रुपेरी पडदा : कल्पना खरे

दोस्ताना, याराना, दिल चाहता है असे अनेक चित्रपट ‘मैत्री’ विषयाला अनुसरून प्रदर्शित झाले आहेत. सुमारे 50-60 वर्षांपूर्वी ताराचंद बडजात्या यांच्या ‘दोस्ती’ चित्रपटाने अनेक पारितोषिकेही जिंकली. आता सूरज बडजात्या याच विषयावरील नवीन चित्रपट घेऊन आले आहेत, ऊँचाई; पण यामध्ये तरुणांमधील मैत्री दाखवली नसून सेकंड इनिंग मधील, म्हणजे चार ज्येष्ठ नागरिकांमधील अतूट मैत्रीचे प्रदर्शन घडविण्यात आले आहे.

दिल्‍ली येथे राहणारे चार जिवलग मित्र, अमित श्रीवास्तव (अमिताभ बच्चन), भूपेन (डॅनी डेंग्‍नोग्पा), ओम (अनुपम खेर) आणि जावेद (बोमन इराणी) आपल्या दैनंदिन व्यापातून वेळ काढून एकमेकांचे वाढदिवस साजरे करतात. अमित एक प्रथितयश लेखक आहेत. ओम आपले पुस्तकांचे दुकान चालवत आहेत. जावेद यांचे स्त्रियांच्या वस्त्र प्रावरणांचे दुकान आहे, तर भूपेन स्वत: एक शेफ असून एका क्लबचे मालकही आहेत. भूपेनची जन्मभूमी नेपाळ असून आपल्या मित्रांना तिथे, पर्वतशिखरांवर नेण्याची त्यांची खूप इच्छा असते; पण साठी-पासष्टी उलटलेले मित्र त्याची नेहमीच टाळाटाळ करतात.

भूपेनचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा होतो; परंतु त्याच रात्री भूपेनचा अकस्मात मृत्यू होतो. मग त्याचे तिन्ही मित्र त्याचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करायचे ठरवतात. भूपेनच्या अस्थींचे एव्हरेस्ट शिखर परिसरात विसर्जन करायचा ते निर्णय घेतात आणि याच ठिकाणी सुरू होते एका रमणीय प्रवासाची सुरूवात. याच प्रवासात त्यांना माला (सारिका त्रिवेदी) भेटते. ही माला म्हणजे कोण? या सर्वांची सफर पूर्ण होते का? त्यांना प्रवासादरम्यान कोणत्या अडचणी येतात? भूपेनचे स्वप्न पूर्ण होते का? या प्रश्‍नांची उत्तरे चित्रपटगृहातच पाहावीत.

राजश्री प्रॉडक्शनचे चित्रपट म्हणजे कौटुंबिक कथानक, भरपूर गाणी आणि भरपूर कलाकार; हा चित्रपट मात्र काहीसा वेगळा आहे. अर्थात या चारही मित्रांची कौटुंबिक पार्श्‍वभूमीही दाखवली आहेच. दिल्‍ली ते काठमांडू प्रवासाता आग्रा, लखनौ, कानपूर, गोरखपूर सगळीकडच्या विशेष गोष्टी अनुभवताना प्रेक्षकही नकळत त्यांचे सहप्रवासी होतात.

दिग्गज कलाकारांची फौज ही या चित्रपटाची भक्‍कम जमेची बाजू आहे. जावेद आणि शबाना (नीना गुप्‍ता) मधले लटके खटके, ओम याचा चिडचिडा स्वभाव, अनुपम खेर ने मुद्राभिनयातून चांगलाच दाखवलाय. समंजस स्वभावाचा अमित, अल्झायमरची सुरूवात होतानाचा अमित, शारीरिक क्षमतेवर जिद्दीने मात करणारा अमित; अमिताभ बच्चन यांनी उत्तम साकारलाय. बर्‍याच कालावधीनंतर डॅनीचे पडद्यावरील दर्शन सुखद वाटते. परिणिती चोप्रानेही श्रद्धा गुप्‍ता ही टूर मॅनेजर सुंदर रंगवली आहे. नफिसा अली अभिलाषाच्या छोट्याशा भूमिकेत आहे. चित्रपटाची सिनेेमॅटोग्राफी अप्रतिम आहे.

अभिषेक पदीक्षितचे खुमासदार संवाद कधी खदखदून हसवतात तर कधी डोळे पाणवतात. अरे ओ अंकल, पडे हैै रिंकल, लडकी पहाडी, 65 का छोकरा गाणी श्रवणीय आहेत. चित्रपटाची लांबी मात्र बरीच जास्त वाटते. थोडी कात्री लावताआली असती.

मैत्री आणि जिद्दीच्या आधारे उत्तुंग हिमशिखरांना घातलेली गवसणी सहकुटुंब अनुभवावी.

पटकथा, संवाद : अभिषेक दीक्षित
दिग्दर्शक : सुरज बडजात्या
कलाकार : अमिताभ बच्चन, बोमन इराणी, अनुपम खेर, डॅनी डेंग्जोग्पा, नीना गुप्‍ता, सारिका.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा