डॉ. अरविंद नेरकर

सदैव हसतमुख राहून दुसर्‍यांना हसविणारा माझा जिवलग कविमित्र श्रीधर रायरीकर याचे नुकतंच निधन झाले. मृत्यूपूर्वीच्या आठवड्यात भेटायला गेल्यानंतर अंथरुणावर असलेल्या श्रीधरने माझ्याशी मनमोकळेपणाने जुन्या आठवणींना उजळा देत तीन-चार तास गप्पाही मारल्या. त्यावेळी स्वतःच्या पायाने चालता न येणार्‍या अवस्थेतील श्रीधरचा अकस्मात मृत्यू हा मनाला चटका लावून गेला.

श्रीधर रायरीकर या नावाने सामाजिक कार्यकर्ता या नात्याने अनेकांशी स्नेहसंबंध जोडले होते. मग ते काव्यशिल्प असो वा हरिकीर्तनोत्तेजक सभा (नारद मंदिर) असो, श्रीधर या संस्थांशी एकरूप झालेला होता. त्यामुळे सामाजिक जीवनात त्याने लोकप्रियता मिळवली होती. काव्यवाचन, पौरोहित्य, व्याख्याने, प्रवचने, कीर्तने या सर्वच क्षेत्रात श्रीधरचा मोलाचा सहभाग होता.

मी नाशिकहून पुण्याला वृत्तपत्रविद्या पदवी मिळविण्यासाठी प्रवेश घेतला. त्या वेळी आम्हा नुकतीच पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांबरोबर श्रीधर हा संसार व नोकरी सांभाळून केवळ आवडीसाठी वृत्तपत्रविद्या वर्गात प्रवेश घेतलेला कुटुंबवत्सल विद्यार्थी होता. आम्हा विद्यार्थ्यांपेक्षा 8-10 वर्षांनी मोठा होता. मात्र समवयस्क असल्यासारखा आम्हा विद्यार्थ्यांमध्ये तो मिसळून जायचा.

श्रीधरच्या बोलण्यात आचार्य प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, राम गणेश गडकरी, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद यांसारख्या ज्येष्ठ विचारवंतांचे, तसेच मान्यवर लेखकांचे संदर्भ यायचे. वृत्तपत्रविद्या विभागात आपली केंद्र सरकारी कार्यालयातली नोकरी सांभाळून वेळोवेळी व्याख्यानांनाही उपस्थित राहून श्रीधरने चिकाटीने वृत्तपत्रविद्या पदवी संपादन केली.

वृत्तपत्रविद्या पदवीच्या निमित्ताने श्रीधरशी आलेला संपर्क कायमचा ॠणानुबंध असल्यासारखा जोडला गेला, तो वर्षानुवर्षे मैत्रीच्या रूपाने शेवटपर्यंत कायम राहिला. शिक्षणानंतर नोकरीच्या निमित्ताने नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथे माझ्या विद्युतमंडळात काम करताना बदल्या झाल्या, तरी अधूनमधून भेटींमुळे श्रीधरशी संपर्क कायमच राहिला. सेवानिवृत्तीनंतर मी पुण्यातच राहिल्याने हा संपर्क विशेष दृढ झाला.

श्रीधर रायरीकर याच्या स्वभावामध्ये एक वेगळेपणा होता व तो म्हणजे दुसर्‍याची मुक्त कंठाने प्रशंसा करायची व प्रसंगी प्रोत्साहनही द्यायचे. आणखी एक वेगळेपणा म्हणजे सकारात्मक वृत्ती. स्वतः श्रीधर जीवनाविषयी सकारात्मक असायचा. आपल्या स्वतःच्या जीवनात केंद्र सरकारच्या सेवेत राहून पत्रकारितेची पदवी मिळवणारा श्रीधर अतिशय जिद्दीने काम करणारा व्यासंगी होता. त्याच्या वैयक्तिक संग्रहात अनेक मान्यवरांची, विचारवंतांची पुस्तके होती. वेगवेगळ्या विषयांचे वाचन करून चिंतन-मनन करणार्‍या श्रीधरने ठिकठिकाणी व्याख्यानेही दिली. अनेक कार्यक्रमांतून जेथे आवश्यक तेथे, संधी मिळेल तेथे तेथे काव्यवाचन करीत असे.

काव्यवाचनाबरोबर विविध गायक म्हणजे मुकेश, रफी, किशोरकुमार यांची गाणीही तो तल्लीन होऊन गायचा. पौरोहित्य करण्याच्या निमित्ताने अध्यात्माची आवडही त्याने जोपासली होती. श्रीधरच्या बोलण्यात मराठीचे शब्दभांडार खुले झाल्यासारखे वाटायचे. श्रीधरचा आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे त्याची स्मरणशक्ती दांडगी होती. कौटुंबिक जीवन, मैत्री यांबरोबरच भोवतालच्या जीवनाबद्दलच्या अनेक आठवणी ताज्या घडामोडींप्रमाणे तो सांगत असे.
श्रीधरने थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडिया आणि अनाथ व गरजू मुलांच्या संस्थेसाठी सामाजिक जाणिवेतून, निरपेक्ष भावनेने, आयुष्यभर काम केले. आयुष्याच्या अखेरपर्यंत प्रगल्भतेने संवाद करून सर्वांना आपलेसे करणारा, निर्मळ मनाचा, व्यासंगी कविमित्र आपल्याला सोडून गेल्याचे
दुःख मनात दाटून येते.

या कविमित्राला विनम्र भावाने ही श्रद्धांजली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा