पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले.
आता फक्त आठवणी राहिल्या
ते दिवस भरभर सरत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले.
खेळापेक्षा अभ्यास ही गोष्ट
महत्वाची वाटायची नाही
’खेळून झाल्यावर अभ्यास’
ही गोष्ट घरातल्यांना पटायची नाही.
गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे
म्हणजे मोठी धमाल असे
दोन दगडांच्या स्टंपमध्ये
विश्‍वचषकाची मजा असे.
सागरगोटे, पतंग, भोवरे
सोबती सारेच सोडून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले.
शनिवारच्या सकाळी शाळेचे
आवरताना धांदल होई
आणि म्हणता म्हणता दंग्यांमध्ये
रविवार हळूच निघून जाई.
वर्गातील भांडणे सोडवताना
शिक्षकांच्या नाकी दम येई
आम्हाला ’वळण’ लावायच्या नादात
शेवटी घरातल्यानांच ’बाक’ येई !

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा