राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रातून परतली आहे. यात्रेने राज्यातील काँग्रेसला बळ दिले, त्याचवेळी सावरकरांवरील विधानामुळे जे वादंग माजले त्यातून काँग्रेस विरोधकांनाही मुद्दा मिळाला.

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा महाराष्ट्रातील टप्पा वादामुळे गाजला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात त्यांनी केलेले विधान वादंगाला कारण ठरले. शेगावमधील त्यांच्या सभेकडे राज्याचे लक्ष लागले होते. सभेला प्रचंड गर्दी होती. राज्यात अलीकडच्या काळात झालेल्या सभांपैकी ती मोठी सभा ठरली. राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेले कार्यकर्ते पाहता पक्षाच्या नियोजनाला यश आल्याचे दिसते. ‘भाजपने देशभर द्वेष पसरवला, द्वेष, हिंसा आणि दहशतीच्या विरोधात ही यात्रा आहे,’ असे राहुल शेगावच्या सभेत म्हणाले. ‘भारत जोडो’ यात्रेला सर्वसामान्यांचा मिळणारा पाठिंबा राज्य आणि केंद्रातील सत्ताधार्‍यांची चिंता वाढविणारा आहे हे निश्‍चित. हा प्रतिसाद कशामुळे? याबद्दल भाजपने चिंतन करण्याची गरज आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा धुमाकूळ आणि सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांऐवजी भावनिक मुद्दे पुढे आणून तेच केंद्रस्थानी राहतील हे भाजपकडून पाहिले जात आहे. ‘सब का साथ, सब का विकास’ या घोषणेला जाणीवपूर्वक अडगळीत टाकण्यात आले. ती कृती भाजपचा दौडत असलेला अश्‍वमेध रोखणारी ठरू शकते. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या मित्रपक्षांचे प्रमुख नेतेदेखील यात्रेत सहभागी झाले. विविध संघटना, चळवळीतील नेते-कार्यकर्ते यांचाही सहभाग लक्षणीय होता. यात्रेचा महाराष्ट्रातील टप्पा पूर्ण झाला. यात्रेबद्दल आधी उपहासाचा असलेला सूर काँग्रेस विरोधकांना बदलावा लागला.

विदर्भात बळ मिळणार?

विदर्भ हा काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला. भाजपच्या झंझावातात तो कोसळला. राज्यातील पक्षनेत्यांनी भारत जोडो यात्रेने निर्माण केलेले वातावरण पुढेही कायम ठेवण्याचा प्रयत्न केला, तर काँग्रेसला विदर्भात अस्तित्व दाखवून देता येणे शक्य आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भातील विधान आणि तेही महाराष्ट्रात केल्याने राज्यातील नेत्यांची गैरसोय झाली. या विषयावरील काँग्रेसची भूमिका बदलली नसली, तरी महाराष्ट्रात आणि देशातही सावरकरांबद्दल आदराची भावना आहे. देशासाठी त्यांनी केलेल्या अपार त्यागाची तुलना होऊ शकत नाही. इंग्रजांना सर्वात भीती होती ती क्रांतिकारकांची. पुढच्या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रिटिश साम्राज्याला हादरा दिला. तो इतिहास बदलला जाऊ शकत नाही. सावरकरांचे हिंदुत्व धर्माशी संबंधित नव्हते. भारत जोडो यात्रेचे उद्दिष्ट पाहता सावरकरांवरील विधान औचित्याचे नव्हते. भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांनी अपेक्षेप्रमाणे राहुल यांच्या विधानाचा फायदा उठवला. कारवाईची भाषा झाली. माध्यमांकडून दुर्लक्षिली गेलेली भारत जोडो यात्रा पुन्हा प्रकाशात आली. राहुल यांच्या सभेत गोंधळ होण्याची शक्यता निर्माण झाली. तसे झाले नाही हे सुदैव. निषेध व्यक्त करण्यासाठी शेगावच्या दिशेने निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांना आधीच अडविण्यात आले. सावरकरांना भारतरत्न सन्मान द्यावा, ही मागणी जुनी आहे. आपण सावरकर प्रेमी असल्याची भूमिका घेत निषेध नोंदविण्यासाठी हिरिरीने पुढे येणारा भारतीय जनता पक्ष त्यावर मौन बाळगून असतो. हा विरोधाभास जाणवण्यासारखा आहे. राजकारणासाठीच सावरकरांचा उपयोग करायचा असे सर्वांनी ठरविले आहे का? राहुल यांच्या विधानामुळे राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना जशी बचावात्मक भूमिका घ्यावी लागली तशीच गैरसोय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचीही झाली. राज्यातील सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीत आलबेल नाही. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. भाजपने शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह उभे केले. शिवसेनेने राहुल यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे सांगितले असले, तरी शिवसेना नेत्यांमध्ये असलेली अस्वस्थता लपलेली नाही. महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडू शकते, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. सावरकरांविषयी विधाने थांबवू, असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी त्यांना सांगितले. त्या पार्श्‍वभूमीवर जाहीर सभेत राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल मौन पाळणे सूचक होते. महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडण्याची शक्यता नाही आणि एवढ्या कटुतेनंतर भाजपबरोबर त्यांचा सहप्रवास सुरू होईल, हे इतक्यात तरी संभवत नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा