पुणे : महापालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रारुप प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, प्रभाग तीनचाच राहणार असून लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्यसंख्या घटणार आहे. आता पुणे महापालिकेत 173 ऐवजी 166 सदस्य असतील, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

नवीन निर्णयानुसार, नव्याने प्रभाग रचना करावी लागणार आहे. लोकसंख्येच्या तुलनेत प्रभागाची रचना होणार आहे. त्यामुळे सदस्य संख्या कमी होणार तर प्रभाग मोठे होणार आहेत. एकंदरितच, प्रभागाची रचना आपोआपच बदलली जाणार आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार, पुणे महापालिकेसाठी लोकसंख्येच्या निकषानुसार 166 सदस्य निवडावे लागणार आहेत. तर, पूर्वीच्या प्रभाग रचनेनुसार 173 सदस्य निवडून येणार होते. मात्र, सदस्य संख्या आता सातने कमी होणार आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याच्या नगर विकास विभागाच्या आदेशामुळे निवडणुका आणखी लांबणीवर पडू शकतात. प्रभांगाचे प्रारुप तयार करणे, मतदार याद्या फोडणे, आरक्षण नव्याने टाकणे या सर्व प्रक्रियेला साधारणपणे तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. यामुळे पुढील वर्षी फेब्रुवारी- मार्च महिन्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या नगर विकास विभागाने मंगळवारी सांयकाळी राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना, संख्या यांचे प्रारुप तयार करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यीय प्रभाग रचना निश्चित करून त्यानुसार प्रभाग रचना केली होती, आरक्षणही निश्चित केले गेले होते. राज्यातील सत्तातंरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने सदस्य संख्येविषयी काही निर्णय घेतले होते. या निर्णयासह इतर काही मुद्दयांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भातील पुढील सुनावणी 28 नोव्हेंबर रोजी होणार असून, कदाचित निकाल दिला जाऊ शकतो. तत्पूर्वीच राज्याच्या नगर विकास विभागाने प्रभाग रचना आणि संख्येसंदर्भात आदेश जारी केले आहेत.

सात दिवसांत प्रभागरचना तयार करू

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नवीन प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा हा आम्ही सात दिवसांत तयार करू शकतो. त्यानंतर तो जाहीर करणे आणि त्यानुसार मतदार याद्या फोडल्यानंतर त्यावर हरकती आणि सूचना नोंदविणे. त्यावरील सुनावणी घेणे. आरक्षणाची सोडत काढणे याकरिता प्रशासनाला कमीत कमी दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागू शकतो. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास फेब्रुवारी उजाडू शकतो. यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. यामुळे निवडणूक फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यापर्यंत होण्याची शक्यता आहे.

नगरसेवकांची संख्या घटणार

तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीत पुणे महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 173 इतकी झाली होती. आता नवीन तरतुदीनुसार सदस्य संख्या 166 च्या आसपास असेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. 2011 च्या जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या 35 लाख 56 हजार इतकी आहे. या लोकसंख्येचा विचार करता, महापालिकेत 166 नगरसेवक असू शकतील.

तेवीस गावांसाठी सुद्धा प्रभागरचना

महापालिकेच्या हद्दीत नव्याने 34 गावांचा समावेश झाला आहे. या समाविष्ठ गावांपैकी 11 गावांचा एक प्रभाग तयार केला गेला होता. या प्रभागातून दोन सदस्य निवडून आले होते. परंतु, या प्रभागाची रचनाही भौगोलिकदृष्टया समतोल नव्हती. शहराच्या दक्षिण-पश्चिम भाग आणि दक्षिण-पूर्व भागाचा या प्रभागात समावेश होता. नव्याने तेवीस गावे महापालिका हद्दीत समाविष्ट केली गेली आहे. तीन प्रभाग पद्धतीनुसार या संपूर्ण 34 गावांमध्ये प्रभाग रचना केली गेली होती. या भागात मोठ्या प्रमाणावर नगरसेवकांची संख्या अधिक निर्माण होणार होती. मात्र, आता नवीन रचनेतही हाच भौगोलिक समतोल साधावा लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा