विवाह, कुटुंब पद्धती यावर नेहमी बोलले जाते, त्यातील दोषदेखील वेळोवेळी समोर आले आहेत. मात्र, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा त्याला पर्याय असू शकत नाही. आधुनिकतेच्या नावाखाली ‘लिव्ह इन रिलेशनशिप’भोवती वलय निर्माण झाले आहे.

वसईतील श्रद्धा वालकर या तरुणीची तिच्या प्रियकराने हत्या केली. दिल्लीत घडलेली ही घटना थरकाप उडवणारी आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे पस्तीस तुकडे करून ते मेहरौलीच्या जंगलात फेकून देण्यात आले. क्रौर्य आणि विकृती याचे टोक गाठल्याचे या घटनेतून दिसते. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ही कायद्याने मान्य केलेली व्यवस्था असली तरी त्यातील असुरक्षितता श्रद्धाच्या हत्येच्या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे. ही हत्या ‘लव्ह जिहाद’ आहे, असा सूर समाजमाध्यमांवर उमटत आहे. प्रियकर आणि प्रेयसी दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने ती चर्चा सुरू झाली असली, तरी आताच कोणत्याही निष्कर्षावर येता येणार नाही. प्रश्‍न ‘लव्ह जिहाद’चा नसून सर्वसामान्य तरुणींच्या फसवणुकीचा आहे. ही फसवणूक जिवावरही बेतू शकते. सुदैवाने एखाद्या मुलीच्या बाबतीत जिवावर बेतले नाही, तरी तिचे भावविश्‍व आणि पर्यायाने आयुष्यच उद्ध्वस्त होण्याचा धोका राहतो. यासाठी स्वतः तरुण महिला, पोलिस यंत्रणा आणि समाज अधिक सजग राहणार का? हे महत्त्वाचे ठरते. तारुण्यसुलभ भावना, आकर्षण यातून चुकीचे पाऊल पडू शकते. जोडीदाराची पारख करण्यात चूक होऊ शकते. याचा दोष कोणाला द्यायचा? प्रेमविवाहासंदर्भात समाजाचा दृष्टिकोन स्वागतशील बनला आहे. आंतरधर्मीय विवाहाबद्दल तो नाही. याच कारणावरून श्रद्धा आणि आफताब पूनावाला यांच्यातील प्रेमसंबंधांना श्रद्धाच्या घरातील व्यक्तींनी विरोध केला होता. तिने विरोधाला जुमानले नाही. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिच्याशी संबंध तोडून टाकले. समजा दिल्लीत राहायला गेल्यावरही तिचा कुटुंबीयांशी संपर्क राहिला असता, तर कदाचित ती आपला होणारा कोंडमारा सांगू शकली असती.

पोलिसांसमोर आव्हान

या जर-तरच्या गोष्टींना आता अर्थ नसला तरी मित्र आणि स्नेहीजन यांना जीवनात महत्त्वाचे स्थान असले पाहिजे, याचा बहुतेकांना विसर पडत चालला आहे. या घटकाच्या अनुपस्थितीमुळे अथवा नगण्य अस्तित्वामुळे अनेकांसाठी तणाव व्यवस्थापन आव्हानात्मक ठरत आहे. श्रद्धाच्या हत्येचा सुगावा केवळ तिच्या मित्राने सजगता दाखवल्यानेच लागू शकला. तिचा मोबाइल फोन आणि समाजमाध्यमांवरील खाती बंद होती. त्यातून संशय वाढला आणि पुढच्या चौकशीत तिची क्रूर पद्धतीने हत्या झाल्याचे उघडकीस आले. विवाह, कुटुंब पद्धती यावर नेहमी बोलले जाते, त्यातील दोषदेखील वेळोवेळी समोर आले आहेत. मात्र, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा त्याला पर्याय असू शकत नाही. आधुनिकतेच्या नावाखाली ‘लिव्ह इन रिलेशनशिप’भोवती वलय निर्माण झाले आहे. याचे आकर्षण असणार्‍या व्यक्ती सर्व वयोगटांतील असल्याचे दिसते. श्रद्धाने वारंवार आग्रह करूनही आफताब विवाहाला तयार नव्हता. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’कडे सोय म्हणून पाहण्याची ही मानसिकता आता मूळ धरू लागली आहे. ती मानसिकता या व्यवस्थेत अडकलेल्या महिलांसाठी सर्वाधिक जोखमीची ठरत आहे. आपल्या इमारतीत, आजूबाजूच्या परिसरात असामाजिक घटकांचा प्रवेश तर झाला नाही ना, हे नागरिकांनी पाहिले पाहिजे; पण इमारतीत अन्यत्र कोण राहते हे माहिती असणे दूरच, शेजार्‍यांबद्दल देखील जुजबी माहिती ठेवण्याचा दृष्टिकोन आढळत नाही. संवादाची दारे अशाप्रकारे बंद झाल्यावर आफताबसारख्यांसाठी ती मोठी संधी ठरते, हे कसे नाकारता येईल? मृतदेहाचे फ्रीजमध्ये ठेवलेले तुकडे जंगलात फेकण्यासाठी आफताब दररोज रात्री दोन वाजता फ्लॅटमधून बाहेर पडत असे. महानगरांसाठी ती अवेळ नसली तरी याप्रकारे त्याचे बाहेर पडणे कोणालाच खटकू नये, हे आश्‍चर्य! आपल्या विश्‍वापलीकडे पाहायचे नाही, हे तुटलेपण गंभीर गुन्ह्यांना हातभार लावत आहे. विश्‍वास टाकलेल्या तरुणीला या प्रकारे संपविण्याची वृत्ती असलेले सर्व धर्मांत आहेेत. या वृत्तीचा संबंध कोणत्या धर्माशी लावण्याचे कारण नाही. श्रद्धाच्या मारेकर्‍याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा आहे. आफताबने खून केल्याचे उघड झाले असले, तरी न्यायालयात त्याचा गुन्हा पुराव्यानीशी सिद्ध करावा लागेल. दिल्ली पोलिसांसाठी ते आव्हान राहील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा