मुंबई : दैनंदिन काम सोडून देवदर्शन करणे आणि ज्योतिषाला हात दाखवणे, ही म्हणजे आत्मविश्वास डळमळीत झाल्याची लक्षणे आहेत. जेव्हा आत्मविश्वास डळमळीत होतो तेव्हा लोक अशा गोष्टींकडे वळतात, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी शिर्डीच्या दौऱ्यावर होते. यावेळी शिंदे आपल्या नियोजित कार्यक्रमांना फाटा देत सिन्नरच्या मिरगावमध्ये गेले होते. याठिकाणी एकनाथ शिंदे यांनी एका ज्योतिषाकडून भविष्य जाणून घेतल्याची चर्चा आहे. या मुद्द्यावरुन शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे यापूर्वीही गुवाहाटीला गेले होते. आता ते पुन्हा एकदा आसामला जाणार आहेत. आपला नित्याचा कार्यक्रम सोडून शिर्डीची भेट, मग शिंगण्याची भेट, त्याठिकाणी मुख्यमंत्री शिंदेंनी कोणाला हात दाखवला, असे म्हणतात. पूर्ण माहिती माझ्याकडे नाही. या सगळ्या गोष्टी आत्मविश्वासा धक्का बसल्याचे लक्षण आहे. अशावेळीच लोक ज्योतिष आणि देवदर्शनाकडे वळतात. एकनाथ शिंदे यांच्याबाबतही अशीच परिस्थिती आहे का, अशी शंका मला वाटायला लागल्याचे शरद पवार यांनी म्हटले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदर्शन किंवा कोणाला हात दाखवण्यासाठी का जात आहेत, हे मी काही सांगू शकणार नाही. माझा यावर विश्वास नाही. मी कोणालाही हात दाखवायला जात नसतो. पण हल्लीच्या काळात आपण नवीन गोष्टी पाहत आहोत. अशा गोष्टी आजपर्यंत आपण महाराष्ट्रात पाहिल्या नव्हत्या, अशी टिप्पणीही शरद पवार यांनी केली.

तर जतच्या गावांची चर्चा करु

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील ४० गावे कर्नाटकात समाविष्ट करण्याशिवाय वक्तव्य केले होते. त्यावर शरद पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भाष्य केले. आम्हीही मागील अनेक वर्षांपासून बेळगावसह कारवार, निपाणी, बिदर, भालकीवर दावा सांगत आहोत. बेळगाव, निपाणी, कारवारसह ही गावं ते सोडणार असतील तर त्यांना काय द्यायचं याबाबत चर्चा होऊ शकते, असे शरद पवार यांनी म्हटले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा