गुजरातेत भाजपमध्ये बंडखोरी झाल्याने काँग्रेसला आनंद झाला असावा; पण त्यांनी लगेच सत्तेची स्वप्ने पाहण्यात अर्थ नाही. मतदारांना आपल्याकडे वळवण्याचे आव्हान आहे हे या पक्षाने विसरू नये.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत असतानाच भारतीय जनता पक्षातील नाराजी उघड होत आहे. या वेळी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने किमान पाच आजी-माजी आमदारांनी स्वतंत्रपणे लढण्याचे ठरवले आहे. पक्षाचे माजी आमदार हर्षद वसावा यांनी नांदोड मतदार संघातून अपक्ष या नात्याने आपला अर्ज दाखलही केला. हा मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. वसावा हे गुजरात भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्च्याचे अध्यक्ष होते. ते पक्षाचा महत्त्वाचा आदिवासी चेहेरा होते. या मतदार संघात भाजपने उमेदवार जाहीर केल्यावार वसावा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि अपक्ष या नात्याने लढण्याचे ठरवले. गुजरातमध्ये दोन टप्प्यांत मतदान होत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस सोमवार होता. त्याच दिवशी सुरत जिल्ह्याच्या अनेक भागांत भाजपविरुद्ध मोठी निदर्शने झाली. या बंडखोरांना कसे शांत करायचे असा पेच पक्षाच्या केंद्रीय व राज्य नेतृत्वास पडला आहे. अजून दुसरा टप्पा बाकी आहे. कोणत्याही स्थितीत राज्याची सत्ता गमावता कामा नये हा पक्षाचा साधा विचार आहे; पण बंडखोरीमुळे अनेक मतदार संघात चित्र बदलू शकते ही चिंता मोठी आहे. या बंडखोरीचा फायदा विरोधी पक्ष उठवतील ही चिंताही आहेच.

सत्ता हेच आकर्षण

वाघोडिया मतदार संघातून सहा वेळा विजयी झालेले मधु श्रीवास्तव यांना डावलून भाजपने अश्‍विन पटेल यांना उमेदवारी दिली आहे. बहुधा पक्षाने येथे जातीचा विचार केलेला दिसतो. पटेल समाजाला जवळ करण्यासाठी अश्‍विन पटेल यांना उमेदवारी दिली असावी; पण त्यामुळे श्रीवास्तव यांनी अपक्ष लढण्याचे जाहीर केले आहे. पड्रा मतदारसंघात माजी आमदार दिनेश पटेल यांच्या ऐवजी चैतन्यसिंह झाला यांना उमेदवारी दिल्याने दिनेश पटेल यांनीही अपक्ष लढण्याचे ठरवले आहे. करजान मतदार संघात मात्र पटेल विरुद्ध पटेल असा संघर्ष दिसत आहे. दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमधून आलेले व पोटनिवडणुकीत विजयी झालेले अक्षय पटेल यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माजी आमदार सतीश पटेल नाराज आहेत. त्यांनी अक्षय यांच्यावर उघड टीका करत आपले समर्थक आपल्याला निवडणूक लढवण्याचा आग्रह करत असल्याचे सांगितले. याचा अर्थ तेही अपक्ष लढण्याची चिन्हे आहेत. वसावा यांनी तर सध्या खरी भाजप व बनावट भाजप दिसत आहे अशी टीका केली आहे. पक्षाशी एकनिष्ठ असणार्‍यांना डावलून नव्याने पक्षात आलेल्यांना उमेदवारी देणार्‍यांचा चेहरा उघड करू हे त्यांचे विधान धमकीसारखे आहे. भाजपने उमेदवार जाहीर करताना अनेक विद्यमान आमदारांना वगळले; पण त्याचवेळी काँग्रेसमधून आलेल्यांना झुकते माप दिले. त्यामुळे पक्षात असंतोष वाढला आहे. जात, समाज या बरोबरच पक्षासाठी निधी किंवा सोप्या भाषेत पैसा आणू शकणार्‍यांना पक्षाने जवळ केलेले दिसते; पण तेही गणित नीट जमलेले नसावे. चोरासिया मतदारसंघात विद्यमान आमदार झनखाना पटेल यांच्या ऐवजी पक्षाचे एक ज्येष्ठ नेते संदीप देसाई यांना उमेदवारी दिली. झनखाना पटेल हे कोळी समाजाचे आहेत तर देसाई ब्राह्मण आहेत. त्यामुळे सुरत जिल्ह्यात अनेक गावांत कोळी समाजाने निदर्शने केली. पक्षाला असंतोषाचे असे जाहीर प्रदर्शन पाहण्याची सवय नाही, त्यामुळे पक्षाचे नेते हबकले आहेत.‘ते सर्व भाजपच्या कुटुंबाचा भाग आहेत’ असे म्हणत असंतुष्ट व त्यांचे समर्थक यांना चुचकारण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. समजुतीने, प्रेमाने त्यांना सांभाळण्याची धडपड पक्ष करत आहे. त्यास किती यश येते ते लवकरच दिसेल.1995 पासून भाजप गुजरातमध्ये सत्तेत आहे. आता पुन्हा सत्ता मिळण्याची अपेक्षा आहे. तोच आकर्षणाचा बिंदू आहे. सत्तेत असण्यासाठी सर्वांची धडपड आहे. अपक्ष या नात्याने विजयी झाल्यावरही नंतर पक्षात पुन्हा स्थान मिळते आणि सत्तेत राहता येते हे राजकारण्यांना ठाऊक आहे. आपल्या मतदार संघात पक्ष नव्हे तर आपण मोठे आहोत हेही दाखवण्याचा हा प्रयत्न असू शकतो. मात्र यामुळे ‘शिस्तबद्ध’ मानल्या जाणार्‍या भाजपमधील बेशिस्तीचे आणि बेदिलीचे दर्शन घडले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा