बहुसंख्य वाचकांनी श्रद्धा प्रकरणी ’लिव्ह इन रिलेशनशिप’ या संकल्पनेला जबाबदार ठरवले आहे. ’लिव्ह इन रिलेशनशिप’ तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त करेल, असा इशारा देतानाच, अनेक पत्रलेखकांनी पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण थांबवा, असे मत व्यक्त केले आहे.
लिव्ह-इन-रिलेशनशिप नको
राजधानी दिल्लीत श्रद्धाची क्रूर हत्या झाली, जीवाचा थरकाप उडवणारे हे कृत्य आहे. आजकाल फेसबुक किंवा चित्रपट पाहून असे काळिमा फासणारे काम केले जात आहे, हे सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही. सर्व धोके ओळखून मुलींनी आपला जोडीदार निवडणे आवश्यक आहे. प्रेमविवाह किंवा नुसती ओळख असून उपयोग नाही, यातून फसवणूक होण्याचा संभव असतो. लग्न न करता वर्षानुवर्षे नवर्याप्रमाणे राहायचे व नंतर लग्न न करता मुलीचा विनयभंग करून सोडून जायचे, हा कोणता न्याय आहे? प्रख्यात अभिनेत्री जया बच्चन यांनी एका कार्यक्रमात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला पाठिंबा दिला होता व त्या संबंधातून मूल जन्माला घातले तरी त्याला पाठिंबा दिला. हे कितपत योग्य आहे? श्रद्धाच्या खुनासंबंधात आता नवीनच बातमी पुढे आली आहे की, 2 वर्षांपूर्वीच तिने चिठ्ठी लिहून ठेवली होती, संबंधित माणसापासून धोका आहे, पोलिसात तक्रार करून त्यांनी काही केले नाही, आणि आता मंत्रीमहोदय त्यात लक्ष घालणार आहेत. वरील गोष्टीत दोष कोणाचा आणि जीव कोणाला गमवावा लागला ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
माधव ताटके, पुणे
त्या चुकीमुळेच संकट आणि घातपात
श्रद्धा वाळकर पुनरावृत्ती टाळता येणे कठीण आहे. जीवनात कष्ट उपसणे (निवास, शिक्षण, स्पर्धा, बेकारी, कमी उत्पन्न, लादला गेलेला संयम वगैरे अनेक बाबींत) हे भरपूर भौतिक सुखोपभोग मिळण्यासाठी ही सध्याची बहुमान्य धारणा आहे. त्यांत धावताना सर्वांना इतरांची मानसिकता ओळखता येत नाही. ती चूक संकट, घातपातात घेऊन जाते. ज्ञान, भोग, विरक्ती हा जुना क्रम संपल्याने भोगासाठी ज्ञान व विरक्ती नको असे असल्याने श्रद्धा वाळकर पुनरावृत्ती कमी करता येईल. टाळता येणार नाही.
श्रीनिवास जनार्दन मोडक, पुणे
पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण
मिळालेल्या व्यक्ती स्वातंत्र्याचे फायदे घेताना मर्यादा, काळजी यांचे भान तरुण पिढी राखत नाही. आंधळ्या प्रेमात स्वतःला वाहून घेताना आपला भूतकाळ, जन्मदाते, समाज आणि स्वतःचे भवितव्य यांचा जराही विचार करत नाहीत. ’लिव्ह इन रिलेशनशिप’ या पाश्चात्त्य संस्कृतीच्या अनुकरणावर आधारित झालेल्या प्रेमात तडजोड व सहनशीलता फारशी टिकत नाही. विचारांत, आचरणात मतभिन्नता निर्माण होते, पुढे दुरावा, शत्रुत्व निर्माण होते. ’लिव्ह इन रिलेशनशिप’चा जरासादेखील अंदाज लागल्यास पालकांनी आपल्या मुलींना योग्य समज देण्याचे प्रयत्न करावेत. तत्संबंधी माहिती नामांकित समुपदेशन केंद्रात नोंदवावी. आपली मुले नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी त्यांच्या हजेरीचा अंदाज पुढील काही काळ घेत राहिल्यास त्यांचा ठावठिकाणा वेळीच लागून पुढील अनर्थ टाळता येतील.
स्नेहा राज, गोरेगांव
क्र्रूरतेचा कळस
मुंबईतील वसईच्या श्रद्धा वाळकर या 26 वर्षीय तरुणीचा दिल्लीत तिच्या प्रियकराने अत्यंत क्रूर पद्धतीने तिच्या शरीराचे तुकडे केले. हे ऐकूनच अंगावर शहारे येतात. श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे करून व ते फ्रीजमध्ये ठेऊन नंतर त्याची टप्प्याटप्प्याने जंगलामध्ये विल्हेवाट लावणारा तिचा प्रियकर आफताब पूनावाला हा मनुष्य नसून त्याचे हे कृत्य रानटी जनावरासारखे आहे. खरंतर लिव्ह-इन रिलेशनशिप ही कायद्याने मान्य केेलेली व्यवस्था असली तरी, त्यातील असुरक्षितता श्रद्धाच्या हत्येच्या घटनेमुळे ही हत्या लव्ह जिहाद आहे, असे दिसत आहे. श्रद्धाच्या क्रूर हत्येचा देशभरातूनच नव्हे, तर जगभरातून निषेध होत आहे. लिव्ह-इन पार्टनरची एवढ्या निर्घृण आणि निर्दयीपणे हत्या करणार्या विकृत आफताब पूनावाला विरोधात आवाज उठू लागला आहे. हत्या करूनही ती बेपत्ता असल्याचा बनाव व कुभांड रचणार्या या पशूचा शक्यतितक्या लवकर हिशोब चुकता केला पाहिजे. आधुनिकतेच्या नावाखाली लिव्ह-इन रिलेशनशिपभोवती वलय निर्माण झाले आहे. या घृणास्पद कृत्याबदल दुष्कर्म करणार्या नराधमांना जन्मठेपेऐवजी फाशीची शिक्षा देण्याची तरतूद देशाच्या संसदेला करावी लागेल.
कमलाकर जाधव, बोरीवली-पूर्व, मुंबई
विकृतीचा ’करडा’ रंग
स्त्री-पुरुष आकर्षणातून प्रेम ही नैसर्गिक भावना असली तरी ती अनैसर्गिक होऊ पाहत आहे. त्यामुळेच ’लिव्ह इन् रिलेशनशिप’ला येऊ लागलेला आफताबच्या विकृतीचा ’करडा’ रंग श्रद्धाला कळू लागला होता असे दिसते. पण ’लांडगा आला रे आला’ प्रमाणे दोन तीनदा आफताबच्या माफीनाट्यामुळे वडिलांनीही मुलीचा नाद सोडल्याने, शेवटची तिची आर्त हाक दुर्लक्षित झाली, हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे. विकृतीचा हा आरंभ अन्य कोणाच्या वाट्याला येऊ नये म्हणून पालकांनी आपल्या तथाकथित सज्ञान मुलामुलींवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणे ही काळाची गरज झाली. आपल्या पाल्यांचा, समाजमाध्यमे व हाताळताना, भडक वेबसिरीज बघताना मनावर नियंत्रण, तारतम्याने निर्णय घेण्याच्या क्षमतेची जाणीव याविषयी घरच्याघरी किंवा गुरुजनांकडून किंवा नियंत्रणाबाहेर अभ्यास करून घेणे आवश्यक आहे. मुलींनीही एखाद्या ’कालच’ परिचय झालेल्या मुलाच्या तथाकथित प्रेमावर ’आंधळा’ विश्वास ठेवण्याआधी आपल्या आई-वडिलांचे प्रेमच खरे आणि शाश्वत असते हे कायम ध्यानात ठेवायला हवे.
श्रीपाद पु. कुलकर्णी, बिबवेवाडी, पुणे
पालकांनी समजावून सांगण्याची गरज
सध्याची अविचारी पिढी प्रेमापायी कुणास जुमानत नाही हे आश्चर्य नाही. त्यांना महिलांवरील गुन्ह्यांत कारवाई करण्याबाबत राजकीय नेते, पक्षांची उदासीनता, गुन्ह्यांबाबत अपरिपूर्ण कायदे, विलंबाने होणार्या शिक्षांच्या अंमलबजावण्या, याबाबतची माहिती, परिणाम प्रेमवेड्या तरुणींना, त्यांच्या पालकांना समजावून सांगण्याची गरज आहे. मुले/मुली लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जाण्यासंबंधीची कुजबुज कानी पडताच त्यांना विश्वासात घेऊन दोघांच्या संबंधांबद्दलची माहिती घ्यावी. भविष्यातील संभाव्य धोक्यांच्या सूचना, समाजात केली जाणारी दिशाभूल, धर्म, जात, प्रांत बदलल्यावर येणार्या अडचणींशी सामना कसा करावा इत्यादी उदाहरणांसह समजावून द्यावे. भवितव्य संशयित आढळल्यास समुपदेशन, समाजसेवी संस्थांशी सल्लामसलत करून चुकांमुळे आयुष्य कसे उद्ध्वस्त होते याची कल्पना देऊन मुलांचे मतपरिवर्तन करण्याचे प्रयत्न करावेत.
राजन पांजरी, जोगेश्वरी
तरुणींनी सावध राहावयास हवे
आजकाल मोबाईलद्वारे एकमेकांशी संपर्क साधला जातो. त्यामुळे कोणत्याही क्षणी कोणीही एकमेकांशी बोलू शकतो. याचा फायदा समाजकंटक घेतात. ते गोड गोड बोलून मुलींना आपल्या जाळ्यात ओढून घेतात. याप्रसंगी त्यांचे आईवडील त्यांना यापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयन्त करतात; पण त्यांना हे पटत नाही. हेच श्रद्धाच्या बाबतीत घडले. ती आफताबच्या जाळ्यात सापडल्यानंतर तिच्या आईवडिलांनी तिला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण, मी 25 वर्षाची आहे, मला माझी जबाबदारी कळते, अशा स्वरूपाचे उत्तर देऊन त्यांना गप्प बसविले. श्रद्धा ही आफताबच्या फसव्या जाळ्यात अलगद सापडली. मग आफताबने तिचा पुरेपूर फायदा घेऊन हत्या केली. यातून अनेक प्रश्न निर्माण झाले. आजकाल कोणीही नवीन माणसावर सहजासहजी विश्वास ठेवू नये. त्याची पूर्ण पारख करावी. दुसरा मुद्दा याबाबतीत आपल्या घरातील ज्येष्ठांचे किंवा आईवडिलांचे बोल ऐकावेत व त्याप्रमाणे पावले उचलावीत. शेवटी समाजात अशा फसव्या प्रवृत्तीचे अनेक लोक असतात. त्यापासून तरुणींनी सावध राहावयास हवे.