ट्युरिन : सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने सहाव्यांदा एटीपी फायनल्सचे विजेतेपद पटकावले आहे. इटलीतील ट्यूरिन येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात त्याने नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा 7-5, 6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. त्याने सहा एटीपी फायनल्स विजेतेपद जिंकून दिग्गज माजी टेनिसपटू रॉजर फेडररच्या विक्रमाची बरोबरी केली. सात वर्षांनंतर जोकोविचने हे विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी त्याने 2008, 2012, 2013, 2014 आणि 2015 मध्येही हे विजेतेपद पटकावले होते.

या विजेतेपदासह जोकोविच या मोसमात अपराजित राहिला. त्याला टेनिसमधील सर्वांत मोठा पगाराचा धनादेशही मिळाला. त्याला बक्षीस म्हणून 38.78 कोटी रुपये मिळाले. आता जोकोविच पुढील मोसमाची सुरुवात ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेने करेल. गेल्या वर्षी कोरोन लस न घेतल्यामुळे व्हिसाच्या कारणास्तव त्याला ही स्पर्धा खेळण्याची परवानगी मिळाली नव्हती.

एटीपी फायनल्सच्या अंतिम सामन्यात जोकोविचने रुडचा 7-5, 6-3 ने पराभव केला. पहिल्या सेटमध्ये रुडने जोकोविचला कडवी झुंज दिली. मात्र, 21 वेळचा ग्रँडस्लॅम विजेता जोकोविचने दुसर्‍या सेटमध्ये रुडचा सहज पराभव केला. 35 वर्षीय जोकोविच हा जेतेपद पटकावणारा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. जेतेपद पटकावल्यानंतर तो म्हणाला की, हा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता. जोकोविचने उपांत्य फेरीत रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव केला होता.

वर्षभराच्या चढ-उतारानंतर जोकोविचने वर्षाचा शेवट सकारात्मक पद्धतीने केला. आता काही आठवडे विश्रांती घेणार असल्याचे त्याने सांगितले. जोकोविच म्हणाला की, हे वर्ष थोडे कठीण गेले कारण त्याला कुठेही जाण्यासाठी परवानगी नव्हती. मात्र, तो आता आनंदी आहे. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत जोकोविच स्पेनच्या राफेल नदालनंतर दुसर्‍या स्थानावर आहे. नदालकडे 22 ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत. जोकोविच ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत खेळला, तर तो या विक्रमाशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा