मुंबई वार्तापत्र : अभय देशपांडे

जन्माला आलेले मूल दीड-दोन वर्षात बोलायला शिकते, पण काय बोलावे व काय बोलू नये, हे शिकण्यात अनेकांचे आयुष्य निघून जाते, असे म्हणतात. काही लोकांना तर हे शिकण्याची आवश्यकताही वाटत नाही. त्याचा प्रत्यय सध्या रोज येतो आहे. मागचा पंधरवडा राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार व गुलाबराव पाटील यांनी गाजवला. या आठवड्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा. सावरकरांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे आरोप-प्रत्यारोपांची राळ उडालेली असताना, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात एक वक्तव्य करून आणखी एक वाद निर्माण केला आहे.

कोश्यारी बोलले आणि वाद निर्माण झाला नाही, असे कधी होत नाही. राज्यात सत्तांतर झाल्यापासून त्यांची सक्रियता कमी झाल्याने वादही थांबले होते; पण त्यांनी ती उणीव भरून काढायची असे ठरवलेले दिसते. त्यांच्या वक्तव्याचे संतप्त पडसाद उमटत असतानाच, भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही छत्रपतींसंदर्भात आणखी एक वादग्रस्त करत महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळले आहे. स्वा. सावरकरांच्या माफीनाम्याचे समर्थन करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची 5 वेळा माफी मागितली होती, अशी मुक्ताफळे या महाशयांनी उधळली. त्यामुळे सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेस व शिवसेनेविरोधात आक्रमक झालेल्या भाजपची अडचण झाली आहे.

महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीत संतांचे खूप मोठे योगदान आहे. तुकोबारायांनी धर्म आचरणाबरोबरच कर्म कसे असले पाहिजे याबाबत फार मोठे प्रबोधन केले आहे. अन्य संतांनीही हीच शिकवण दिली आहे. संतसाहित्यातील एक अभंग मोठ्या अक्षरात छापून सर्व वाचळवीरांना पाठवण्याची गरज आहे. सार्वजनिक जीवनात वावरणार्‍या लोकांनी कसे वागावे, बोलावे याचे उत्तम मार्गदर्शन यात आहे.

घासावा शब्द । तासावा शब्द ।
तोलावा शब्द । बोलण्यापूर्वी ॥
शब्द हेचि कातर । शब्द सुईदोरा ।
बेतावेत शब्द । शास्त्राधारे ॥
बोलावे नेमके । नेमके, खमंग खमके ।
ठेवावे भान । देश, काळ, पात्राचे ॥
बोलावे बरे । बोलावे खरे ।
कोणाच्याही मनावर । पाडू नये चरे ॥
कोणाचेही वर्म । व्यंग आणि बिंग ।
जातपात धर्म । काढूच नये ॥
थोडक्यात समजणे । थोडक्यात समजावणे ।
मुद्देसूद बोलणे । ही संवाद कला ॥
शब्दांमध्ये झळकावी । ज्ञान, कर्म, भक्ती!
स्वानुभावातून जन्मावा । प्रत्येक शब्द ॥
शब्दांमुळे दंगल । शब्दांमुळे मंगल ।
शब्दांचे हे जंगल । जागृत राहावं ॥
जीभेवरी ताबा । सर्वसूखदाता ।
पाणी, वाणी, नाणी । नासू नये ॥

या अभंगाचा दोन-चार लोकांवर परिणाम झाला तरी अकारण निर्माण होणार्‍या वादांची संख्या कमी होईल व मूलभूत प्रश्नांवरील चर्चांना थोडाफार वेळ मिळू शकेल, अशी आशा करायला हरकत नाही. अर्थात दोन्ही बाजूला असलेली वाचाळवीरांची फौज बघता ही अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता कमीच आज.

भारत जोडो व सावरकर वाद!

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत असल्याने स्वाभाविकच सत्ताधारी मंडळींमधील अस्वस्थता वाढत चालली आहे. मोदी सरकारबद्दलची नाराजी वाढली तरी लोकांपुढे समर्थ पर्याय नसल्याने पुढची 10-15 वर्षे आपल्याला कोणीही आव्हान देऊ शकत नाही, असा ठाम विश्वास काही लोकांना वाटत होता. परंतु राहुल गांधी यांच्या पदयात्रेला मिळणार्‍या प्रतिसादामुळे याला प्रथमच छोटासा का होईना धक्का बसला आहे. काँग्रेसची सध्याची स्थिती, प्रादेशिक पक्षाची काँग्रेसविरोधी भूमिका व राहुल गांधींच्या नेतृत्वाबाबत असलेल्या शंका यामुळे भाजपपुढे समर्थ पर्याय उभारणे सोप नसले तरी ’भारत जोडो’ने राहुल गांधींची प्रतिमा बदलली आहे. काही लोकांनी मोठ्या प्रयत्नाने तयार केलेल्या ’पप्पू’च्या प्रतिमेतून ते बाहेर येत आहेत. काँग्रेसपुढील दुसरा मोठा प्रश्न होता तो म्हणजे तरुणाईचा कमी झालेला ओढा. नवे रक्त काँग्रेसमध्ये येतच नव्हते. नेत्यांची मुले वगळता तरुणाई काँग्रेसपासून दुरावली होती. मात्र या पदयात्रेत तरुण व महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. ही बाब काँग्रेसचा आत्मविश्वास वाढवणारी व काँग्रेस संपली, असे म्हणणार्‍या लोकांना अस्वस्थ करणारी आहे.

महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच स्वा. सावरकरांच्या संदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी काहूर उठवले आहे. स्वा. सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती, एवढेच नव्हे तर ब्रिटिशांकडून ते पेन्शनही घेत होते, असा आरोप राहुल गांधी यांनी हिंगोली येथे बोलताना केला. हा आरोप त्यांनी पहिल्यांदाच केला असे नाही. यापूर्वीही अनेकदा ते हे बोलले आहेत. काँग्रेसची सावरकरांबद्दलची भूमिका आत्ता बदलली असेही नाही. वाजपेयी सरकार असताना संसदेत सावरकरांचे तैलचित्र लावले तेव्हाही काँग्रेसने त्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. त्यामुळे राहुल गांधी काही वेगळे, नवीन, वादग्रस्त बोलले असे अजिबात नाही. प्रश्न हा आहे की त्यांना सगळे व्यवस्थित सुरू असताना हे बोलण्याची गरज होती का? गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. यापूर्वी शिवसेनेसोबत त्यांची आघाडी नव्हती. शिवसेनेने नेहमीच स्वा. सावरकरांची आक्रमकपणे पाठराखण केली आहे. त्यांच्या राजकारणाची दिशा बदलली असली तरी त्यांना पूर्वीची भूमिका एका दिवसात बदलता येणार नाही. राहुल गांधी यांच्या वक्तव्यांमुळे त्यांची अडचण झाली. पूर्वी मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी जोडे मारो आंदोलन केले होते. आज त्यांचेच नातू आदित्य ठाकरे मात्र राहुल गांधी यांच्या पदयात्रेत जातात, त्यांना मिठ्या मारतात, या विरोधाभासावर बोट ठेवण्याची संधी भाजपला व शिंदे गटाला यामुळे मिळाली. सारवासारव करण्यासाठी शिवसेनेला भूमिका घ्यावी लागली, सावरकर आमचे दैवत आहेत व त्यांच्यावरील टीका सहन करणार नाही, आघाडीवर याचे परिणाम होतील, असे इशारे देणे शिवसेनेला भाग पडले. प्रत्यक्षात तसे काहीही होणार नाही याची सर्वांनाच कल्पना आहे. परंतु भाजपविरोधात असलेल्या पक्षांची मोट बांधायची असेल, तर वादग्रस्त मुद्दे टाळले पाहिजेत, ही अपेक्षा चुकीची नाही.

छत्रपतींच्या अवमानाचे तीव्र पडसाद!

सावरकरांवरील टीकेचा विषय तापलेला असताना भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी एक वादग्रस्त विधान करून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. सावरकरांनी ब्रिटिशांना माफीनामा दिला होता ही वस्तुस्थिती आहे; पण हा माफीनामा म्हणजे शरणागती नव्हती, तर रणनीतीचा भाग होता, असे भाजप व उजव्यांचे म्हणणे आहे. तसे असेलही, पण या माफीनाम्याचे समर्थन करताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवरायांनीही 5 वेळा औरंगजेबाची माफी मागितली होती, असे वक्तव्य केले. शनिवारी सकाळी औरंगाबाद येथील कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श होते, असे सांगताना आजच्या नेत्यांना नवे आदर्श म्हणण्याचा आगाऊपणा केला होता. त्यावर जाऊन सुधांशू त्रिवेदी यांनी कळस केला. राज्यभरात याची संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर सारवासारव करताना भाजप नेत्यांना बरीच कसरत करावी लागत होती. वाचाळ नेत्यांना रोखले नाही तर भविष्यात अडचणी वाढत जातील, हे नक्की.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा