देशद्रोह्यांविरोधात भाजपचा स्वतंत्र कक्ष…
अहमदाबाद : देशात समान नागरी कायदा भाजप आणणारच असल्याची ग्वाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिली असून दहशतवादी संघटना आणि देशद्रोही शक्तींची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी पक्षांतर्गत स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाईल, अशी घोषणाही केली आहे. गुजरात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. त्यानंतर ते बोलत होते.
पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, देशाच्या आणि समाजाच्या विरोधात कार्य करणार्यांवर अंकुश ठेवण्याचे काम राज्यांनी चोखपणे केले पाहिजे. तसेच अशा देशविरोधी शक्तीची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी तसेच, त्यांची ओळख पटवण्यासाठी पक्षांतर्गत स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाईल. शरीरातील वाईट पेशींवर प्रतिपिंडे जशी अंकुश आणतात त्याचप्रमाणे देशद्रोही शक्तींविरोधात काम करण्याची जबाबदारी राज्य सरकारांची देखील आहे.
दरम्यान, भाजपने समान नागरी कायदा लागू करण्याचे वचन दिले आहे. हिमाचलसह विविध विधानसभा निवडणुकीवेळी तसे आश्वासन दिले होते. गुजरात निवडणुकीतही हा राष्ट्रीय मुद्दा असून पक्ष त्यासाठी वचनबद्ध असल्याचे ते म्हणाले. देशातील सर्व नागरिक एकसारखे आहेत, असे भाजप मानतो. त्यामुळे समान नागरी कायद्याचे पक्षाने नेहमीच स्वागत केले आहे. विविध राज्यांत हा कायदा प्रभावीपणे लागू करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
सबका साथ सबका विकास, अशी घोषणा करणार्या भाजपने गुजरात निवडणुकीत एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट का दिले नाही? या प्रश्नावर ते म्हणाले, राष्ट्रपती निवडणुकीसाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम यांना भाजपने पाठिंबा दिला होता. तसेच विविध राज्यांत राज्यपालपदी मुस्लिम धर्मीय व्यक्तींची नेमणूकही केली आहे. त्यामुळे पक्ष सबका साथ सबका विकास याप्रमाणे कार्य करत आहे. उमेदवारी ही पात्रतेनुसार दिली आहे.
गुजरात निवडणुकीसाठी भाजपने प्रतिस्पर्धी पक्षांप्रमाणे जाहीरनाम्यात मोफत योजना जाहीर केल्या आहेत. त्यावर नड्डा म्हणाले की, सक्षमीकरण आणि प्रलोभने यात फरक पाहिला पाहिजे. काँग्रेस आणि आप यापैकी एकही पक्ष गुजरातमध्ये सत्तेवर येणार नाही. परंतु त्यांनी मोफत योजना जाहीर करताना निधीबाबतची तरतूद केलेली नाही. तसे त्या राबविणार कशा ? याचा तपशीलही दिलेला नाही. भाजपने गरीब आणि जनतेच्या उद्धारासाठी कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे त्या अर्थव्यवस्थेसाठी उपयुुक्त अशाच आहेत.