मुंबई : आर्थिक अफरातफर प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याला शुक्रवारी जामीन मंजूर केला. मात्र, अन्य प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे. त्यामुळे, तूर्तास त्याची सुटका होणार नाही. वाझे याने कलम 88 अंतर्गत जामीन अर्ज केला होता. त्यावरील सुनावणी 15 नोव्हेंबर रोजी पूर्ण झाली होती.
वाझे यास जामीन दिल्यास तो पुरावे नष्ट करू शकतो, असे ईडीने सांगितले होते. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत ईडीचा विरोध फेटाळून लावला आणि जामीन मंजूर केला. वाझे याच्या विरोधात ईडी, सीबीआय आणि एनआयए प्रकरणे प्रलंबित आहेत.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी वाझेला 100 कोटींच्या वसुलीचे आदेश दिले होते. देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. तर, पुढे त्यांना अटकही झाली. या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यासाठी वाझे याने अर्ज केला होता.