वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजाची भूमिका

पुणे : ’हर हर महादेव’ चित्रपटात दाखविण्यात आलेल्या चुकीच्या इतिहासाला आमचा आक्षेप आहे. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना आम्ही कायदेशीर पत्र देणार आहोत. तसेच सेन्सॉर बोर्डालाही आम्ही या संदर्भात पत्र पाठवणार आहोत, अशी भूमिका वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मांडली.

प्रा. रुपाली देशपांडे, अमर देशपांडे, किरण देशपांडे, महेश देशपांडे तसेच चंद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्थे’चे मंदार कुलकर्णी, राहुल दिघे आणि राजेंद्र देशपांडे यावेळी उपस्थित होते. या संस्थेने देशपांडेंच्या वंशजांनी घेतलेल्या आक्षेपांना पाठिंबा दर्शवला आहे.

आम्ही हा चित्रपट स्वत: पाहिला आणि त्यात दर्शवलेल्या काही संदर्भांबद्दल आक्षेप नोंदवत आहोत, असे प्रा. रुपाली देशपांडे यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांचा उल्लेख बाजीप्रभू कधीच ’अरे तुरे’ असा करणार नाहीत. याशिवाय हिरडस मावळात समुद्र किनारा दाखवला आहे. प्रत्यक्षात येथे समुद्रच नाही. येथे नीरा नदी वाहते. याशिवाय मावळात इंग्रज येऊन त्यांनी महिलांना नेले, असा प्रसंग दाखवण्यात आला होता. मुळात त्या काळात मावळात इंग्रजांचे एवढे प्राबल्य होते का, हा प्रश्न आहे, असे मुद्दे त्यांनी उपस्थित केले.

बाजीप्रभू आणि त्यांचे बंधू फुलाजी यांच्यात त्यांच्या लहानपणीचे एक भांडण दाखवले आहे. त्याला कोणताही ऐतिहासिक आधार नाही, वास्तविक पन्हाळ्याच्या लढाईत त्या दोघांनी एकत्रित प्राणांची आहुती दिली. त्यांची समाधी आजही एकमेकांच्या शेजारी आहे.

बांदल व बाजीप्रभू यांच्यातील काही प्रसंगही चुकीचे दाखवण्यात आले आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यांच्या वंशजांना तो दाखवावा अशी मागणी आम्ही केली होती. इतिहासकारांना, जाणकारांना या चित्रपटाचा ‘फर्स्ट कट’ दाखवला होता का? सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला परवानगी देताना इतिहासतज्ज्ञांची नेमणूक केली होती का, असे प्रश्नही त्यांनी या निमित्ताने उपस्थित केले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा