भाग्यश्री पटवर्धन

एलआयसीने एका तिमाहीत मिळालेला नफा 15 हजार कोटी रुपयांच्या वर असणे हे भागधारकांच्या दृष्टीने नक्कीच आशादायक आणि आगामी काळात या शेअरमध्ये वाढ दर्शवणारे आहे. ‘जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी’ अशी जाहिरात करत असलेल्या आणि आयुर्विमा म्हणजे लाईफ इन्शुरन्स क्षेत्रात देशात आज 60 टक्क्यांहून (68.25%) अधिक बाजार हिस्सा असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाची (एलआयसी) नुकत्याच संपलेल्या तिमाहीचे कामगिरी लक्षवेधक ठरली आहे.

एलआयसीच्या प्राथमिक भागविक्रीला मिळालेला प्रतिसाद आणि त्यानंतर त्या कंपनीच्या शेअरची बाजारावर झालेली काहीशी निराशाजनक नोंदणी या पार्श्वभूमीवर एका तिमाहीत मिळालेला नफा 15 हजार कोटी रुपयांच्या वर असणे हे भागधारकांच्या दृष्टीने नक्कीच आशादायक आणि आगामी काळात या शेअरमध्ये वाढ दर्शवणारे आहे. एक प्रकारे लाखो नाही तर कोट्यवधी भारतीयांची पोशिंदा म्हणून काम करत असलेली एलआयसी केवल केंद्र सरकारच्या दृष्टीने नव्हे तर भांडवली बाजाराचा विचार केल्यासही एक महत्वाची संस्था. तिची गुंतवणूक क्षमताही जबरदस्त. एका वर्षात 40-50 हजार कोटी रुपये रक्कम एलआयसी बाजारात गुंतवते. यात दोन फायदे आहेत. 1) विमेदाराला मिळणारे संरक्षण 2) भागधारकाला मिळणारा परतावा.

एलआयसीबाबतची महत्त्वाची आकडेवारी आता पाहू –

ज्याला कंपनीची एम्बेडेड व्हॅल्यू म्हणजे आंतरिक मूल्य म्हणतात ते एलआयसीबाबत प्राथमिक भागविक्री झाल्यावर लोकांना कळले. ते आज आहे 5,44,291 कोटी रुपये. 2021 मध्ये ते 5,39,686 कोटी रुपये होते. विमा हप्त्यापोटीचे उत्पन्न 23.87 टक्के वाढले आहे. ते आहे 2,30,456 कोटी रुपये. करोत्तर नफा 16635 कोटी रुपये झाला आहे. चालू सहामाहीत 83,59,029 वैयक्तिक पॉलिसी विकल्या गेल्या आहेत. ही संख्यावाढ मागील वर्षाच्या तुलनेत 13.55 टक्के आहे. मागील आठवड्यात एलआयसीने शेअर बाजारात सुमारे 20 हजार कोटी रुपयांचे विविध कंपन्यांचे शेअर विकून नफा मिळवला आहे. त्यात मारुती, सन फार्मा, एचएएल, अल्ट्राटेक सीमेंट, सीमन्स, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, बजाज ऑटो या कंपन्यांच्या शेअरचा समावेश आहे. या कंपन्यांच्या नावावर नजर टाकली तरी सिमेंट, वाहन, औषध, विमान उद्योग अशा वेगवेगळ्या क्षेत्राला एलआयसीचा गुंतवणूकदार म्हणून हातभार लागतो हे लक्षात येते. आज एलआयसीवर केंद्र सरकारचे नियंत्रण आहे. त्याचे कारण प्राथमिक भागविक्रीवेळी केवळ साडेतीन टक्के हिस्सा विकण्यात आला आहे. या विक्रीने आणखी एक फायदा देशाला झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदलेल्या ज्या कंपन्यात सरकारचा हिस्सा आहे त्याचे प्रमाण आता 20 टक्के झाले आहे. तसेच यामुळे त्या हिश्श्याचे मूल्य सुमारे 17 लाख कोटी रुपये झाले आहे. ही सगळी आकडेवारी समोर असली तरी ज्या किंमत पट्ट्यात एलआयसीच्या शेअरची विक्री झाली त्यावर नोंदणी न झाल्याने काहीशी निराशा झाली हे खरे आहे. आता चेंडू पूर्णपणे एलआयसी संचालकांच्या हातात म्हणजे पर्यायाने सरकारच्या हातात असून त्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळेल अशी पावले उचलायला हवीत. भरभक्कम लाभांश हे पहिले पाऊल ठरावे अशी अपेक्षा आहे. एक नक्की. भारतीय शेअर बाजारात एलआयसी हा ‘लंबी रेस का घोडा’ राहणार आहे. एलआयसीचा बाँबे स्टॉक एक्स्चेंजवर शुक्रवारचा बंद भाव 638 रुपये 85 पैसे होता. कंपनीचा 52 आठवड्यातील कमाल आणि किमान भाव (52-ुज्ञ हळसह 918.95 52-ुज्ञ श्रेु 588) पाहता घसरण झाल्यास ज्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना प्राथमिक भागविक्रीवेळी शेअर मिळाले नाहीत त्यांना सध्याच्या भावात किंवा जेव्हा जेवहा घसरण दिसेल तेव्हा हा शेअर दीर्घकाळासाठी घेणे फायदेशीर ठरेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा