दोहा : फिफा विश्वचषक स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी सोमवारी इंग्लंडने आपल्या विश्वचषक मोहिमेची धमाकेदार सुरुवात केली. त्यांनी इराणचा 6-2 असा पराभव केला. इंग्लंडकडून सामन्यात पाच खेळाडूंनी गोल केले.

इंग्लंडच्या विजयाचा नायक ठरलेल्या बुकायो साकाने सर्वाधिक दोन गोल केले. त्यांच्याशिवाय ज्युड बेलिंगहॅम, रहीम स्टर्लिंग, मार्कस रॅशफोर्ड आणि जॅक ग्रीलिश यांनीही गोल करण्यात यश मिळवले.

दुसरीकडे संपूर्ण सामन्यात चाचपडत खेळणार्‍या इराणला दोनच गोल करत आले. इराणकडून दोन्ही गोल मेहदी तारेमीने केले.इंग्लंडच्या जुड बेलिंगहॅमने सामन्यातील पहिला गोल केला. खेळाच्या 35 व्या मिनिटाला त्याने ल्यूक शॉच्या उत्कृष्ट क्रॉसचे हेडरद्वारे गोलमध्ये रूपांतर केले. आठ मिनिटांनंतर बुकायो साकाने इंग्लंडला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. बचावपटू हॅरी मॅग्वायरनेही उत्कृष्ट पास देत बुकायो साकाच्या गोलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

इराणचा गोलरक्षक अलिरेझा बरनवंद पूर्वार्धाच्या सुरुवातीच्या मिनिटांत जखमी झाला, त्यामुळे बराच वेळ वाया गेला. परिणामी, पूर्वार्धाची 45 मिनिटे संपल्यानंतर 14 मिनिटे दुखापतीची वेळ देण्यात आली. यामध्ये इंग्लिश संघाला गोल करण्यात यश आले. इंग्लंडकडून रहीम स्टर्लिंगने गोल केला. कर्णधार हॅरी केनच्या पासवर त्याने 45+1 मिनिटात हा गोल केला.

उत्तरार्धातही इंग्लंडने चांगली सुरुवात करून इराणच्या गोलपोस्टवर दडपण आणले. परिणामी, बुकायो साकाने 62 व्या मिनिटाला गोल करत इराणविरुद्ध इंग्लंडची आघाडी 4-0 अशी केली. रहिम स्टर्लिंगच्या पासवर साकाने हा सोपा गोल केला. साकाचा हा सामन्यातील दुसरा गोल ठरला. दुसरीकडे, मेहदी तारेमीने तीन मिनिटांनंतर म्हणजेच 65व्या मिनिटाला घोलीजादेहच्या पासवर संघासाठी पहिला गोल केला.

मात्र, इराणचा हा आनंद फार काळ टिकला नाही आणि 71व्या मिनिटाला बदली खेळाडू मार्कस रॅशफोर्डने कर्णधार केनच्या पासवर गोल करून 5-1 अशी आघाडी घेतली. खेळाच्या 89व्या मिनिटाला इंग्लिश संघासाठी आणखी एक गोल करण्यात कॅलम विल्सनलाही यश आले. रेफरीने 90 मिनिटे संपल्यानंतर 10 मिनिटे दुखापतीची वेळ जोडली, जिथे मेहदी तारेमीने पेनल्टीद्वारे इराणसाठी गोल केला. अशाप्रकारे इंग्लंडने हा सामना 6-2 असा जिंकला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा