नवी दिल्ली : भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांना निमंत्रित केले आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी दिली.
देशाच्या इतिहासात प्रथमच इजिप्तच्या अध्यक्षांना प्रमुख पाहुणे बनण्याचा मान दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना औपचारिक निमंत्रण पाठवले आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी याबाबतचे निमंत्रणपत्र त्यांना दिले आहे. दोन्ही देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहेत. संबंध दृढ करण्यासाठी त्यांना प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे बनवले आहे. भारत दौर्याबाबत जी 20 राष्ट्रांच्या परिषदेत मोदी आणि सिसी यांच्यात चर्चा झाली होती, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.