दोहा : फुटबॉल विश्वचषकाच्या तिसर्‍याच दिवशी मोठा उलटफेर पाहायला मिळाला. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणार्‍या अर्जेंटिनाच्या संघाचा जागतिक क्रमवारीत 49व्या क्रमांकावर असलेल्या सौदी अरेबियाने 2-1 असा पराभव केला. या पराभवामुळे अर्जेंटिनाचा पुढचा मार्ग कठीण झाला. आता अर्जेंटिनाला 27 नोव्हेंबरला मेक्सिको आणि 30 नोव्हेंबरला पोलंड विरुद्ध खेळायचे आहे. या पराभवासह अर्जेंटिनाचा संघ क गटात शेवटच्या स्थानावर पोहोचला आहे.

अर्जेंटिनाकडून 10व्या मिनिटाला कर्णधार लिओनेल मेस्सीने आघाडी घेतल्यानंतरही संघाला सामना जिंकता आला नाही. सौदी अरेबियाकडून सालेह अलसेहरीने 48व्या मिनिटाला आणि सालेम अल्दवसारीने 53व्या मिनिटाला गोल केले. यानंतर दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही.

शेवटच्या काही मिनिटांत सौदी अरेबियाचा गोलरक्षक एम. अल ओवेस याने चमकदार कामगिरी करत अनेक बचाव केले. अर्जेंटिनाने सुरुवातीच्या काही मिनिटांत तीन गोल केले, परंतु ते सर्व ऑफसाइड ठरले. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी अर्जेंटिनाला पुढील दोन सामने जिंकावे लागतील

अर्जेंटिनाचा संघ 4-4-2 असा फॉर्मेशन घेऊन मैदानात उतरला. त्याचवेळी सौदी अरेबियाचा संघ 4-1-4-1 अशा फॉर्मेशनसह मैदानावर उतरला. सुरुवातीच्या काही मिनिटांत अर्जेंटिनाचे वर्चस्व राहिले. सौदी अरेबियाने त्यांच्या बॉक्समध्ये फाऊल केला, ज्यावर रेफ्रींनी पेनल्टी बहाल केली. मेस्सीने पेनल्टीवर गोल केला. यानंतर पूर्वार्धापर्यंत सामना अर्जेंटिनाच्या बाजूने राहिला. संघाने 1-0 अशी आघाडी कायम ठेवली होती. उत्तरार्धात सौदी अरेबियाच्या संघाने वर्चस्व गाजवले. अल शेहरी आणि अल दोसारी यांनी दोनदा गोल करत सौदी अरेबियाला 2-1 ने आघाडी मिळवून दिली.

अर्जेंटिनाचा विजयरथ ३६ सामन्यांनंतर थांबला

या पराभवासह अर्जेंटिनाची सलग 36 सामन्यांची विजयी मालिका खंडित झाली. 2019 पासून अर्जेंटिनाने खेळलेल्या 36 सामन्यांपैकी 25 सामने जिंकले आणि 11 सामने अनिर्णित राखले होते. मात्र सौदी अरेबियाकडून झालेल्या पराभवामुळे अर्जेंटिनाचे, इटलीचा सर्वाधिक 37 विजयी सामन्यांच्या विक्रम मोडण्याचे स्वप्न भंगले.

मेस्सीचा विक्रम

या सामन्यातील पराभवानंतरही मेस्सीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. चार वेगवेगळ्या विश्वचषकांमध्ये गोल करणारा मेस्सी अर्जेंटिनाचा पहिला खेळाडू ठरला. त्याचा हा पाचवा विश्वचषक आहे. त्याने 2006, 2014, 2018 आणि 2022 मध्ये गोल केले. 2010 मध्ये मेस्सीला एकही गोल करता आला नव्हता. या बाबतीत मेस्सीने संघाचा माजी कर्णधार दिएगो मॅराडोना आणि बतिस्तुताला मागे सोडले आहे. दिवंगत डिएगो मॅराडोनाने 1982, 1986 आणि 1994 च्या विश्वचषकात गोल केले होते. त्याच वेळी, बतिस्तुताने 1994, 1998 आणि 2002 च्या विश्वचषकात गोल केले. चार वेगवेगळ्या विश्वचषकांमध्ये गोल करणारा मेस्सी हा फुटबॉल इतिहासातील पाचवा खेळाडू आहे. या बाबतीत मेस्सीने ब्राझीलचा महान पेले, जर्मनीचा उवे सीलर, मिरोस्लाव क्लोस आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यांची बरोबरी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा