पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांच्या मुलांवर आक्षेपार्ह शब्दात टीका करून सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना न्यायालयाने मंगळवारी पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.

सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाने यांनी हा आदेश दिला. या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत दर गुरुवारी सकाळी 11 ते दुपारी 5 या वेळेत किंवा तपास अधिकारी बोलावेल त्यावेळी डेक्कन पोलिस ठाण्यात हजेरी लावावी, तपास कामात सहकार्य करावे, पुराव्यात छेडछाड करू नये, अशा अटीही न्यायालयाने घातल्या आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे कुडाळ येथील आमदार वैभव नाईक यांची बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केल्याच्या निषेधार्थ 18 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग येथे निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात भास्कर जाधव यांनी नारायण राणे व त्यांच्या दोन्ही मुलांवर टीका केली होती. त्यावर पुण्यातील भाजपचे कार्यकर्ते योगेश शिंगटे यांनी जाधव यांच्याविरोधात डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात पुणे न्यायालयाने भास्कर जाधव यांना 24 ऑक्टोबर रोजी तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.

भास्कर जाधव यांनी कायमस्वरुपी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी वकील विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात अर्ज केला होता. जाधव यांनी समाजात फूट पाडणारे, धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केलेले नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद मान्य करत भास्कर जाधव यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा