ऐसपैस शिक्षण : संदीप वाकचौरे

शिक्षण आणि जीवन यांचे एक अतूट नाते आहे. प्रत्यक्ष जीवन जगताना आपण जे शिकतो तोच शिक्षणाचा खरा धडा असतो. पाठ्यपुस्तकातील धडे शिकणे हे शिक्षण कसे? असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. आपण जेव्हा पुस्तक शिकतो तेव्हा केवळ माहिती प्राप्त करत असतो तर, अनुभवातून शिकण्याची प्रक्रिया ही ज्ञानाच्या दिशेचा प्रवास असतो. जीवन जगताना आपल्याला जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सुरू असलेला अभ्यास हेच शिक्षण असते. मात्र आपण जीवन न जगता केवळ पाठ्यपुस्तकातील माहिती शिकतो आणि त्याच्या आधारे प्रश्नांची उत्तरे देत शिक्षण सुरू ठेवतो, त्यालाच शिक्षण असे म्हणतो.

मात्र तरी ते काही खरे शिक्षण नाही. शिक्षण हे केवळ जीवन अनुभवातूनच मिळू शकते याला कोणताही पर्याय नाही. विनोबा शिक्षणाला जीवनाशी जोडू पाहतात. त्यांची वाट हीच खर्‍या शिक्षणाची वाट आहे. जीवन प्रवासकरत असताना त्यातून जे काही अनुभव मिळतात आणि त्यातून आपण जे काही शिकत असतो तेच खरे शिक्षण असते. वर्तमानात मात्र आपण जीवन अनुभवापासून मुलांना दूर सारत त्यांच्या शिक्षणाचा विचार करू लागलो आहोत. शिक्षण सुरू असताना कोणत्याही प्रकारचे काम मुलांनी करता कामा नये. मुले जशी-जशी वरची इयत्ता चढत जातात त्या-त्या प्रमाणे त्यांना कामापासून दूर सारण्याकडे कल पालकांचा वाढत जातो. दहावी आणि बारावीत तर त्यांने काहीच करता कामा नये अशी पालकांची पक्की धारणा झाली आहे. त्याला कोणी काम सांगितले तर त्यावरून घरात भांडणे होतात. एवढी चिंता शिक्षणाची लागलेली असते.

आपल्या समाज व्यवस्थेत वर्तमानात जे काही प्रश्न आहेत. त्याच्या मुळाशी शिक्षणाचा अभाव हे कारण आहे. मात्र दुसरीकडे आपली साक्षरता 90 टक्क्यांच्या आसपास चालली आहे. मग साक्षरता वाढते आणि त्या प्रमाणात जीवनात आणि समाज व्यवस्थेत देखील प्रश्न निर्माण होत आहेत. शिक्षण हे तर प्रश्नांचे निराकरणासाठी आहे. शिक्षण घेतल्यानंतर प्रश्न सोडण्याची क्षमता येत असते; पण आपल्याकडे शिक्षणातून ती क्षमता मिळत नाही, असे निष्कर्ष नोंदविले जात आहेत. याचे कारण शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेचा आहे का? याचाही विचार करण्याची गरज आहे. जीवनातील समस्या जर शिक्षणातून निर्माण झाल्या असतील तर ते शिक्षण कुचकामी आहे. तो केवळ अक्षर साक्षरतेचा प्रवास आहे. शिक्षणाचा संबंध जीवनाशी असतो. तो जोवर जीवनाशी असतो तोवर शिक्षण परिणामकारक असण्याची शक्यता अधिक आहे. शिक्षण आणि जीवन यांचे नाते तुटल्याने आपल्याला संस्काराच्या शिकवण्या लावण्याची वेळ आली आहे. ज्या संस्कारासाठी शिक्षण असते ते संस्कार शिक्षणातून होत नाही म्हणून संस्कार वर्गाचे आस्तित्व निर्माण झाले आहे; पण ते संस्कार वर्गही जीवन अनुभवापासून दूरावल्याने तेथेही अक्षरांचे संस्कार होतात बाकी काही नाही. त्यामुळे तेथे जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या जीवनात केवळ बदल होतो ते परिवर्तनाची वाट चालू लागत नाही. ज्या दिवशी शिक्षणाचे नाते जीवनाशी जोडले जातील तेव्हा आपले सुरू असणारे इतर सारे प्रयत्न थांबणार आहेत. तोवर आपली सारी धावाधाव सुरूच राहणार आहे. त्यामुळे संस्कार वर्गातून होणार्‍या अशा संस्काराचा फार उपयोग होईल असे घडणार नाही. जीवनाचे मोल आणि अर्थ हा जीवनाच्या शाळेतूनच शिकवला जातो हे लक्षात घ्यायला हवे.

आपण जेव्हा मुलांना शिकण्यासाठी जीवन शिक्षणाची शाळा निर्माण करून देतो तेव्हा मुलांच्या मनात प्रश्न निर्माण होत असतात. शेतात शेती करणारा विद्यार्थी शेतात श्रम करतो तेव्हा त्याला प्रश्न निर्माण होत असतील, तर त्या प्रश्नांची उत्तरे ही अनुभवातून मिळतील किंवा त्याची उत्तरे देणारी एक व्यवस्था असावी लागते. ती व्यवस्था म्हणजे शिक्षक. मात्र तो शिक्षक हा काही पुस्तकातून उत्तरे देणारा नाही तर तो जीवन अनुभवाची शिदोरी घेणारा आणि जीवन जगणारा असावा लागतो. विनोबानी शिक्षक म्हणून खूप काही अपेक्षा केल्या आहेत. शेती करताना विद्यार्थ्यांना प्रश्न पडत असतील की, झाडे कसे वाढतात..? त्याला फळे, फुले कशी येतात? चांगली फळे येण्यासाठी त्यांचे अन्न कोणते? जमीन एकच असली, पाणी एकाच विहिरीचे असले तरी त्या जमिनीतील आंबा गोड असतो, चिंच आणि कौठ आंबट कसे? आवळा तुरट कसा? असे प्रश्न पडतात. जीवनात अशी प्रश्न पडणे आणि त्या प्रश्नांच्या उत्तराचा शोध घेणे हे खरे शिक्षण असते. कुरूक्षेत्रावर कृष्णाने अर्जूनाला गीता सांगितली. मात्र गीता म्हणजे शिक्षण नाही तर अर्जुनाला प्रश्न पडले आणि त्या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी कृष्णाने तत्वज्ञान सांगितले त्याची गीता झाली. तेथे जे घडले ते खरे शिक्षण. मुळात प्रश्न न पडता आपण मुलांवर काही लादत असतो. त्यामुळे मुले शिकत नाही. लादणे हे शिक्षण नाही उत्स्फुर्तता हे खरे शिक्षण असते. जेथे प्रश्न पडणे थांबते तेथे शिक्षणाचा प्रवास थांबतो हे लक्षात घ्यायला हवे. प्रश्न पडणे हा विचार केला जात असल्याचे लक्षण आहे. त्यामुळे आपल्याला जीवनात शिक्षणाचा विचार करावयाचा असेल तर पाठयपुस्तकांतील माहितीचा नाही तर जीवनात प़डणार्‍या प्रश्नांचा विचार अधिक करण्याची गरज आहे. तेथूनच शिक्षणाला खरा आऱंभ होणार आहे.

गावात दुष्काळ पडला तर काय? असा प्रश्न विचारल्यानंतर मुल जे काही संघर्ष करत जगत असते ते सारे अनुभवने हे शिक्षण असते. आपण मुलांना अभ्यासक्रमात मसाल्याचे पदार्थ आहेत म्हणून शिकवतो किंवा त्या संबंधीचा स्वाध्याय पूर्ण करण्यास सांगतो; पण तो स्वाध्याय नाही तर, स्वयंपाक घरात काम करताना जे शिकणे होते त्यात मसालेचे पदार्थ जसे येतात त्याप्रमाणे त्याचा रंग, चव, आकार, स्पर्शाची देखील कल्पना येत असते. कोणत्या भाजीला कोणते मसालेचे पदार्थ वापरायचे, किती वापरायचे हे देखील आपणप्रत्यक्ष कृती करत अनुभवातून शिकत असतो. तेथेच त्यांचे शिक्षण होत असते. त्यामुळे विनोबाचा आग्रह हा जीवनातील अनुभवाच्याव्दारे होणार्‍या शिक्षणावर अधिक भर आहे. मोठी माणसं जे शिकतात आणि आपल्या व्यवसायात ते जे काही तरबेज होतात त्यासाठी त्यांना जे काही उपयोगी पडले आहे तेथे त्यांना अनुभवाची मदत झाली आहे. तेथे त्यांना शालेय शिक्षणातून जे मिळाले आहे ते फार उपयोगी पडलेले असते असे नाही, तर जीवनातील अनुभवाने त्यांना अधिक शहाणे केलेले असते. जीवनात आपण जे काही चांगले वाईट वागत असतो ते वागणे हे आपल्या अनुभवाचे बोल असतात. त्या अनुभवातून केव्हा, कोणा बरोबर कसे वागायचे हे आपण ठरवतो. तसे जे काही शिकायचे आहे ते मुलांना जीवनातील अनुभवातून शिकू दे. त्यांच्यावर काही तर लादण्याच्या नादात त्यांना आपण शिक्षणापासून दूर लोटत आहोत. त्यामुळे शिकण्यासाठी तयारी होऊ देण्याची गरज आहे.

अनेकदा आपण मुलांच्या बेशिस्तीबददल बोलत असतो. अनेकदा त्यांच्या सवयी, बेजबाबदारपणा याबददल पण बोलतो. तसेच अलिकडे मुलांना पैशाचे मोल नाही अशी सार्वत्रिक तक्रार असते. या सार्‍या तक्रारी शिक्षणातून निराकरणाची गरज आहे. किंबहूना शिक्षणातून तेच तर अपेक्षित आहे असे मानले जाते. मात्र आपण शिक्षण देत असताना मुलांना जगण्याचा अनुभव दिला तर मुले जबाबदारीने वागण्याची शक्यता अधिक असते. बाजारात उन्हात बसून भाजी विकल्यावर 100 रूपये मिळतात. आपल्या बापाने दिवसभर कष्ट केल्यावर त्याला चारपाचशे रूपये मिळतात हे मुले जेव्हा पाहतात आणि त्यासंबंधीचा काही अनुभव घेतात तेव्हा त्याला पैशाचे आणि श्रमाचे मोल कळत असते. दिवाळीला मुलीने दोन हजाराची फटाके उडवली तेव्हा बाप म्हणून त्रागा केला जातो. बापाच्या त्राग्या मागे पैसे कमविण्यासाठी किती कष्ट पडतात याचा अनुभव असतो. पैसा कमविण्यासाठी किती त्रास होतो. उन्हात राबावे लागते. कष्ट उपसावे लागते याची जाणीव मुलांना नसते. मुलांच्या काळजी पोटी आणि शिक्षणापोटी त्यांना अनुभवाचे चटके बसू नये म्हणून पालक काळजी घेत असतात. त्यांना ते चटके बसू नये म्हणून काळजी घेतली जाते. त्यातून मुलांना पैशाचे मोल वाटत नाही. एखादी स्त्री जेव्हा महिनाभर भांडे, धुणे करते तेव्हा तीला हजार रूपये मिळतात. तीचे कष्ट तीची मुलगी, मुलगा पाहतो तेव्हा तीचे मुलं दोन हजाराचे फटाके उडविण्याची हिम्मत तरी कशी करणार? त्यात आईचे श्रम त्याला माहीत असतात. कारण कधी तरी आई आजारी असताना ही मुले आईच्या ऐवजी कामाला जात असताना, घरात हवे ते मिळत नाही. कष्ट आणि अंगावरील फाटके वस्त्र परीस्थितीची जाणीव करून देत असतात. त्यामुळे त्या मुलांवर जीवन व्यवहारातून संस्कार होत असतात. मुलांना आपण शिक्षणाच्या नावाखाली कष्टापासून दूर ठेवतो तेव्हा त्याचे परिणाम आज नाही तर भविष्यात निश्चित भोगावे लागतात. म्हणून कष्टकरी वर्गातील मुले अधिक व्यवहारी आणि जीवनात यशस्वी होताना दिसतात. त्यामानाने अधिक पैसा ज्या कुटुंबात येतो तेथे पैशाची चैन करण्याची वृत्ती अधिक असते. येथे व्यवहारिक कौशल्याचा अभावाची शक्यता देखील अधिक असते. त्यात मुलांचा दोष नाही. त्यांना जीवन अनुभवाचे शिक्षणच मिळाले नाही.पुस्तकातील अक्षरे वाचून श्रमाचे मोल ते कसे जाणू शकतील? केवळ पैशाची उधळपटटी करू नका असे सांगून मुलांवर संस्कार करू शकणार नाही. मुलांना जीवनाचा अनुभव आपण जितका अधिक देऊ तितकी जबाबदारी आणि संस्कार बिंबवले जात असतात हे लक्षात घ्यायला हवे. संस्कार हे जगण्यातून होत असतात हे लक्षात घ्यायला हवे.शिक्षणाचा तोच राजमार्ग आहे.

जीवन शिक्षणाचा मार्ग हा मुलांना अधिक चांगली स्वप्ने देत असतो. आपण जीवनात काय बनायचे आहे हे केवळ स्वप्न पेरले तर फार काही हाती लागणार नाही.त्या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी लागणार्‍या श्रमाची तयारी करावी लागते ही मानसिकता आपण निर्माण करण्याची गरज आहे. अन्यथा स्वप्न पाहिले तर फार काही हाती लागण्याची शक्यता नाही. आज श्रमाची प्रतिष्ठा बिंबवण्यासाठी आपण प्रयत्न करत असलो तरी श्रमाबददलचा आदर पेरला जात नाही आणि उगलत देखील नाही. त्यामुळे आपले वर्तमानातील प्रश्न सोडविण्याकरता शिक्षण हे अधिक अनुभवाशी, प्रत्यक्ष जीवन व्यवहाराशी जोडण्याची गरज आहे. विनोबा आणि गांधीजीच्या शिक्षणाची वाट यापेक्षा वेगळी कोणती होती?

एक प्रतिक्रिया

 1. संस्कार ही अक्षर साक्षरतेतून येणारी गोष्ट नाही.ती अनुभवसिद्ध आहे.प्रत्येक चांगल्या वाईट अनुभवातून मिळणारा बोध आहे.ती दीर्घकालीन प्रक्रिया आहे.तसेच आजन्म चालणारी आहे. हल्ली मुलांना शालेय गुणवत्ता धारण करताना प्रचंड मार्क्स मिळतात ,उत्क्रुष्ट संपादनक्षमता या मुलांमधे आढळते आहे , बौद्धिक क्षमता ही चांगल्या गुणवत्तेची दर्जेदार आहे,देशात / विदेशातही ही मुले आपली चुणूक दाखवण्यात सक्षम आढळतात.पण व्यावहारिक जीवनात / भावनिक पातळीवर यांची डेव्हलपमेंट नगण्य आढळते. ना त्यांना जीवाभावाचे कोणी मित्र असतात ,ना कुटुंबातील घटकांशी ( अगदी आईवडीलांशीसुद्धा)त्यांचे बंध मजबूत नसतात. फक्त ध्येयामागे बेफामपणे ही मुले धावत असतात.
  आणि संपूर्ण कुटुंब नकळत पणे आतून उध्वस्त झालेले असते.
  शेवटी प्रश्न पडतो , शैक्षणिक गुणवत्ता म्हणजे नेमके काय?
  त्यातील भावनिक टप्पा गेला कुठे? शिक्षण समाजस्वास्थ्यासाठीच ना? की आत्मकेंद्री बनण्यासाठी,?
  शिक्षणक्षेत्रात जशी स्पर्धा बोकाळली तसे शिक्षण बौद्धिक विकासकेद्री बनत गेलै.भावनिक टप्पा मागे पडत गेला ,आणि अस्वस्थ समाज निर्माण होते गेला.
  शिक्षणाची संकल्पना च समाजाने समजून घेतली नाही.
  आणि शिक्षणप्रणाली तील घटकांनी ही त्याबाबत जागरूकता/ जाग्रुती केली नाही.
  आज बौद्धिक गुणवत्ता असाधारण आढळते आहे .पण भावनिक गुणवत्ता नगण्य आढळते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा