पवनेच्या तीरावरून : विजय भोसले

देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत त्या काळातल्या वर्तमानपत्रांनी मोठी कामगीरी करून देश स्वतंत्र करण्यास जी चळवळ उभी केली म्हणून आजही वृत्तपत्रसृष्टीला लोकशाहीमध्ये महत्वाचे स्थान आहे. मात्र, देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रसारमाध्यमांची गळचेपी करून आज वृत्तपत्रे आणि खासगी दूरचित्रवाहिन्या या उद्योगपतींच्या हातात गेल्यामुळे वस्तुस्थिती समाजासमोर येत नाही. उलट सरकरी धार्जिन्या बातम्या प्रसिद्ध होत असल्यामुळे आज वर्तमानपत्रे अणि खासगी दूरचित्रवाहिन्या यावर सर्वसामान्य जनतेचा विश्‍वास राहिला नाही. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया रचला. त्यानंतर लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी केसरी मराठा ही दोन वृत्तपत्र सुरु करून ब्रिटिशांविरूद्ध लिखाण करून स्वातंत्र्य चळवळीबद्दल भारतीयांच्या मनात जनजागृती केली. त्यामध्ये केसरीचे न.चि.केळकर, मराठा चे प्र.के.अत्रे, नवाकाळचे खाडीलकर, सकाळचे संस्थापक ना.भी. परूळेकर, प्रभातचे गांधी व देशातील विविध भागातील वृत्तपत्रांनी स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान दिले आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत वृत्तपत्र आणि दूरचित्रवाहिन्या या भांडवलशाहिच्या ताब्यात गेल्यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणे अवघड होऊन बसले आहे. देशात नोटबंदी, कोरोना महामारी, नैसर्गिक संकटे यामुळे सर्वसामान्य वर्ग पिचला होता. आर्थिक खाईत लोटला गेला. मात्र, केंद्रातल्या सरकारने या बाबींना प्राधान्य न देता राममंदिरसारख्या धार्मिकभावना यांना लक्ष करून सर्वसामान्यांचे लक्ष विचलित केले. त्यामुळे आज देश आर्थिक संकटात आहे. याचे कारण वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला घातल्यामुळे या विरोधात लढणार कोण? अशी परिस्थिती आहे. आज वृत्तपत्रे आहेत त्याचबरोबर अनेक पत्रकार संघटनादेखील आहेत. त्या पत्रकार संघटनांची अवस्था काय आहे केवळ संघटनांनी अधिवेशने घ्यायची, राजकारणी लोकांची हाजी हाजी करायची आणि आपला फायदा करून घ्यायचा. एवढेच काम आता संघटनांना राहिले आहे. मात्र, संघटना कशासाठी हवी, त्याचा फायदा पत्रकारांना कितमत होत आहे त्याचबरोबर आज समाजमाध्यमांमुळे मोबाईल हातात धरून ज्यांना पत्रकारीतेतला गंध नाही असे लोक आज या क्षेत्रात आल्यामुळे खरा पत्रकार जो दहा ते बारा तास काम करीत असतो त्याचे अस्तित्व धोक्यात आल्यामुळे पत्रकारीतेवरच आता प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्याने समाजामध्ये पूर्वी पत्रकारांना जो सन्मान, जो आदर होता तो आता राहिलेला नाही. केवळ अधिवेशने घेऊन हे प्रश्‍न सुटणार आहेत का? कारण अधिवेशनात पत्रकारांच्या प्रश्‍नापेक्षा सरकारकडून पत्रकारांना काय मिळेल आणि ठराविक पुढार्‍यांना याचा काय फायदा होईल यासाठी हा खटाटोप सुरु असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आज देशभर अनेक संघटना आहेत. ज्यांनी पत्रकारांचे काय भले केले? याचा जर अभ्यास केला तर केवळ एकमेकांच्या लाथाड्या यातून जो गैरफायदा घेतात ते राजकारणी मंडळी आणि म्हणूनच आज खर्‍या अर्थाने पत्रकार हा उपेक्षितच आहे. पत्रकारांना पैसा, घरे दिली म्हणजे तो समाधानी नाही. तर त्याच्या पत्रकारीतेचा सन्मान त्याला मिळाला पाहिजे. तो पत्रकारीता करीत असताना तो त्याच्या व्यवसायाशी बांधिल असतो. त्यामुळे त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्याचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न होतो. हे कुठेतरी थाबले तरच पत्रकारीतेला भवितव्य आहे.

अधिवेशने विचार मंथनासाठी

पत्रकारांची अधिवेशने जरूर झाली पाहिजेत. मात्र, ही अधिवेशने मौजमजा करण्यासाठी नकोत. तर खर्‍या अर्थाने पत्रकारांमध्ये विचारमंथन व्हावे. शासन अथवा समाजात चुकीचे काम होत असेल तर पत्रकाराने आपल्या लेखणीतून याविरूद्ध आवाज उठवून न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच सर्वसामान्यांचा पत्रकारीतेवर विश्‍वास बसेल. आज समाजाचं देणे घेणे नसलेले लोक या माध्यमांमध्ये येऊ लागल्यामुळे आज लोकशाहीतील जो चौथा स्तंभ समजला जाणारा प्रसार माध्यमाबद्दल जनमानसात प्रतिमा कमी होऊ लागली आहे. याबद्दल कधीतरी विचारमंथन होणार आहे की नाही. पिंपरी चिंचवडमध्ये थेरगावमध्ये अखिल भारतीय मराठी परिषदेचे दोन दिवसाचे राष्ट्रीय अधिवेशन तर अखिल मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाचे प्रथम एक दिवसाचे अधिवेशन शनिवारी नुकतेच पिंपरीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात पार पडले.वास्तविकता एकाच शहरामध्ये दोन पत्रकारसंघाची अधिवेशने होतात याचा अर्थ पत्रकारांमध्येदेखील समन्वय नसल्यामुळे अशी अधिवेशने घेऊन आपण समाजात कोणता आदर्श देतो तर आमच्यातही एकमत नाही. त्यामुळे जनतेने आपल्याकडून काय घ्यायचे हा देखील प्रश्‍न यानिमित्ताने ऐरणीवर येतो.

अंतर्मुख कधी होणार

मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनातून काय साध्य झाले. याचाही अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. येणार्‍या भविष्य काळात सर्व माध्यमे एका विशिष्ठ कुटूंबांच्या हाती जाणार आहेत. माध्यमे हाती घेणे म्हणजे लोकशाही नियंत्रणात ठेवण्याची प्रक्रीया आहे. सत्ताबदलाची सुरुवात पत्रकारीतेतून होते. अन्य स्तंभ हतबल, नियंत्रणाखाली गेल्याने लोकशाहीचा चौथा नव्हे तर पत्रकारीता पहिला स्तंभ झाला आहे. त्यामुळे लोकशाही वाचविण्याची देशातच नव्हे तर जगात पत्रकारीतेची जबाबदारी वाढली आहे असे परखड मत जेष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त करून पत्रकारांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्यांचा प्रश्न फक्त महाराष्ट्रात नसून जगभरात आहे. आपल्याला लढायचे आहे ते स्थानिक अधिकारी, पदाधिकारी यांच्या विरोधात. ग्रामीण भागात वेगवेगळे दबाव गट असतात. त्याला लढा देत, सांभाळत बातमीदारी करावी लागते. वृत्तपत्रात वाचकांना प्रतिवादाची करण्याची संधी असते. न्युज चॅनेलवर वाचकांचा प्रतिवाद नसतो. त्यामुळे पत्रकारांच्या संरक्षणाच्या विषयाला आपला पाठींबा असल्याचे त्यांनी सांगितले याचा अर्थ की, निपक्ष, निस्पृह आणि प्रामाणिकपणे जे पत्रकारीता करतात त्यांनाच पाठीबा देण्याची गरज आहे. कारण आज आपण अनेक उदाहरणे पाहतो. पत्रकारतेच्या नावाखाली खंडणी मागणे, ब्लॅकमेल करणे हे प्रकार सर्रास वाढले आहेत. नुकतेच हडपसर भागात एक प्रकरण उघडकीस आले आणि सहा तोतया पत्रकारांना जेलची हवा खावी लागली. हे नमुनेदार उदाहरण आहे. पिंपरी चिंचवडमध्ये देखील एका समाज माध्यमाच्या पत्रकारांनी एका मुलीचा चार महिन्यापूर्वी खून करून तो स्वत:च पोलिस ठाण्यात हजर झाला आणि गुन्हाही कबूल केला. विशेष म्हणजे अशा महाभागाला काही पत्रकार पोलिस ठाण्यात भेटायला गेले. याचा जर आपण गांभीर्याने विचार केला तर अशा पद्धतीने पत्रकारीता चालली तर भविष्यात याचे परिणाम काय होतील. याचा विचार पत्रकारांनी केला पाहिजे. भारत जोडो यात्रेला अभूतपुर्व प्रतिसाद मिळत आहे. आयोजकांच्याही अपेक्षेपेक्षा जादा प्रतिसाद मिळत आहे. तरुण, मुली, महिला, जेष्ठ अशा सर्वच स्तरातील लोक या यात्रेत सहभागी होत आहेत. लोकांची गर्दी वाढतेय, वातावरण तापतेय. राहुल गांधी नुसते चालत नाहित तर, ते लोकांशी संवाद साधतात. कमीत कमी दोन हजार विद्यार्थ्यांशी ते बोलले, त्यांना काय शिकायचेय, त्यांना वाटणारी भिती, त्यांचे प्रश्न जाणून घेतले, असे केतकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.

वैचारीक स्वातंत्र्य आहे हे लक्षात ठेवावे

नफरत छोडो भारत जोडोतून राहूल गांधी यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे, मात्र काही माध्यमाकडून त्याची योग्य दखल घेण्यात आली नाही. यावर काही जणांनी आक्षेप घेत राहुल गांधी आणि पदयात्रेबद्दल नव्हे तर पत्रकारीता आणि पत्रकारांच्या समस्यांवर बोला असे म्हणत केतकर यांना विरोध केला. त्यावर केतकर यांना बोलू द्या असे इतरांनी सांगितले. त्यामुळे सभागृहात गोंधळ झाला. त्यावर परिषदेचे विश्‍वस्त एस. एम. देशमुख यांनी ज्यांना केतकर यांचे विचार पटत नसतील त्यांनी सभागृहाबाहेर जावे असे सांगून केतकर तुम्ही बोला त्यावर सभागृहात गोंधळ झाला. विशेष म्हणजे एस. एम. देशमुख यांनी गोंधळ करणार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्याबद्दल त्यांचे कौतुकच केले पाहिजे. कारण एखादद्या व्यक्तीचे विचार पटत नसतील तर गप्प बसावे अथवा बाहेर जावे, कारण लोकशाहीत विचार, भाषण स्वातंत्र्य आहे. याचा तरी उपस्थित असलेल्या पत्रकारांनी भान ठेवले पाहिजे.त्त्यामुळे ज्यावेळी अधिवेशनात काही गोष्टी मनाविरूद्ध होत असल्या तरी ते मत त्या व्यक्तीच्या तुम्ही त्यांना निमंत्रित केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या बाबत आदर हा ठेवलाच पाहिजे.

पत्रकारीतेच्या ग्लॅमरला भुलू नका

पत्रकारितेत या असे निमंत्रण तुम्हाला कोणी दिले नाही. त्यासाठी पायघड्या घातल्या नाहीत. त्यामुळे पत्रकारितेतील सुख, दुःख डोक्यावर घ्यावी लागतील. ग्लॅमरला भुलू नका. पत्रकारितेला सामाजिक दायित्वाची झालर आहे. त्याची जाणीव ठेवून पत्रकारांनी वागले पाहिजे, त्याच बरोबर तुम्ही पत्रकारीता करता की तुम्ही पत्रकारीता विकता असा सवाल करून राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी पत्रकारीतेवर चौफेर भाष्य करून पत्रकारांचे कान टोचले. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्य भाषेत पत्रकारीता एक व्रत आहे. समाजाचा आरसा आहे. त्या आरशाचे प्रतिबिंब चांगले उमटवणे की वाईट उमटवणे हे त्या पत्रकाराचे काम असते. ते त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.

अशोक वानखेडे म्हणाले, पत्रकारांच्या प्रश्नावर मंथन झाले पाहिजे. शहरातील पत्रकारिता बाईट पत्रकारिता झाली आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांनी पत्रकारिता जीवंत ठेवली. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता पत्रकार लिहितात. पत्रकारांनी सामान्य माणसासारखे रहावे. त्यातच तुमचे अर्धे प्रश्न सुटतील. पत्रकारांनी एकोप्याने राहून आपली कौशल्य वाढवावीत. पत्रकारांनी 24 तास सतर्क राहिले पाहिजे. राजकीय, प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक, कला क्षेत्राचे धागेदोरे एकमेकांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे पत्रकारांनी सर्व क्षेत्राशी निगडित माहिती ठेवलीच पाहिजे. पत्रकारांनी सुपारी घेवून पत्रकारिता करू नये. या वानखेडे यांच्या मार्गदर्शनाचा पिंपरीतील पत्रकार निश्‍चितच भविष्यात आदर्श ठेवतील त्यामुळे या दोन्ही अधिवेशनाचा विचार करता अखिल भारतीय पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात पत्रकारांना अधिस्वीकृती अधिवेशनासाठी 25 लाख देण्याची सरकारकडे मागणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती मान्य केली. पत्रकारांना सुविधा मिळाल्या पाहिजेत यात दुमत नाही. मात्र आजच्या परिस्थितीत खरा पत्रकार कोण. याची व्याख्या कधीतरी ठरली पाहिजे. जेणेकरून चुकीचे लोक येणार नाहीत आणि पत्रकार बदनाम होणार नाही. पत्रकार विरोधी हल्ला कायदा झाला असला तरी त्याचा काहीजण गैरफायदाही घेतात. मात्र, खर्‍या अर्थाने ज्यावर अन्याय होतो. त्याला न्याय मिळत नाही. यावरही विचारमंथन होण्याची गरज आहे. पत्रकारांना मानसन्मान मिळतो त्यचबरोबर त्याने प्रामाणिकपणे काम केले तर त्याला पैसेही मिळतात. याची अनेक उदाहरणे वानखेडे यांनी दिली. त्यामुळे भविष्यकाळात पत्रकाराने निष्ठा आणि जागरूकपणे काम केले तरच पत्रकारीतेला भवितव्य आहे. अन्यथा हीच राजकीय मंडळी पत्रकारीता संपवून आपले मांडलीक बनवतील कोणा पत्रकाराविरूद्ध लिहिणे अथवा टिका करणे हा उद्देश नसून येणार्‍या काळात पत्रकारीता आणि त्याचे स्वातंत्र्य टिकावे हाच यामागचा उद्देश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा