मोठा अपघात झाला की महामार्ग प्राधिकरण अथवा संबंधित यंत्रणांना जाग येते. दीर्घस्वरूपी उपाययोजना होत नसल्यानेच अपघातांचे घातचक्र थांबण्याचे नाव घेत नाही. आतापर्यंत तेथे वेगवेगळ्या अपघातांत किमान साठ जणांचे बळी गेले आहेत.

नियोजनशून्य कथित विकास कामे सोयीऐवजी सर्वसामान्यांचे जीवन असुरक्षित करणारी ठरतात. नवले पुलानजिक नुकतीच घडलेली दुर्घटना तेच वास्तव अधोरेखित करते. याच परिसरातील दरी पूल हेही र्‍हस्व दृष्टीच्या नियोजनकारांचे कर्तृत्व! अपघात सांगून होत नाहीत, अचानक होणारी ती घटना असते, असे सातत्याने समर्थन करून नियोजनातील गंभीर चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न होतो. असे समर्थन नागरिकांची सुरक्षा वार्‍यावर सोडून देणार्‍या मानसिकतेचे दर्शन घडविते. सुदैवाने प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी ताज्या अपघाताच्या घटनेची गंभीर दखल घेतल्याने प्रश्‍न सुटेल, अशी आशा आहे. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग वाहतूक जलद व्हावी आणि पुणे-सातारा रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा, यासाठी आखण्यात आला. अवजड वाहनांच्या वाहतुकीचे प्रमाण या रस्यावर सर्वाधिक आहे. वाहतुकीची अखंड वर्दळ, हेही या मार्गाचे ठळक वैशिष्ट्य. त्यावेळी पुणे शहराच्या बाहेरून जाणारा मार्ग उपनगरांचा विस्तार, वाढलेली लोकसंख्या यामुळे आता भरवस्तीत आहे. स्वाभाविकपणे या मार्गावर दुर्घटना झाल्यास त्याचा फटका या भागातील उपनगरांमध्ये राहणार्‍या नागरिकांना बसतो. या बाह्यवळण मार्गावर कात्रजचा नवीन बोगदा ते नवले पूल या दरम्यान गेल्या दोन वर्षांत पन्नासहून अधिक अपघात झाले आहेत. रस्त्यावरील तीव्र उतार हे अपघातांचे प्रमुख कारण. उतार असल्याने अनेक बेजबाबदार वाहनचालक आपले वाहन ‘न्यूट्रल’मध्ये ठेवतात. इंधन वाचविण्यासाठीचा हा खेळ या मार्गावरून जाणार्‍या इतर वाहनचालकांसाठी गळफास बनत आहे.

अतिक्रमणांचा सुळसुळाट

बोगद्यापासून नवले पुलापर्यंतचे अंतर साधारण आठ किलोमीटर आहे. हाच भाग वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याचे पुनःपुन्हा दिसत आहे. या ठराविक भागात वाहनांचा वेग कसा नियंत्रणात राहील, याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज होती. मात्र त्यासंदर्भात गांभीर्याचा अभाव दिसत असून राजकीय पक्ष अथवा संघटनांना देखील पाठपुरावा करावासा वाटत नाही. आताचा अपघात बेजबाबदार वाहनचालकांकडून वापरल्या जाणार्‍या ‘न्यूट्रल’च्या जीवघेण्या तंत्रातूनच घडला. तांदळाची वाहतूक करणार्‍या एका मालमोटारीने तब्बल 48 वाहनांना धडक दिली. आठ ते दहा जण गंभीर जखमी झाले. अपघातातील वाहनांचे झालेले नुकसान मोठे आहे. त्याच दिवशी याच परिसरात आणखी दोन गंभीर अपघात घडले. मोठा अपघात झाला की महामार्ग प्राधिकरण अथवा संबंधित यंत्रणांना जाग येते. दीर्घस्वरूपी उपाययोजना होत नसल्यानेच अपघातांचे घातचक्र थांबण्याचे नाव घेत नाही. आतापर्यंत तेथे वेगवेगळ्या अपघातांत किमान साठ जणांचे बळी गेले आहेत. वेगमर्यादेचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर कठोर कारवाई आणि त्याचवेळी, वाहने गिअरमध्ये न चालविणार्‍यांवरही जरब बसेल अशी कारवाई, याशिवाय पर्याय दिसत नाही. किमान आता तरी संबंधित यंत्रणांनी चालढकल सोडून द्यावी, हीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. या यंत्रणांनी उपाययोजनांचे काम युद्धपातळीवर हाती द्यावे. मालमोटारचालकाची चूक होती, हे तर पुढे आलेच; पण सतत होणार्‍या अपघातांमागे कोणाचा निष्काळजीपणा आहे? याचे उत्तर किमान मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने होणार्‍या चौकशीत मिळावे! रस्त्यावरील उतार कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजनांचे सुतोवाच झाले आहे, त्या उपाययोजना प्रत्यक्षात येतील तो सुदिन! सेवा रस्ते सलग आणि सुस्थितीत नाहीत. त्यावर अतिक्रमणांचा सुळसुळाट आहे. या पार्श्‍वभूमीवर अन्यवेळी सेवा रस्त्यांवरून जाणे अपेक्षित असलेली स्थानिक वाहतूक महामार्गावर वळते आणि वाहतुकीचा ताण वाढून अपघातांचा धोकादेखील वाढतो. महत्त्वाच्या शहरांदरम्यान वाहतूकीला लागणारा वेळ कमी व्हावा, ही कल्पना कितीही स्तुत्य असली तरी त्यातून अपघाताचे सत्र सुरु होते त्याचे काय? या विषयावर मंथन होऊन दूरदृष्टीने निर्णय घेण्याची वेळ आली आहे. विना अडथळा वाहतुकीसाठी अनेक पदरी महामार्ग बनविल्यावर वेगाला मर्यादा हवी, हे ध्यानात येते आणि आवाहनवजा फलक लावून काम भागविले जाते. ही मानसिकता जापेर्यंत बदलत नाही तोपर्यंत टांगती तलवार दूर होणे अशक्य.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा