बोम्मई यांच्या विधानानंतर विक्रमसिंह सावंत यांचे प्रत्युत्तर
सांगली : जत तालुक्यातील सीमा भागातील ग्रामपंचायतीने 40 गावे कर्नाटकात समाविष्ट करा, असे ग्रामपंचायत ठराव दिल्याचे कर्नाटकाचे मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई यांनी वक्तव्य केले होते. बोम्मई यांच्या विधानानंतर जत परिसरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आम्ही महाराष्ट्रातलेच आहोत. महाराष्ट्रातच राहणार आहोत. जतमधील जनता कर्नाटकात जाणार नाही, असे जोरदार प्रत्युत्तर दिले.
आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले, जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. जत तालुक्यातील चाळीस गावांचा ठराव झाला, आम्हाला पाणी द्या, सुख सुविधा द्या, नाहीतर आम्ही कर्नाटकात जाऊ. त्या भूमिकेच्या मागची पार्श्वभूमी पाहिली, तर त्या चाळीस गावांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, सुविधा मिळाल्या पाहिजेत याच भावना लोकांच्या होत्या. तशा पद्धतीचे जिल्हा परिषद व महाराष्ट्रात कुठेही ठराव केलेले नाहीत. प्रत्यक्षात ते ठराव कुठे गेलेले नाहीत. महाराष्ट्रातील कोणत्याही प्रशासनाकडे असे ठराव नाहीत. वारंवार त्या माध्यमातून आम्ही राज्य शासनाकडे पाठपुरावा केला आहे. कर्नाटक शासनाकडे पाठपुरावा केला आहे. तो करत असताना आमची भूमिका एवढीच होती की, महाराष्ट्र राज्याने कर्नाटक राज्याला कृष्णा नदीतून सहा टीएमसी पाणी दिले पाहिजे. ते पाणी जर परत घ्यायचे असेल, तर तुरची बबलेश्वर योजनेतून ते पाणी जत तालुक्याला घेता येते.
अप्रत्यक्षरित्या जरी पाणी आले असले, तरी याला कायम करण्यासाठी दोन्ही राज्यांनी सामंजस्य करार करण्याची गरज आहे. या भागातल्या लोकांना पाणी मिळाले पाहिजे. प्रश्न पिण्याच्या पाण्याचा असो की, शेतीच्या पाण्याचा पण हा वाद मिटला पाहिजे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून हा प्रश्न कायमचा मिटवला पाहिजे. आमच्या तालुक्यातील जनतेची कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमई म्हणतात तशी त्या राज्यात जाण्याची काही भावना नाही, असेही ते म्हणाले.