माऊंट माऊनगाऊई : सूर्यकुमार यादवच्या आक्रमक शतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा टी-20 सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

भारताच्या 191 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही. पहिल्याच षटकात न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. भुवनेश्‍वर कुमारने फिन ऍलनला शून्य धावेवर तंबूत पाठवले. यानंतर न्यूझीलंडचा संघ अतिशय संथगतीने धावा काढताना दिसला. भारतीय संघाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना मुक्तपणे फलंदाजी करण्याची संधी दिली नाही.

न्यूझीलंडचा डाव सांभाळताना केन विल्यमसनने संथ अर्धशतक झळकावले. केन विल्यमसनने 52 चेंडूत 61 धावांची खेळी खेळली, ज्यात 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. न्यूझीलंडला शेवटच्या चार षटकांत चार विकेट्स शिल्लक असताना 90 धावांची गरज होती. मात्र न्यूझीलंडचा संघ 18.5 षटकांत 126 धावांवच गारद झाला.

या सामन्यात भारतीय गोलंदाजांमध्ये दीपक हुडाने सर्वात दमदार कामगिरी केली. हुडाने 2.5 षटकात केवळ 10 धावा देत 4 बळी घेतले. गोलंदाज भुवनेश्वर कुमारने 3 षटकात 12 धावा देत 1 बळी घेतला. अर्शदीप सिंगने तीन षटकांत 29 धावा दिल्या, पण त्याच्या खात्यात एकही बळी जमा झाला नाही. मोहम्मद सिराजने चार षटकांत 24 धावा देत दोन गडी बाद केले. त्याच्याशिवाय वॉशिंग्टन सुंदरने 2 षटके टाकून 24 धावा देत 1 बळी घेतला. त्याचवेळी प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणार्‍या युजवेंद्र चहलने 4 षटकांत 26 धावा देत 2 बळी घेतले.

सूर्यकुमारची चमकदार कामगिरी

  • रोहितची बरोबरी केली

सूर्यकुमारने आपल्या खेळीत 111 धावांच्या नाबाद खेळीत 11 चौकार आणि सात षटकार मारले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 217.65 होता. एका कॅलेंडर वर्षात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोन शतके करणारा सूर्यकुमार हा केवळ दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी 2018 मध्ये रोहित शर्माने अशी कामगिरी केली होती.

  • न्यूझीलंडविरुद्ध भारतीय फलंदाजाची सर्वोत्तम धावसंख्या

सूर्यकुमारची 111 धावांची खेळी ही टी-20 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारतीय फलंदाजाची सर्वोत्तम धावसंख्या आहे. भारतासाठी टी-20 मधील ही चौथी सर्वोत्तम खेळी आहे. अव्वल स्थानी विराट कोहलीने यावर्षी दुबईत अफगाणिस्तानविरुद्ध 61 चेंडूत 122 धावांची नाबाद खेळी आहे.

  • एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार

एका कॅलेंडर वर्षात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही सूर्यकुमारच्या नावावर आहे. त्याने या वर्षी आतापर्यंत एकूण 67 षटकार मारले आहेत. हा टप्पा गाठणारा सूर्या पहिला खेळाडू आहे. यापूर्वी एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मोहम्मद रिझवानच्या नावावर होता. त्याचबरोबर सूर्यकुमारने या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 100 चौकारही पूर्ण केले. यावर्षी त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 105 चौकार मारले आहेत.

साऊदीची हॅट्ट्रिक

न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज टीम साऊदीने हॅट्ट्रिक घेतली. त्याने भारतीय डावाच्या 20व्या षटकात लागोपाठ तीन चेंडूत तीन फलंदाजांना तंबूत धाडले. यामध्ये हार्दिक पांड्या, दीपक हुडा आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश होता. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोन हॅट्ट्रिक घेणारा साऊदी हा दुसरा गोलंदाज आहे. यापूर्वी साऊदीने 2010 मध्ये पाकिस्तानविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती. श्रीलंकेच्या लसिथ मलिंगानेही टी-20 क्रिकेटमध्ये दोन वेळा हॅट्ट्रिक घेण्याची कामगिरी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा