फेरफटका : प्रा. विकास देशपांडे

देशासमोरील वाढत्या अर्थ-राजकारणाशी निगडित समस्या, आश्‍वासनांची पूर्ती न झाल्यामुळे जनमानसात वाढत असलेली अस्वस्थता, सत्तारूढ पक्षाला पर्याय देण्यासाठी घोषणा होऊनसुद्धा पर्याय उभा करण्याबाबत ठोस कृतीचा अभाव या व अशा अन्य कारणांमुळे भारतीय जनतेमध्ये वाढत असलेले नैराश्य यांच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून मार्गक्रमण करती झाली. यात्रेचा जवळून अनुभव घेण्यासाठी आम्ही नांदेडला भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने दाखल झालो. लोकसंपर्क व मोठ्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी पदयात्रा करण्याचा प्रघात स्वातंत्र्य पूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडात अनेक नेत्यांनी अवलंबिला होता.

आधुनिक लोकशाही भारताची उभारणी करण्याच्या प्रयत्नात अशा पदयात्रांचे एक महत्त्वपूर्ण स्थान राहिले असल्याचे दिसून येते. स्वातंत्र्योत्तर काळात गांधीजींचे आध्यात्मिक पट्टशिष्य विनोबाजी भावे यांनी आयुष्याचा मोठा कालखंड बिहारमध्ये व्यतित करून मोठ्या जमीनदारांकडून हृदय परिवर्तनाद्वारे जमिनी घेऊन त्या गरीब कुळांना देण्याचे काम करून पदयात्रा या उपक्रमास समाजात मोठे स्थान प्राप्त करून दिले. त्या अगोदर महात्मा गांधीजींनी द. अफ्रिकेत काढलेला मार्च अगर भारतात काढलेली दांडी यात्रा यांचे एकूण आंदोलनात्मक परंपरेचे निर्माण होण्याच्या प्रक्रियेत फार मोठे स्थान आहे. पुढे 80 च्या दशकाच्या प्रारंभी तत्कालीन जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर यांची ‘भारत यात्रा’ही अद्याप स्मरणात आहे.

या पार्श्‍वभूमीवर स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय स्वातंत्र्याचे प्रमुख आंदोलक वाहन असलेला, सव्वाशे वर्षांचे सातत्यपूर्ण अस्तित्व असलेल्या काँग्रेसचे व राहुल गांधी यांच्या पदयात्रेने देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. जो आपले म्हणणे मांडण्यासाठी चालत जनतेपर्यंत जातो त्याला जनसमर्थन मिळते व त्याचे राजकीय भवितव्यही उजळते असे दिसून येते. जनताही अशा प्रयत्नाकडे राजकीय चष्मा बाजूला काढून खुल्या मनाने बघते व दाद देते असा अनुभव राहुल यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेलाही येत आहे. असा अनुभव आम्हाला पदोपदी येत होता. शहरातील प्रत्येक व्यक्ती व संस्था राजकीय बांधिलकीच्या पलीकडे जाऊन यात्रेचे स्वागत मनापासून करण्यात व यात्रेला यशस्वी करण्यात आपला सहभाग नोंदवित होता. शीख समुदायाची मोठी उपस्थिती नांदेड शहरात आहे. येथील गुरुद्वारा शिखांसाठी महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळ ! म्हणून जगातील हजारो शीख बांधव नांदेडला भेट देतात. गुरुद्वारा प्रबंधकांनी वसतिगृहे व लंगर यांच्या माध्यमातून येणार्‍या पदयात्री आणि स्वागतोत्सुक पर्यटक व कार्यकर्त्यांची उत्साहाने स्वागतव्यवस्था केली होती. स्वागत समिती व काँग्रेस कार्यकर्ते एक दिलाने कार्यक्रमाचे नेटके व्यवस्थापन करण्यात सतत गुंतले होते. संपूर्ण वातावरणामध्ये आपलेपणाचा दरवळ जाणवत होता.

राहुलजींच्या ‘भारत जोडो’ यात्रेस असलेली राजकीय पार्श्‍वभूमी नाही म्हटले तरी टाळता येण्याजोगी नाही. सत्तारूढ पक्षाने दिलेल्या रोजगारांच्या संधी अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. शेतकरी उत्पादितास किफायतशीर भाव मिळत नसल्यामुळे त्रस्त आहे, स्त्रियांवरील अत्याचारातील क्रौर्य वाढते आहे, आधुनिक भारताचे जनक जवाहरलाल नेहरु व त्यांच्या परिवाराची सातत्याने बदनामी करण्यात येत आहे, इंधन व अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत. कितीही लोकशिक्षणात्मक स्वरूप सदर यात्रेला दिले तरी उपरोक्त अर्थ-राजकीय पार्श्‍वभूमीचे वास्तव टाळता येणे शक्य नाही ! तशातच दोन कोटी रोजगार देण्याच्या आश्‍वासनाचे पुरते हसे झाले आहे. मर्यादित कालावधीसाठी सैन्यात अधिकारी म्हणून कमिशन देण्याची महत्त्वाकांक्षी योजना प्रारंभ होऊन तरी काही साध्य होणार काय ? हा प्रश्‍नच आहे. नोकरी देणार्‍या सरकारी योजना तरी ’फुलप्रूफ’ असाव्यात ना ? तर तेही नाही. प्रश्‍न वाढते आहेत. त्यांना माध्यमे पुरतेपणाने आवाज उठवून मोठ्या प्रमाणावर धसास लावताना दिसत नाहीत. हे सर्व प्रश्‍न राहुल गांधी आणि अन्य नेते भारत जोडो यात्रेत होणार्‍या जाहीर सभांमधून जोरकसपणे मांडत आहेत. भविष्यकाळात याचा परिणाम काय होईल याबाबत आत्ताच काही कथन छातीठोकपणे करणे अशक्य असले, तरी काँग्रेसच्या सव्वाशे वर्षे वयाच्या जुन्या वटवृक्षावर नवीन पालवीची हिरवळ नक्कीच दृष्टीस पडेल अशी आशा वाटते. मात्र आगामी संभाव्य अनुकूलतेचा सर्वंकष अशा लोकशाहीवादी ऐक्यात कशी परिणती होईल हे प्रादेशिक व राष्ट्रीय पक्ष किती शहाणपण दाखवतात यावरच अवलंबून असणार आहे. इष्ट तेच घडेल अशी आशा करू या !

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा