बंगळुरु : तामिळनाडूने बंगळुरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विजय हजारे चषक सामन्यात अ श्रेणी क्रिकेटमध्य 506 धावांचा डोंगर उभारला. यासह 500 किंवा त्याहून अधिक धावा करणारा जगातील पहिला संघ ठरला आहे.

सोमवारी अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्यांनी ही कामगिरी केली. तामिळनाडूकडून या सामन्यात नारायण जगदीशन आणि साई सुदर्शन यांनी अ श्रेणी क्रिकेटमधील सर्वात मोठ्या सलामीच्या भागीदारीचा विक्रमही केला. याशिवाय अ श्रेणी क्रिकेटमध्ये या जोडीने सर्वांत मोठ्या भागीदारीचा विक्रमही मोडीत काढला. दोन्ही फलंदाजांनी आपापल्या संघासाठी शतके झळकावली.

प्रथम फलंदाजी करताना तामिळनाडूने आपल्या डावात 2 गडी बाद 506 धावा केल्या. तामिळनाडूच्या या डावात नारायण जगदीशनने सर्वाधिक 277 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 25 चौकार आणि 15 षटकार मारले. त्याच्याशिवाय साई सुदर्शननेही 154 धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्याने 19 चौकार आणि 2 षटकार मारले. या दोन फलंदाजांच्या जोरावर संघाने सर्वोच्च धावसंख्या गाठली.

अरुणाचल प्रदेशचा ७१ धावांत धुव्वा

या सामन्यात तामिळनाडूच्या आव्हानाचा पाठलाग करताना अरुणाचल प्रदेशचा डाव अवघ्या 71 धावांत संपुष्टात आला. अरुणाचल प्रदेशकडून कर्णधार कमलेश यांगफोने सर्वाधिक 17 धावा केल्या. अरुणाचल प्रदेशचे तीन फलंदाज वगळता इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. अरुणाचल प्रदेशचे 4 फलंदाज शून्यावर बाद झाले.तामिळानाडूकडून एम सिद्धार्थने सर्वाधिक 5 बळी घेतले. तर एम महम्मद आणि आर सिलाबर्सन यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांची शिकार केली.

इंग्लंडला मागे टाकले

तामिळनाडूच्या डावात 500 धावा पूर्ण होताच त्यांनी इंग्लंडला मागे सोडले. याच वर्षी इंग्लिश संघाने नेदरलँड्सविरुद्ध 4 गडी गमावून 498 धावा केल्या होत्या. 2007 मध्ये, सरेने ग्लॉस्टरशायरविरुद्ध 4 गडी गमावून 496 धावा केल्या होत्या. 018 मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 481 धावा केल्या होत्या. तर, वर्ष 2018 मध्ये भारत अ ने लीसेस्टरशायर विरुद्ध 4 गडी गमावून 458 धावा केल्या होत्या. आता तामिळनाडूचा संघ अ श्रेणी क्रिकेटमध्ये 500 पेक्षा अधिक धावा करणारा जगातील पहिला संघ बनला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा