षकावरून बेटाला हे नाव पडले. ब्रटिशांच्या काळात त्यांचे मुख्यालय येथे होते. १९४१ मध्ये आलेल्या भूकंपानंतर ब्रिटिशांनी ही राजधानी पोर्ट ब्लेअर येथे हलवली. त्या काळात बांधलेल्या इमारती, बाजरपेठ, बेकारी, चर्च, टेनिस कोर्ट, पाणी शुद्धीकरणासाठीचे यंत्र, विद्युत निर्मिती केंद्र, क्लब हाऊस, जपानी बंकर, छापखाना देखील आज भग्नावस्थेत पाहायला मिळतात.

या बेटावरील वृक्षसंपदा अतिशय समृद्ध आहे. हरणे, मोर, बदके, रंगबिरंगी पक्ष्यांचे कुजन आपल्या मनातील वादळांना सहज शांत करते. हे बेट एकूण ६० एकरांचे आहे. हे सर्व पाहण्यासाठी दीड ते दोन किलोमीटरचा प्रवास पायी किंवा कात्रज उद्यानासारखी इलेक्ट्रिक व्हेकलने करता येतो. काही स्थानिकांना येथे किरकोळ व्यवसायास परवानगी दिली आहे. त्यामुळे छोटे रेस्टॉरंट, शहाळे विक्रेते दिसतात. या बेटावरील आणखी सुखद अनुभव म्हणजे अनुराधा राय यांची भेट. या बेटावर मनसोक्त बागडणाऱ्या पक्षी, हरणे, मोर, सशांना त्यांनी आपल्या घरातील पेट प्रमाणे नावे दिली आहेत. त्यांच्या प्रेमळ हाकेला धावत येणाऱ्या जीवांचे खूप अप्रूप वाटते. त्यांचा हा संवाद आणि माहिती आम्हाला मिळाली हे खरंच ट्रिप संपताना मिळालेले सरप्राईज गिफ्टच होते.

आज आमचा बोऱ्या बिस्तार आवरण्याचा दिवस सगळेचजण पुन्हा परतण्याच्या मनस्थितीत नव्हते. करण ट्रिपच्या पहिल्या दिवसापासूनच येथील निसर्ग सौंदर्याने, संस्कृतीने भारावून गेलो होतो. आठ दिवस येथील किनाऱ्यावरील शंख शिंपले गोळा करण्यासारख्या अमूल्य अशा आठवणी गोळा करून परतीच्या प्रवासाला लागलो.

अंदमान थोडक्यात

दिवस : अंदमान नीट अनुभवण्यासाठी आठ ते दहा दिवस पूर्ण काढावेत.

निवास : शक्यतो पोर्टब्लेअर आणि एखादा दिवस दुसऱ्या म्हणजे हॅवलॉकसारख्या ठिकाणी करावा.

फूड : निवास निश्चित करताना याची चौकशी आधी करावी कारण स्थानिक अन्न मूळ मासे आणि भात असल्याने उगाचच अवाजवी अपेक्षा करू नये. माझे प्राधान्य लोकल फूड मग ते शाकाहार असो किंवा मासे आहार ते स्थानिकांप्रमाणे असावे. कारण ही चव कितीही पैसे मोजले तरी महाराष्ट्रात मिळणार नाही. दुसरे म्हणजे पाणी. बऱ्याच हॉटेलमध्ये एकवागार्डचे पाणी मिळते.

नियमावली : बेसिक नियमावली एअरपोर्ट पासूनच सुरू होते. ती म्हणजे वजनाची, काहींना हे नवीन असते काहींना नसते. दुसरी म्हणजे बऱ्याच जणांना मोह असतो तेथून प्रवाळ, शिंपले इत्यादी आणण्याचा हा टाळावा. आणखी एक म्हणजे जिथे कॅमेरा बॅन आहे तिथे बॅनच करावा, ग्रुप टूर मध्ये कोणा एकामुळे बाकीच्यांवर संक्रांत नको. सुरक्षेच्या बाबतीत ग्रुप कॅप्टन पासून स्पीड बोट चालक ही आपली काळजी घेतो. त्यामुळे त्याने दिलेल्या सूचना ऐकल्यास त्यांच्याही पोटावर पाय येत नाही. बऱ्याच बेटांवर किती पर्यटक कोणत्या वेळेत सोडायचे हे नियम केले आहेत. त्यामुळे त्या वेळेत गेल्यास हे भान सहज पाळले जाते. शेवटची आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे विमानतळावर पाय ठेवल्यापासून इतस्ततः थुंकणे, प्लॅस्टिकचा वापर टाळावा. वापर केल्यास शक्यतो जिथे कचरापेटी ठेवली असेल तिथे टाकावा. हे जरा अति होतंय असे काहींना वाटेल पण हे गरजेचे आहे.

शॉपिंग : अंदमान हे शॉपिंग डेस्टिनेशन नाही त्यामुळे तेथील लोकल मेड असे घेण्यासारखे असेल तर फक्त शहाळे आणि शंख, शिपल्यांचे शोभेच्या वस्तू, कीचेन्स इत्यादी. अगदीच हौस म्हणून अंदमानचे टिशर्ट आठवण म्हणून घेण्यास हरकत नाही. पण यासाठी पुरेशी कॅश जवळ ठेवावी कारण उठसूट पेटीएम, यूपीआय वापरणारे विक्रेते नाहीत. काही ठिकाणी तर दहा रुपयांची नाणी देखील घेत नाहीत. त्यामुळे ज्या वस्तू खरेदी करायच्या त्यासाठी सुट्टे पैशांसाहित कॅश वापरलेली बरी.

तळ टीप : सध्या अन्न वस्त्र आणि निवारा या बरोबर वायफाय ही निकड झाली आहे. त्यामुळे सतत ऑनलाइन असणाऱ्यांना खरंच निर्जन बेटावर आणल्यासारखे वाटू शकते. पण सबांधित रिसॉर्ट आणि हॉटेल्सनी वायफायची सुविधा पुरवली आहे. यांचा कमाल स्पीड टू जी असल्याने वायफाय तुला मला होते. बीएसएनएल, एअरटेलला रेंज मिळते असे ऐकिवात आले. पण त्या अफवा असल्याचा अनुभव आला. त्यामुळे दोनच पर्याय उरतात एवढ्या लांब प्रवास करून जे निसर्ग सौंदर्य पहायला आलोय त्याचा मनमुरात आनंद डोळ्यात साठवणे आणि दुसरा हॉटेल मध्येच बसून रहाणे.

एकंदरीतच अंदमानची सफर माझी सुखद आणि संस्मरणीय ठरली. यामागे राजगोळकर दाम्पत्य आणि त्यांचे नियोजन याचा सिंहाचा वाटा आहे. कारण कोणत्याही वयाचा ग्रुप मॅनेज करणे सोपे नाही. विशेषतः वेगवेगळ्या शहरातून आलेले, वेगवेगळ्या वयोगटाचे, वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे यासाठी संयत, संयमी वृत्ती आवश्यक असते. प्रत्येकाला सांभाळून घेऊन सुखरूप परत आणणे आवश्यक असते. सर्व स्थानिक गाईड, वेटर, ड्रायव्हर यांच्यावर बिनधास्तपणे सामान सोपवून आम्ही निर्धास्तपणे फिरू शकलो. यांत ग्रुप म्हणून दिलेल्या वेळेत आवरणे असो बिनातक्रार दोनदा चहा गरम करून देणे असो सगळे नखरे अविरत झेलणारे आमच्या रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांचे खास कौतुक आणि हे सर्व सुंदर क्षण आमच्या आयुष्यात आणण्याचे राजगोळकर दाम्पत्याचे पुन्हा आभार, कारण आपले व्यवसाय सांभाळून हे नियोजन करण्यासाठी, आम्हा पुणेकरांनाही अंदमानात अस्सल कोल्हापूर अनुभवता आले.

परत फिरा रे घराकडे आपुल्या

4 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा