पहिल्या सामन्यापूर्वी जर्मनीला धक्का

दोहा : फुटबॉल विश्वचषकात जपानविरुद्धच्या सामन्यापूर्वी जर्मन संघाला मोठा झटका बसला आहे. संघाचा आक्रमक खेळाडू लेरॉय साने या सामन्यात खेळणार नाही. लेरॉयच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. जर्मनी 23 नोव्हेंबरला जपानविरुद्धच्या विश्वचषकात आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. उभय संघांमधील हा सामना कतारमधील दोहा येथे होणार आहे.

लेरॉय साने हे जर्मन संघातील मोठे नाव आहे. त्याच्या अनुपस्थितीत संघाची मोठी कसरत होणार आहे. त्याने उत्तर कतारमधील अंतिम प्रशिक्षण सत्रात भाग घेतला नाही. बुधवारी जपान आणि जर्मनी यांच्यात सामना रंगणार आहे. तो किती दिवसांनी संघात परतणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यानंतर 27 नोव्हेंबरला जर्मनीला स्पेनविरुद्ध खेळायचे आहे. त्याच वेळी, हा संघ 1 डिसेंबर रोजी कोस्टा रिका विरुद्ध फिफा विश्वचषकातील शेवटचा गट सामना खेळेल.

जर्मन संघाने आतापर्यंत चार वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकला आहे. पण 2018 चा विश्वचषक त्याच्यासाठी कठीम ठरला. या विश्वचषकात जर्मन संघ पहिल्या फेरीतूनच बाहेर पडला होता. 2022 च्या विश्वचषक स्पर्धेत जर्मन संघाला भूतकाळातील आठवणीतून सावरायचे आहे. तथापि, काही दिवसांपूर्वी फ्लूची लागण झालेला संघाचा स्टार स्ट्रायकर निकलास फुलक्रग पुन्हा सरावात परतला आहे, ही संघासाठी दिलासादायक बाब आहे. जपानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो खेळणार याची खात्री आहे.

यंदाच्या स्पर्धेत जर्मनीचा संघ ई गटात आहे. त्याच्याशिवाय कोस्टा रिका, जपान आणि स्पेन हे संघ आहेत. ई गटात आतापर्यंत एकाही संघाने सामना खेळलेला नाही. या गटातील सामने 23 नोव्हेंबरपासून सुरू होतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा